गंभीरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : २१८२ फुट

श्रेणी : मध्यम

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत दक्षिण कोकण इतके वरदान लाभुन व मुंबईच्या अगदी जवळ असुनही या भागाचा पर्यटनासाठी म्हणावा तितका विकास झाला नाही. उत्तर कोकणातील पुर्वीचा ठाणे (नव्याने पालघर) जिल्हा व दादरा नगर हवेलीच्या सीमेवर डहाणु तालुक्यात गर्द झाडीने वेढलेला गंभीरगड किल्ला उभा आहे. मुंबईहुन स्वतःच्या वाहनाने एका दिवसात सहजपणे करता येण्यासारखी हि दुर्गभ्रमंती असुन आदिवासीबहुल असलेल्या या भागात एस.टी.बसची सेवा नियमित नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करणे उत्तम. गंभीरगडास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ट्रेनने बोईसर अथवा डहाणु स्थानक गाठावे लागते. व्याहाळी हे गडाखालील गाव बोईसर रेल्वे स्थानकापासून ५३ कि.मी.अंतरावर तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर चारोटी (कासा) नाक्यापासून २१ कि.मी. अंतरावर आहे. ... व्याहाळी हे गाव मुख्य रस्त्यापासुन आतील बाजुस असल्याने आपल्याला १६ कि.मी अंतरावरील सायवान येथे उतरावे लागते. सायवान येथुन गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाटीलवाडी गावात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. सायवानपुढे एक लहानसा घाट उतरल्यावर २ कि.मी.अंतरावर व्याहाळी गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासुन ३ कि.मी. आत पाटीलवाडी हि व्याहाळी गावातील वाडी असुन पाटीलवाडी हे गंभीरगडाच्या पायथ्याचे गाव आहे. पाटीलवाडी गावात आल्यावर गावामागे असलेल्या गंभीरगड किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. या वाटेशिवाय गडाच्या मागील बाजूस असलेल्या रायपूर गावातुनही किल्ल्यावर जाणारी वाट आहे पण या वाटेवर उभा चढ असल्याने पाटीलवाडी गावातुन जाणे योग्य ठरते. गावातुन गडाकडे निघाल्यावर डांबरी रस्ता वाडीला वळसा घालत किल्ल्याच्या दिशेने जातो तर वळणावरून एक मळलेली वाट किल्ल्याच्या दिशेने जाते. हि वाट डांबरी रस्ता जिथे संपतो तिथे जाऊन मिळते. डांबरी रस्त्याने न जाता या मळलेल्या वाटेने गेल्यास वाटेत एका मोठया घडीव आयताकृती दगडावर चंद्रसुर्य व दोन पाऊले कोरलेली पहायला मिळतात. हा समाधीचा दगड असुन गावकरी या दगडाला सीतेची पाऊले म्हणुन ओळखतात. येथुन पुढे वाटेच्या सुरवातीला एक ओढा असुन या ओढयाच्या पात्रात एक विहीर व काठावर पत्र्याच्या निवाऱ्याखाली ठेवलेले शिवलिंग पहायला मिळते. महादेवाचे दर्शन घेऊन व विहीरीवर पाणी भरून घेऊन गड थोडा डावीकडे ठेवून उजवीकडच्या डोंगरसोंडेवरील वाटेने गड चढण्यास सुरवात करावी. या वाटेने काही अंतर पार केल्यावर गडाचा उभा चढ सुरु होतो व तो आपली चांगलीच दमछाक करतो पण वाट जंगलातुन जात असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही. या वाटेने ४५ मिनिटांची चढाई करून आपण गडाखाली असलेल्या पठारावर येतो. या ठिकाणी जंगल विरळ झालेले असुन गडाचा कातळमाथा आपले लक्ष वेधून घेतो. गडमाथ्याचे दोन भाग पडलेले असुन डावीकडील माथ्यावर सुळक्यासारखे दगडी स्तंभ दिसतात तर उजवीकडे सपाट कातळमाथा नजरेस पडतो. या दोन माथ्यांच्या मधील भागाच्या दिशेने वाटचाल केल्यावर अर्ध्या तासात आपण गडाच्या उध्वस्त तटबंदी समोर पोहोचतो. तटबंदीखाली असलेल्या बांधीव पायऱ्या पहाता गडाचा दरवाजा देखील याच भागात असावा पण सध्या दरवाजाचे कोणतेही अवशेष वा खुणा दिसुन येत नाही. माचीवर असलेल्या या उध्वस्त तटबंदीत ढासळलेले तीन बुरुज पहायला मिळतात. या उध्वस्त तटबंदीवरून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. गावातुन इथवर येण्यासाठी दिड तास लागतो. गंभीरगड माची ब बालेकिल्ला अशा दोन भागात विभागला असुन किल्ल्याचा डोंगर C आकारात ४० एकर परिसरात पुर्वपश्चिम पसरलेला आहे. बालेकिल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २०५० फुट असुन माचीवर मोठ्या प्रमाणात जंगल वाढले असल्याने माचीवरील अवशेष त्यात लुप्त झाले आहेत. माचीवरील तटबंदीला समांतर वाटेने काही अंतर गेले असता एका ठिकाणी मोठया प्रमाणात गडाची ढासळलेली तटबंदी दिसुन येते. आमच्या बरोबर आलेल्या ५५ वर्षीय वाटाड्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी तटावर दोन तोफा होत्या पण १५ ते २० वर्षापुर्वी हा तट कोसळला असुन त्या तोफा या दगडाखाली गाडल्या असाव्यात किंवा दरीत कोसळल्या असाव्यात. त्याच्या लहानपणी त्याने या तोफा पहिल्या होत्या. मी अलीकडे वाचलेल्या लेखात अनेक जणांनी गडावर तोफा असल्याचे लिहिले आहे पण ते खोटे आहे. येथुन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर वाटेत काही कोरीव शिळा व दगड तसेच कमळाचे फुल कोरलेला एक कोरीव दगड दिसुन येतो. गावकरी या ठिकाणाला चांगमाता देवीचे ठिकाण म्हणुन ओळखतात. येथे आजुबाजुच्या झाडीत काही घरांचे अवशेष दिसुन येतात. येथुन पुढे आल्यावर उजवीकडे डोंगरसोंडेवरुन उजवीकडील कातळमाथ्याच्या पायथ्याच्या दिशेने निघायचे. बालेकिल्ल्याच्या या कडय़ावरील भागात खडकात पाण्याची तीन टाकी कोरलेली असुन त्यातील एका टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. पाणी काढण्यासाठी थोडे प्रस्तरारोहण करत टाक्यावर चढावे लागते तसेच दिवाळीनंतर हे पाणी खोल जात असल्याने ते काढण्यासाठी जवळ दोरी असणे आवश्यक आहे. येथून पुढील वाट बालेकिल्ला उजवीकडे ठेवत कड्याला समांतर ठेवत दोन्ही माथ्याच्या मध्यावर येते व उजवीकडे वळुन उजवीकडील बालेकिल्ल्यावर जाते. या वाटेवरील पायऱ्यानी जाताना बालेकिल्ल्याचा उद्ध्वस्त दरवाजा त्या शेजारील बुरुज व तटबंदी पहायला मिळते. दरवाजातुन आत शिरल्याल्यावर बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन वाटेच्या उजव्या बाजूस या झाडीत खडकात खोदलेली दोन टाकी दिसतात. वापरात नसल्याने या टाक्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. वाटेच्या पुढील भागात एका पडक्या वास्तुत दगडाची घुमटी बांधलेली असुन त्यात जाखमाता देवीची मुर्ती स्थापन केलेली आहे. या मंदिराकडून वर आल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. पाटीलवाडीतुन इथपर्यंत येण्यासाठी दोन तास लागतात. गडावरून सिल्व्हासाचे दर्शन होते तसेच पुर्वेला जव्हार, भास्कर, उतवड, हर्षगड ही डोंगररंग दिसते. पश्चिमेकडे तलासरी पासून समुद्रापर्यंतचा भाग तसेच महालक्ष्मीचा सुळका, अशेरी, अडसूळ असा परिसर नजरेस पडतो. उजवीकडील गडमाथा पाहुन परत फिरल्यावर डावीकडील माथा फिरायला निघायचे. डावीकडील माथ्यावर मोठमोठे दगड असुन वाढलेल्या झाडीमुळे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. डावीकडील माथा फिरून आल्या वाटेने दोन्ही माथ्यामधील खिंडीत यावे व डावीकडील माथ्याखालील वाटेने डावीकडील डोंगरसोंडेकडे निघावे. या वाटेवर एका ठिकाणी कपारीत नव्याने बांधलेल्या घुमटीवजा मंदिराचे व घराचे अवशेष पहायला मिळतात. सिल्वासा येथील एक साधु या ठिकाणी काही काळ मुक्कामास होता. डाव्या सोंडेवर गडाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या रायपुर गावातुन येणारी वाट असुन या दरवाजाच्या रक्षणासाठी येथे तटबंदी व दोन बुरुज बांधलेले आहेत. डाव्या सोंडेला खाली उतरत जाणारी सलग तटबंदी असुन काही ठिकाणी हि तटबंदी ढासळली आहे. सोंडेवरील सपाट भागात पाण्याचे एक भलेमोठे कोरडे खांबटाके असुन या टाक्याच्या तळाशी असलेली कपार दिसुन येते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने स्थानिक लोकांमध्ये या टाक्याबाबत बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. शिवाजी महाराजांनी १६७०च्या ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा सुरत लुटल्यावर शत्रू पाठलागावर असता गंभीरगडाजवळ आले. जवळ असलेली संपत्ती घोडय़ांवर, खेचरांवर, बैलांवर लादलेली असल्याने महाराजांना वेगाने हालचाल करता येत नव्हती त्यामुळे महाराजांनी त्या संपत्तीचा काही भाग या विवरामध्ये टाकला व त्या धोकादायक परिस्थितीमधून सहीसलामत निसटले. अर्थात हि केवळ दंतकथाच आहे. टाके पाहुन या डोंगरसोंडेवरून आपण माचीवर सर्वप्रथम प्रवेश केला त्या वाटेच्या दिशेने उतरण्यास सुरवात केल्यावर डोंगर उतारावर खडकात खोदलेले अजुन एक टाके पहायला मिळते. टाक्यात पाणी असले तरी पिण्यायोग्य नाही. येथुन माचीवरील तटबंदीच्या कडेने आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो व आपली गडफेरी पूर्ण होते. पायथ्यापासुन गड फिरून इथवर येण्यास चार तास लागतात. गंभीरगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. दक्षिणेकडे मुसुलमानी अंमल सुरु होण्यापूर्वी उत्तरकोंकणचा बराचसा भाग कोळी व वारली जहागिरदारांच्या ताब्यांत होता. जव्हार येथें वारली राजा गादीवर असताना थळघाटाजवळ मुकणें या गांवीं पापेरा अथवा जयबा नांवाचा एक कोळी जमीनदार होता. त्याने कोळी लोक जमवून पेंढ,धरमपूर हीं गांवें ताब्यात घेतली व काठेवाडांत सात वर्षे राहिला. तेथुन परतल्यावर त्याने जव्हारच्या वारली राजाकडून कपटाने त्याचे राज्य घेतलें व त्याला जव्हारपासून ६ कोसांवरील गंभीरगड व त्याच्या भोंवतालचा प्रदेश जहागिरीदाखल दिला. या वारली राजाने गंभीरगडची काही प्रमाणात दुरुस्ती केली. त्यानंतर मुघल आक्रमणावेळी मुकणे राजाने मुघलांशी संधान साधुन वारली राजाला गंभीरगडावर कैद करुन त्याचा खुन केला व गंभीरगड संस्थान जव्हार संस्थानात सामील केले. शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेल्या किल्ल्यांच्या यादीत गंभीरगडचा संदर्भ आढळतो. इ.स.१६७२-७७ दरम्यान मोरोपंत पिंगळे यांनी सेगवा गडाबरोबर गंभीरगडही स्वराज्यात आणला. छत्रपती संभाजीराजे यांनी इ.स.१६८३ रोजी उत्तर कोकणावर स्वारी केली असता त्यांनी तारापूर, अशेरीगडासह गंभीरगडही जिंकून घेतल्याची नोंद आहे. इ.स. १७३७-३९ मधील वसई मोहिमेत चिमाजीअप्पांनी ठाण्यातील इतर किल्ल्यांबरोबर गंभीरगडही जिंकून घेतला. १६ मे १७३९ रोजी शेवटचा हल्ला वसई किल्ल्यावर करून पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातुन कायमचे उच्चाटन केले. नंतरच्या काळात हा किल्ला जव्हारकरांच्या ताब्यात गेला असावा कारण २४ फेब्रुवारी १७५० रोजी गंभीरगड किल्ला व त्याखालील महाल रामदेव राणा रामगीरकर कोळी यांजकडून राघोबा नारायण यांनी जिंकुन घेतल्याची नोंद पेशवे दफ्तरात आढळते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!