गवळीगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : जळगाव
उंची : २८३८ फुट
श्रेणी : मध्यम
सातपुडा पर्वतरांगेचे सानिध्य लाभले असले तरी जळगाव जिल्ह्यात गिरिदुर्गांची संख्या फारच कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. वैशाखगड/ मनापुरी अशा विविध नावानी ओळखला जाणारा गवळीगड त्यापैकी एक. स्थानिक लोक या किल्ल्याला गवळी राजाचा किल्ला म्हणुन ओळखत असल्याने त्याला गवळीगड म्हणणे योग्य ठरेल. जळगावच्या यावल वनक्षेत्रात असलेला हा किल्ला एकप्रकारे वनदुर्गच आहे असे म्हणता येईल. यावल तालुक्यात असलेला हा किल्ला यावल या तालुक्याच्या ठिकाणाहुन २८ कि.मी.अंतरावर तर चोपडा येथुन ४० कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचा परिसर म्हणजे डोंगरमाथ्यावर असलेले विस्तीर्ण पठार व त्यावरील दोन शिखरे आहेत. किल्ल्याचा डोंगर अस्ताव्यस्त पसरलेला असल्याने त्यावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्या तरी मनुदेवी मंदिराकडून जाणारी वाट सोपी व सोयीची आहे. शिवाय या ठिकाणी दुकानदाराना विचारल्यास वाटाड्याची देखील सोय होते. मनुदेवी हि खानदेशातील बहुजन समाजाची म्हणजे भिल्ल व तडवी समाजाची देवता व आसपासच्या गावातील अनेकांची कुलदेवता असल्याने तेथे भक्तांची सतत वर्दळ असते. पण भक्तांची वर्दळ असुन देखील या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची फारशी सोय नसल्याने खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
...
मनुदेवी येथे जाण्यासाठी सर्वप्रथम अडगाव किंवा किनगाव या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावात यावे लागते. यावल ते आडगाव हे अंतर २० कि.मी.असुन तेथुन ८ कि.मी. अंतरावर डोंगरात मनुदेवीचे मंदिर आहे. हे ८ कि.मी. अंतर पार करण्यासाठी वाहनाची सोय नसल्याने गावातुन खाजगी रिक्षा करावी लागते अन्यथा हे नंतर पायी पार करावे लागते. आडगाव फाट्यापासून मनुदेवी मंदिराकडे जातांना ६ कि.मी.अंतरावर हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव असुन तेथुन मनुदेवी मंदीर ३ कि.मी. अंतरावर आहे. मनुदेवीचे मंदिर अतिप्राचीन असल्याचे अवशेषावरुन व तेथील उत्खननातून सापडलेल्या मूर्तीवरुन वाटते. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचल्यावर साधारण दीडशे पायऱ्या चढुन आपण मनुदेवीच्या मंदीरात पोहोचतो. मनुदेवीचे मंदीर हे दोन डोंगरामधील एका घळीत असुन त्या शेजारी मोठा धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे मानकरी नदीचा उगम मानला जातो. मनुदेवीचे सध्या असलेले मंदिर हे नव्याने बांधलेले असुन या मंदिर परीसरात आपल्याला प्राचीन मंदिराचे अवशेष म्हणजे नक्षीदार खांब,भग्न मुर्ती, विरगळ या सारखे अवशेष पहायला मिळतात. या मंदिर परीसरात काही घरांचे अवशेष असुन तेथे पुर्वी मनापुरी नावाचे गाव असल्याचे स्थानिक सांगतात तसेच मनुदेवी ही गवळी राजाची कुलदेवता होती असेही लोक सांगतात. मंदीराशेजारी असलेल्या धबधब्याशेजारून वर चढल्यावर डावीकडे जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या वाटेवर नेऊन सोडते. मंदिराकडून किल्ल्याचा दरवाजा साधारण तीन कि. मी. अंतरावर आहे. या वाटेवर जंगल असल्याने शिवाय किल्ला मोठा असुन अवशेष निरनिराळ्या भागात विखुरलेले असल्याने सोबत किल्ला माहीत असलेला वाटाड्या असणे गरजेचे आहे. मंदिराकडून निघाल्यावर साधारण पाउण तासात उध्वस्त तटबंदीतुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. या ठिकाणी असलेली तटबंदी पहाता येथे दरवाजा असावा असे ठामपणे सांगता येत नाही. हि तटबंदी बांधण्यासाठी घडीव दगडांचा तसेच मोठमोठ्या विटांचा वापर केला आहे. बहुतांशी तटबंदी हि मातीत गाडली गेली असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली आहेत. संपुर्ण किल्ला हा उंचसखल पठारावर असुन या पठारावर दोन मध्यम आकाराच्या टेकड्या आहेत. मुख्य किल्ल्याशिवाय या टेकड्यांना घातलेली तटबंदी पहाता या टेकड्या म्हणजे या किल्ल्याचे बालेकिल्ले असावेत असे वाटते. या दोन्ही टेकड्यांवर पाण्याची स्वतंत्र सोय केलेली आहे. भग्न तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे जाणारी वाट आपल्याला पहिल्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. या टेकडीच्या टोकावर एक उंच व मोठा बुरुज असुन या बुरूजावरून खुप मोठा प्रदेश नजरेस पडतो. या बुरुजावर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ३५७३ फुट आहे. या टेकडीवर काही घरांचे अवशेष, एक बळद (पेव) व पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. या संपुर्ण टेकडीला स्वतंत्र तटबंदी व बुरुज असुन असुन प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र दरवाजा आहे. या दरवाजाची कमान नष्ट झाली असली तरी शेजारील बुरुज व चौथरा आजही शिल्लक आहे. या दरवाजाने बाहेर पडल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. या पठारावर एक जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधकाम केलेले थडगे पहायला मिळते. येथुन पुढे आल्यावर डाव्या बाजुस किल्ल्याची तटबंदी असुन उजव्या बाजुस डोंगर उतारावर मातीने भरलेला खुप मोठा तलाव पहायला मिळतो. येथुन पुढे आल्यावर एक लहानशी घळ पार करून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. येथे डावीकडील टेकडी म्हणजे किल्ल्याचा दुसरा बालेकिल्ला असुन याला फारशी तटबंदी नसली तरी सपाटीच्या बाजुस खंदक खोदुन त्याला सपाटीपासुन वेगळे करण्यात आले आहे. पण तेथे न जाता डावीकडील बाजुस गेल्यावर आपल्याला सपाटीवरील किल्ल्याचा मुख्य दरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा देखील पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचा केवळ चौथरा शिल्लक आहे. हा दरवाजा पाहुन झाल्यावर उजवीकडील जंगलात शिरल्यावर एका झाडाखाली तांदळा स्वरूपात पूजले जाणारे देवीचे स्थान आहे. मोकळ्या आकाशाखाली असणाऱ्या या मंदिराशेजारी विटांनी बांधलेली गोलाकार आकाराची मोठी व खोल विहीर आहे. येथुन पुढे आल्यावर आपण दुसऱ्या टेकडीखाली असलेल्या खंदकात पोहोचतो. या खंदक पार करुण आपण दुसऱ्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाड्याचे व घरांचे अवशेष पहायला मिळतात. पण पडझड झाल्याने व जंगल वाढल्याने याचा दरवाजा मात्र दिसुन येत नाही. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरल्यास आपण मातीने भरलेल्या तलावाजवळ पोहोचतो व आपल्या परतीच्या प्रवासास सुरवात होते. किल्ल्याचा संपुर्ण परिसर फिरण्यासाठी साधारण दोन तास लागतात. किल्ल्याचा एकुण आवाका पहाता किल्ल्यावर अजून बरेच अवशेष असावेत पण ते झाडीत लपले आहेत किंवा मातीत गाडले आहेत. पुर्वी या किल्ल्यावर जाण्यासाठी १८०० पायऱ्या असल्याचे स्थानिक सांगतात पण आज त्यातील एकही पायरी कोठे दिसत नाहीत. त्यामुळे हि फक्त स्थानिक कथा असावी असे वाटते. किल्ला वनखात्याच्या ताब्यात असुन किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने मुक्कामास बंदी आहे.संपुर्ण किल्ला फिरून परत मंदिराकडे येण्यासाठी साधारण पाच तास लागतात. स्थानिक माहीतीनुसार अभीर राजवटीच्या काळात ईश्वसेन नावाचा गवळी राजा या भागात राज्य करीत असतांना त्याने या किल्ल्याची बांधणी केली. इंग्रजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला शिंदे यांच्याकडे होता.
© Suresh Nimbalkar