गगनगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : कोल्हापुर

उंची : २११० फुट

श्रेणी : सोपी

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा हे थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिध्द आहे पण दुर्गप्रेमीना परिचित आहे तो ह्या गावाजवळ असलेला गगनगड किल्ला. करवीर प्रांतातून कोकणात जे घाटमार्ग उतरतात त्यात करूळ घाट आणि भुईबावडा घाट हे दोन प्राचीन घाटमार्ग. कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल या घाटवाटांनी देशावर येत असे. या दोन घाटांच्या रक्षणासाठी सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर १२ व्या शतकात गगनगड किल्ला बांधण्यात आला. आज हा किल्ला नाथ संप्रदायमधील श्री गगनगिरी महाराज यांच्यामुळे प्रसिध्द आहे. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे गडावर भक्तगणांचा राबता असुन पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत गडावर प्रवेश दिला जातो. गगनबावडा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन ते कोल्हापूरपासुन ५५ कि.मी. अंतरावर आहे. बावडा गावातुन खाजगी वाहनाने गगनगडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी २ कि.मी.चा डांबरी रस्ता असुन हा रस्ता आपल्याला गडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत नेतो. ... पुर्वी भुईबावडा गावातील तळीवाडी येथून उभा डोंगर चढून कडे कपारीतून गडावर जाण्याचा मार्ग होता. वाहनतळापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन पायऱ्यांच्या सुरवातीस म्हसोबाचे मंदिर व त्यासमोर रेडयाचा पुतळा आहे. येथुन वरील बाजुस असलेला गडाचा बुरुज दिसतो. पायऱ्याच्या वाटेने गडचढाईस सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण गडाच्या दरवाजात येतो. गडावरच्या मूळ दरवाज्याचे फक्त अवशेष उरले असुन मठाच्या समितीने इथे नवीन जाळीदार दरवाजा बांधला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजुच्या चौथऱ्यावर गाड्यावर ठेवलेली मोठी तोफ असुन समोरच कपारीत भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत गगनगिरी महाराजांचे वास्तव्य असल्याने गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेमध्ये एक कोनाड्यात लहान तोफ पहायला मिळते. गुहेच्या बाहेरील कातळावर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. या भागात छायाचित्र घेण्यास मनाई आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजुस मठाचे कार्यालय व भोजन कक्ष असुन पुढील बाजुस भक्तनिवास आहे. गुहा पाहुन पायऱ्या चढुन वर आल्यावर आपण गुहेच्या वरील भागात असलेल्या मोकळ्या पठारावर येतो. पठारावर गुहेच्या वरील भागात गगनगिरी महाराजांचे मंदीर असुन मंदिराच्या मागील बुरुजावर दोन टोकांना दोन गाडयावर ठेवलेल्या तोफा आहेत. मंदिराच्या या भागातुन खाली गुहेच्या उजव्या बाजुस पहिले असता एक गुहा व खडकात खोदलेले पाण्याचे टाके दिसते. मंदीराच्या आवारात गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारलेला असुन या ठिकाणावरून गडाची संपुर्ण रचना लक्षात येते. गडाचा निमुळता डोंगर दहा एकरवर साधारण पुर्व-पश्चीम पसरलेला असुन गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले आहेत. गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २०९० फुट आहे. येथुन समोरच गडाचा बालेकिल्ला व त्यावर असलेली गहिनीनाथांच्या समाधीची इमारत दिसते. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत असलेल्या उंचवट्यावर महादेवाचे लहानसे मंदीर आहे. या मंदिराच्या डावीकडे खालील बाजूने जाणारी वाट आपल्याला पठाराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बुरुजापर्यंत घेऊन जाते तर उजवीकडील वाट बालेकिल्ल्यावर नेते. पठाराच्या टोकावरील बुरुजाकडे जाताना या भागात किल्ल्याला असलेली सलग तटबंदी तसेच वाटेत पाण्याने भरलेला एक तलाव नजरेस पडतो. टोकावरील या बुरुजावरून कोकणात उतरणाऱ्या असंख्य खोल दऱ्या,तळातील भुईबावडा गाव तर डाव्या बाजुस करूळ गाव नजरेस पडते. येथुन परत फिरल्यावर मंदिराकडे येऊन उजवीकडील वाटेने बालेकिल्ल्याकडे निघावे. या वाटेने जाताना काही वास्तुंचे चौथरे व बालेकिल्ल्याची तटबंदी नजरेस पडते. नव्याने बांधलेल्या या पायऱ्यांच्या वाटेच्या वरील बाजुस तटबंदीत दोन बुरुज असुन पायऱ्यांच्या शेवटी दरवाजाची उध्वस्त कमान आहे. या कमानीतून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. दरवाजाशेजारील बुरुजांची मोठी पडझड झालेली आहे. येथे समोरच दर्ग्यासारखी गहिनीनाथांची समाधी असुन शेजारी विठ्ठलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराशेजारील भल्यामोठ्या खळग्यात बालेकिल्ल्याला पाणीपुरवठा करणारी एक मोठी विहीर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर मोठया प्रमाणात वास्तुंचे अवशेष असुन ढालकाठीचा म्हणजेच झेंडा रोवण्याची जागा असलेला बुरुज दिसुन येतो. संपुर्ण गडफेरी करण्यासाठी दीड तास हाताशी असायला हवेत. इतिहासाच्या या पाऊलखुणा पहायला गगनगडाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. सन ११७८ ते १२०९ दरम्यान शिलाहार राजा भोज (दुसरा) याचा दक्षिण महाराष्ट्रावर अंमल असताना जे पंधरा किल्ले बांधले त्यात करूळ घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी केली गेली. पुढे १२०९ मध्ये सिंधणदेव यादवाने भोज राजाचा पराभव करून हा भाग यादवांच्या अंमलाखाली आणला. इ.स १३१० मध्ये देवगिरीच्या अस्तानंतर गड दिल्लीच्या अधिपत्याखाली आला व कालांतराने बहामनी सत्तेखाली आला. बहामनी राज्याची शकले झाल्यावर हा गड आदिलशहाकडे गेला. कोल्हापूरहून जवळ आणि कोकणाच्या मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे तो संरक्षण आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. इ.स १६५८ मध्ये शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला व त्याची डागडुजी केली. नंतरच्या काळात राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी हुकूमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांना बहाल केली. १८४४ साली कोल्हापुरात इंग्रजाविरुद्ध उद्भभवलेल्या बंडात गगनगड, सामानगड या किल्ल्यांच्या गडकऱ्यानी बंडखोरांना साथ दिल्याने इंग्रजांनी तोफगोळ्यांचा मारा करून या किल्ल्यांची तटबंदी उध्वस्त केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!