खैराईगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २१५० फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात हरसूलजवळ खैराईगड नावाचा अवशेषांनी परिपुर्ण असा छोटेखानी किल्ला आहे. नाशिक जिह्यातील पेठ ह्या सह्याद्रीच्या उपरांगेत येणारा हा किल्ला नाशिकहुन त्रिंबकेश्वर- जव्हारमार्गे उत्तर कोकणात उतरणाऱ्या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर व घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. समुद्रसपाटीपासून २२७१ फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याच्या आसपास माचीपाडा, साटयाचापाडा, बेहेडपाडा, बोरीपाडा, फणसपाडा, सावरपाडा,ठाणापाडा असे अनेक लहान आदिवासी पाडे आहेत. नाशिक–त्रिंबक-वाघेरा-हरसूल-ठाणपाडा-खैराईपाली हे अंतर ७०कि.मी.असुन खैराईपाली हे जरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी स्वतःचे वाहन असल्यास आपण खैराईपाली गावाच्या अलीकडील साटयाचापाडा या किल्ल्याच्या अगदी पायथ्यालगत असलेल्या वाडीपर्यंत जाऊ शकतो. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. वाडीच्या मागील बाजुस दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाची उजवीकडील एक डोंगरधार वाडीच्या बाजूस उतरताना दिसते
...
तर डावीकडे असलेल्या सपाटीवर या किल्ल्याची माची असुन त्या माचीवर माचीपाडा नावाची १०-१२ घरांची वस्ती आहे. वाडीतून एक कच्चा रस्ता गडाच्या दिशेने जाताना दिसतो. हाच रस्ता पुढे पायवाट बनुन माचीपाडा वस्तीपर्यंत जातो. ह्या रस्त्याचे जेथे पायवाटेत रुपांतर होते तेथुन समोर असलेला उभा चढ चढून गेल्यावर किल्ल्याचा बुरुज दिसतो. येथे छोटेसे सोपे प्रस्तरारोहण करून आपला तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. या वाटेने गडावर प्रवेश करण्यास एक तास लागतो. गडावर जाण्याची दुसरी वाट म्हणजे या पायवाटेने सरळ जाऊन खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायचा व तेथुन दिसणाऱ्या तटबंदीच्या दिशेने बुरुज समोर ठेवून गड चढायला सुरवात करायची. बुरुजाच्या पायथ्याशी आल्यावर बुरूज व गडमाथा उजव्या बाजुला ठेवत त्याला वळसा घालत गडाच्या मागील बाजूस असलेल्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करायचा. हि वाट पहिल्या वाटेच्या तुलनेत खूपच सोपी असुन या वाटेने गडावर पोहोचण्यास दिड तास लागतो. पहिली वाटही फारशी अवघड नसल्याने या वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने उतरल्यास आपला वेळही वाचतो आणी कमी श्रमात संपुर्ण किल्ला फिरून होतो. पहिल्या वाटेने गडावर प्रवेश केल्यावर गडाचा आटोपशीर घेरा नजरेस पडतो. साधारण आयताकृती आकार असलेला हा गडमाथा दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला असुन गडाच्या तटबंदीत एकुण बारा बुरुज आहेत. आपण प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली चार पाण्याची टाकी दिसुन येतात तर उजव्या बाजुला गडाचा आजही सुस्थितीत असलेला बुरुजाचा माथा दिसतो. टाक्याच्या मागील बाजूस असलेल्या उंचवट्यावर एका मोठया वास्तुचा चौथरा दिसुन येतो. चौथऱ्याच्या आकारावरून हा किल्लेदाराचा वाडा अथवा सदर असावी. चौथऱ्याच्या पुढील भागात एक लहानसे तळे असुन या तळ्यात उतरण्यासाठी खोदीव तसेच बांधीव पायऱ्या आहेत. तळ्याच्या मागील भागात पत्र्याने झाकलेले एक लहानसे भिंती नसलेले मंदिर आहे. या मंदिरात शेंदूर फासलेला एक दगड असुन स्थानिक लोक त्याला वेताळदेव म्हणुन ओळखतात. मंदिराच्या आवारातच दोन भग्न तोफा पडलेल्या आहेत. यातील एक तोफ सुत्तरनाळ प्रकारातील आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजुची तटबंदी व बुरुज आजही शिल्लक असुन डाव्या बाजुच्या तटबंदीत एक शौचकुप दिसुन येते. मंदिरा मागील उंचवटा हा गडावरील सर्वात उंच भाग असुन तेथुन संपुर्ण गड परीसर दिसतो. गडावरील तटबंदी मोठया प्रमाणात ढासळत चालली असुन या उंचवट्याच्या खालील भागात पुर्णपणे नामशेष झालेल्या दरवाजाचे अवशेष दिसुन येतात. दरवाजाच्या या उत्तरेकडील खोलगट भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन उंचवट्याच्या डाव्या बाजुला मातीने भरलेले एक कोरडे टाके दिसुन येते. गडाच्या या उंच भागातुन वाघेरा किल्ला, हरिहर, त्र्यंबकगड व दूरवर पसरलेली उतवड डोंगररांग इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडाच्या उध्वस्त दरवाजातून खाली उतरताना दरवाजासमोरील वाटेत उंचवटा फोडुन दगडी चिरे काढण्याचे काम अर्धवट सोडल्याच्या खुणा तसेच एक अर्धवट खोदलेले बुजलेले टाके दिसुन येते. आधी वर्णन केलेल्या या वाटेने आपण माचीपाडा वस्तीच्या वरील बाजुस येतो पण या वाटेने माचीपाडा येथे न जाता डावीकडे साटयाचापाडा वाडीकडे जाणाऱ्या वाटेकडे वळावे. या वाटेने काही अंतर गेल्यावर खालील बाजुस गर्द झाडी दिसुन येते. या झाडीत डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी असुन या टाक्याशेजारील खडकावर शिवलिंग कोरलेले आहे. या टाक्याशेजारी निर्मळ पाण्याचा झरा असुन त्याला वर्षभर पाणी असते. गडावर जाणारी मूळ वाट येथूनच वर जात होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. गडावर पाण्याची एकुण सहा टाकी असली तरी पिण्यायोग्य पाणी एकाही टाक्यात नसल्याने सोबत पाणी बाळगावे. शिवकाळात हा गड मोघलांचे जहागीरदार असलेल्या जव्हारच्या कोळी राजांच्या पर्यायाने मोघलांच्याच ताब्यात होता. खैराई गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार पहिल्या सुरतेच्या मोहिमेवर जाताना शिवाजी महाराजांनी जव्हारमार्गे सुरत गाठली व याकाळात खैराई किल्ला जिंकला. या किल्ल्यावर १ जानेवारी इ.स.१६६४ रोजी महाराजांचा पदस्पर्श झाला पण याला कागदोपत्री काही पुरावा नाही. इ.स. १६७६ मध्ये रामनगर म्हणुन ओळखला जाणारा हा भूभाग जिंकताना शिवरायांनी खैराई किल्ला स्वराजात सामील करून घेतल्याची अधिकृत नोंद आहे. इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला.
© Suresh Nimbalkar