खोब्रागड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : १७१२ फुट
श्रेणी : कठीण
गडचिरोली जिल्हा म्हणजे गोंडवणाचं काळीज. गोंडवण साम्राज्याच्या खुणा आजही आपल्या अंगाखांद्यावर बाळगणारे व गोंड राजांचा वारसा सांगणारे अनेक किल्ले या भागात आहेत. कागदोपत्री नाव, गाव, किल्ल्याचा कुठेही उल्लेख वा संदर्भ नसलेले अनेक किल्ले आपल्याला गोंडवणात म्हणजे आजच्या चंद्रपूर, गोंदीया, गडचिरोली जिल्ह्यात पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या दुर्गम भागात असलेले हे किल्ले आजही बऱ्यापैकी तग धरुन आहेत. या आदीवासी भागात असलेले किल्ले व उर्वरीत महाराष्ट्रातील किल्ले यात बराच मोठा फरक असुन गोंदिया-गडचिरोलीतील घनदाट जंगलात असलेले कचारगड, प्रतापगड, टिपागड, राजगड, खोब्रागड सारखे गिरीदुर्ग अभ्यासताना हा फरक प्रकर्षाने जाणवतो. घनदाट जंगलात डोंगर माथ्यावर असलेल्या या दुर्गाना गिरीदुर्ग म्हणावे कि वनदुर्ग हेच कळत नाही. पण डोंगर माथ्यावर घनदाट जंगलात असलेल्या या दुर्गाना तटबंदी सोबत जंगलाचे संरक्षक कवच देखील लाभलेले आहे.
...
गडचिरोली गोंदियात अनेक डोंगर किंवा गावे गड किंवा मेंढा म्हणुन म्हणून ओळखले जातात. तत्कालीन आदिवासी समाज या डोंगरांच्या माथ्यावर वस्ती करताना नैसर्गिक स्थितीचाच वापर करून सुरक्षेसाठी आवश्यक तेवढी तात्पुरती रचीव तटबंदी करत असल्याने या डोंगराना गड अथवा मेढा असे नामाभिमान मिळाले असावे असे वाटते. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात घनदाट अरण्यात खोब्रामेंढा किंवा खोबरागड म्हणुन म्हणुन ओळखला जाणारा डोंगर त्यापैकी एक. या नावाचे लहानसे खेडेवजा गाव या डोंगराच्या पायथ्याशी खोब्रागडी नदीच्या काठावर वसलेले आहे. या डोंगराच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदीर येथील पंचक्रोशीत
जागृत हनुमान मंदिर म्हणुन प्रसिद्ध असल्याने या मंदिरात बऱ्यापैकी लोकांचा राबता असतो. मंदिरामुळे पक्का डांबरी रस्ता थेट गडाच्या पायथ्याशी गेलेला आहे. या भागात सार्वजनिक वाहनांची फारशी सोय नसल्याने येथील भटकंती करताना शक्यतो खाजगी वाहनांचा वापर करावा. खोब्रागड किल्ल्याचा पायथा गडचिरोली शहरापासुन ७५ कि.मी.अंतरावर तर कुरखेडा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३५ कि.मी.अंतरावर आहे. किल्ल्याजवळ असलेले खोबरामेंढा हे गाव किल्ल्याच्या पायथ्यापासुन साधारण २ कि.मी.अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदीरात रहाण्याची सोय असली तरी ती फारशी सुरक्षित नाही व गावात राहण्याची सोय नाही. त्यामुळे आपला मुक्काम शक्यतो कुरखेडा येथे करावा. कुरखेडा येथे मुक्कामासाठी २-३ लहान लॉज आहेत. या भागातील भटकंती करताना शक्यतो अनोळखी ठिकाणावरील मुक्काम टाळावा. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदीराच्या आवारात आपल्याला अतिशय सुंदर असे कोरीवकाम केलेले एक प्राचीन विजयशिल्प पहायला मिळते. मंदिराच्या मागील बाजुस दोन डोंगर असुन त्यातील उजवीकडे असलेल्या डोंगरावर खोब्रागड किल्ला वसलेला पण या दोन डोंगरामध्ये असलेल्या घळीतूनच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. किल्ल्यावर जाण्यापुर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या इतर वास्तु पाहुन घ्याव्यात. हनुमान मंदिरापासून काही अंतरावर घडीव दगडात बांधलेले प्राचीन शिवमंदिर असुन येथे असलेल्या दाट जंगलामुळे ते सहजपणे दिसत नाही. या मंदिराकडे जाताना वाटेत कातळात कोरलेले मारुतीचे शिल्प व एका मोठ्या शिळेवर कोरलेले भैरव शिल्प पहायला मिळते. हनुमान मंदिराकडून ५ मिनिटात आपण शिवमंदिराजवळ पोहोचतो. मंदिराची बांधणी पुर्णपणे घडीव दगडात केलेली असुन त्यावरील दगडी मंडपाचा भार १६ घडीव स्तंभावर तोललेला आहे. मंदिराच्या आतील गर्भगृहाची पडझड झालेली असुन त्यात काही भग्न मुर्ती ठेवलेल्या आहेत. शिवमंदीर पाहुन झाल्यावर पुन्हा हनुमान मंदिराजवळ येऊन मंदिराच्या मागील बाजूने आपल्या दुर्ग चढाईस सुरवात करावी. येथुन डोंगर माथ्यावर जाणारी वाट मळलेली असली तरी किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली नसल्याने मंदिरातून पुजारी अथवा दुसरा कोणी माहीतगार सोबत घ्यावा. डोंगर माथ्यावर जाणारी हि वाट म्हणजे घनदाट जंगलातुन जाणारा उभा चढ आहे. साधारण अर्धा तास डोंगर चढून वर आल्यावर आपल्याला डोंगराच्या दोन्ही बाजूस उतारावर असलेली रचीव दगडांची तटबंदी पहायला मिळते. या भागात कोठेतरी किल्ल्याचा पहिला दरवाजा असावा पण सध्या त्याचा मागमुस लागत नाही. येथुन थोडे वर आल्यावर उजव्या बाजूस किल्ल्यावर जाणारी अस्पष्ट पायवाट आहे पण आपण थेट किल्ल्यावर न जाता मळलेल्या वाटेने सरळ वर जाऊन डोंगराचा माथा पाहुन घ्यावा. डोंगराचा माथा म्हणजे शुद्ध काळा खडक असुन या खडकावर नागशिल्प व शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजुस खाली पाण्याने भरलेला खूप मोठा तलाव असुन या तलावात वर्षभर पाणीसाठा असल्याचे आमच्या सोबत आलेल्या पुजाऱ्याने सांगितले. या डोंगरमाथ्यावरून दूरवर म्हणजे थेट छत्तीसगडपर्यंत पसरलेले घनदाट जंगल व त्यातील डोंगररांगा नजरेस पडतात. हा माथा म्हणजे किल्ल्यासाठी टेहळणीचे ठिकाण असले तरी त्यावर तटबंदी दिसुन येत नाही. डोंगरमाथा पाहुन झाल्यावर आल्या वाटेने उतरण्यासाठी सुरवात करावी व साधारण ५ मिनिटांनी मूळ वाट सोडुन डावीकडे वळण घ्यावे व खाली उतरण्यास सुरवात करावी. या वाटेने ५ मिनिटात आपण दोन डोंगरामधील घळीत पोहोचतो व समोरील बाजुस डोंगराला असलेली तटबंदी दिसण्यास सुरवात होते. येथुन वर जाण्यासाठी अनेक फसव्या वाटा असुन त्या वाटांनी गेल्यास धोकादायक चढ चढुन किंवा तटबंदीवर चढुन किल्ल्यावर जाता येते. या वाटांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात तटबंदी व वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. हि संपुर्ण तटबंदी मोठमोठ्या शिळांनी उभारलेली असुन रचीव स्वरूपाची आहे म्हणजे यात बांधकामासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले दिसून येत नाही. आपण उजवीकडील वाटेने न जाता डावीकडील बाजूस तिरके जात डोंगर चढण्यास सुरवात करावी. या वाटेने जाताना आपल्याला घळीत किल्ल्यास पाणीपुरवठा करण्यासाठी असलेला पण सध्या गाळाने भरून कोरडा पडलेला तलाव नजरेस पडतो. येथुन थोडे वर गेल्यावर गडाची तटबंदी नजरेस पडते व या भग्न तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. हा गडाचा दुसरा टप्पा असुन येथे गडावर प्रवेश करण्यासाठी दुसरा दरवाजा असावा. येथुन उभा चढ चढुन आपण गडाच्या माचीवर म्हणजे तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. येथील दरवाजाची कमान व तटबंदी जरी ढासळली असली तरी दरवाजा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. या भागात बऱ्यापैकी अवशेष शिल्लक असुन त्यात तटबंदी, बुरुज, कातळावरील खळगे व घरांचे चौथरे पहायला मिळतात. या दरवाजाने अजून थोडे वर आल्यावर किल्ल्याचा बालेकिल्ला नजरेस पडतो. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन ती बांधण्यासाठी घडीव तसेच ओबडधोबड दगडांचा वापर केलेला आहे. बालेकिल्ल्याचा प्रवेशमार्ग आजही शिल्लक असला तरी त्याची कमान मात्र नष्ट झाली आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण गडाच्या सर्वात उंच भागावर पोहोचतो. येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असुन त्यात वाट काढून थोडे पुढे आल्यावर डावीकडे अर्धवट गाडलेला बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा पहायला मिळतो. या भागातील तटबंदी, दरवाजा व बुरुज सर्वकाही आजही शिल्लक आहे. या दरवाजात दगडगोटे साठले असल्याने रांगतच बाहेर पडता येते. गडाचा हा भाग आजही सुस्थितीत आहे. येथुन खाली उतरणारी वाट वापरात नसल्याने धोकादायक झाली असुन तेथुन सध्या खाली जाता येत नाही. या वाटेवर कातळात कोरलेले भुयार असल्याचे आमच्या वाटाड्याने आम्हाला सांगितले पण सुरक्षेची साधने सोबत नसल्याने आम्ही त्या वाटेवरून खाली उतरणे टाळले. तटबंदीवरून फेरी मारत आपण ध्वजस्तंभाच्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या आतील आजूस गडदेवतेचे ठिकाण असुन तिचा तांदळा तेथे पुजला जातो. हा बुरुज किल्ल्यावरील सर्वोच्च ठिकाण असुन या बुरुजावर गडाची उंची समुद्रसपाटीपासुन १७१२ फुट आहे. येथुन दिसणारे घनदाट जंगल, टिपागड डोंगररांगा, वैरागड जे काही नजरेस पडते त्यावरुन या किल्ल्याचं महत्व स्पष्ट होतं. या ठिकाणी आपले खोब्रागड दुर्गदर्शन पुर्ण होते व आपण परतीच्या मार्गाला लागतो. संपुर्ण डोंगर व गडमाथा फिरण्यासाठी ५ तास पुरेसे होतात. संपुर्ण गडाची तटबंदी एकुण चार भागात विभागलेली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्वी दोन मार्ग असले तरी सध्या पूर्वेकडील एकच वाट अस्तित्वात आहे व ती देखील फारशी मळलेली नसल्याने सोबत माहीतगार वाटाड्या घेणे सोयीचे ठरते. गडचिरोली जिल्ह्याला फार प्राचीन समृद्ध असा ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचा वारसा लाभला आहे. येथील वैरागड किल्ला, टिपागड किल्ला, खोब्रागड किल्ला, मार्कंडेश्वर मंदिर, लेखामेंढा, इत्यादी ठिकाणे या वैभवाची साक्ष देतात. खोब्रामेंढा यातील खोब्रा म्हणजे पुराण काळातील 'खोब्रा' या नागवंशीय जमातीचे आदिवासी गोंड लोक तर 'मेटा' म्हणजे गोंडी भाषेनुसार पर्वतीय भागात खोब्रा नागवंशीय आदिवासी वास्तव्यास असलेले ठिकाण म्हणजे खोब्रामेंढा. खोब्रागडावर खोब्रा नागवंशातील नित नेवरा कुलसंगे याचे अधिपत्य होते. त्याच्या ताब्यात ५२ गड आणि १८४ परगण्यांचा कारभार होता. नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी आक्रमण करून येथील राजाचा पराभव केला व गडाची नासथूस केली. पुढे या दुर्गम भागाकडे भोसल्यांचे दुर्लक्ष झाले तेव्हा गोंडवंशातील राजा दुर्गशाह सयाम याने शाह घराण्याची स्थापना केलीव या परिसरावर आपला जम बसवला.
(टीप- विदर्भातील गडकोटांची भटकंती करताना विदर्भातील इतिहास संकलक व वास्तु अभ्यासक श्री.गणेश बनसोड यांची मोठ्या प्रमाणात मदत झाली असुन त्याबद्दल त्यांचे खूप खुप आभार!!!! दुर्गभरारी समुह त्यांचा ऋणी आहे.)
© Suresh Nimbalkar