खेडले परमानंद
प्रकार : गढी
जिल्हा : नगर
उंची : 0
श्रेणी : सोपी
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद गावात शिवभारत ग्रंथाचे लेखक कवींद्र परमानंद यांची समाधी असलेली गढी आहे. खेडले गावात कवींद्र परमानंद यांचा जन्म व मृत्यु झाल्याने त्याला खेडले परमानंद नाव मिळाले आहे. खेडले परमानंद हे गाव अहमदनगर शहरापासुन ५० कि.मी.अंतरावर तर नेवासा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २२ कि.मी अंतरावर आहे. गावाबाहेर असलेल्या एका लहानशा टेकडावर कवींद्र परमानंद यांची गढी असुन या टेकडीला तीन बाजुंनी मुळा नदीचा विळखा पडलेला आहे. गढीजवळ आल्यावर समोरच विटांनी बांधलेली गढीची २० फुट उंच तटबंदी व त्यातील दोन बुरुज नजरेस पडतात. तटबंदीचा तळभाग दगडांनी बांधलेला असुन वरील भागात चर्या बांधलेल्या आहेत.एका बुरुजाला पडलेली भेग व आतील बांधकाम वगळता हि तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. तटबंदीच्या उजवीकडील टोकावर गढीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या वरील बाजुस चुन्याचा गिलावा केलेल्या कमानी आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण एका मोठ्या चौकात पोहोचतो.
...
या चौकात मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदीराचे कोरीव दगड पहायला मिळतात. चौकाच्या उजवीकडे असलेल्या चौथऱ्यावर शिवमंदिर असुन या चौथऱ्याच्या तळाशी मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. डावीकडील चौथऱ्याच्या पायऱ्या चढुन आपण एका वाड्याच्या लाकडी सभामंडपात पोहोचतो. या मंडपात समोरील बाजुस कमानी बांधल्या असुन उजवीकडे लहान दरवाजा असलेली खोली आहे. या खोलीतच परमानंद यांची समाधी असुन अखेरच्या काळात त्यांचे या खोलीतच वास्तव्य होते. या समाधीच्या विरुद्ध बाजुस म्हणजे डावीकडे अशीच एक खोली आहे. या सभागृहातून बाहेर पडल्यावर आपण एका बंदिस्त जागेत पोहोचतो. येथे अजुन एक समाधी असुन ती परमानंद यांच्या शिष्यांची असल्याचे सांगतात. या समाधी समोरच एक मोठे जाते व वरवंटा पहायला मिळतो. येथे समोरच वाड्याच्या वरील भागात जाण्यासाठी जिना बांधलेला आहे.वाड्याच्या छतावरून दूरवर पसरलेले मुळा नदीचे पात्र व खुप मोठा परीसर नजरेस पडतो. संपुर्ण गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीच्या समोरील बाजुस श्री भाऊसाहेब रंगनाथ गिरी मोकाशी यांचा १२६ वर्षांपूर्वीची वाडा आहे. या घराण्याकडे खेडले गावाच्या पाटीलकीचे वतन होते. कविंद्र परमानंद हे छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी. महाराजांच्या आग्रा भेटीवेळी ते महाराजांबरोबर होते. काशीवरून पांडित्य मिळवून आलेल्या परमानंद यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कवींद्र ही उपाधी दिली. महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी संस्कृतमध्ये शिवरायांवर शिवभारत हे महाकाव्य लिहिले. या काव्यामुळेच आपल्याला शिवकाळातील काही घटना सुसंगतवार समजुन येतात. खेडले परमानंद हे शिवभारत ग्रंथाचे लेखक कवींद्र परमानंद यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळ मानले जाते. परमानंद हे मुळ नेवासे येथील असल्याने आपले आडनाव नेवासकर लावत तर खेडले गावाला त्यांच्या नावाने 'खेडले परमानंद' म्हणून ओळखले जाते. पण काही इतिहासकार हा दावा खोडून काढतात कारण शिवभारतकार कवींद्र परमानंद यांची अजुन एक समाधी पोलादपूर जि. रायगड येथे आहे. त्यांच्या मते खेडले गावात असलेला मठ व समाधी हि परमानंद गोसावी यांची आहे व या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. पण आपण या वादात न पडता शिवभारतकार कवींद्र परमानंद नेवासकर यांची ही समाधी समजूनच येथे येतो व समाधीपुढे नतमस्तक होतो.
© Suresh Nimbalkar