खिर्डी

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0

कोणाला फारसे परीचीत नसलेले खिर्डी हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेले छोटेसे गाव. या गावात एक गढी असुन गावाचा ग्रामदरवाजा शिल्लक असल्याचे माझ्या वाचनात आले आणी गढीकोटांच्या यादीत या गावाचे नाव सामील झाले. खिर्डी गाव रावेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १२ कि.मी.अंतरावर तर भुसावळ येथुन ३६ कि.मी.अंतरावर आहे. जानेवारी २०२३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती करताना मी या गढीला भेट दिली पण या गावाचा ग्रामदरवाजा पाहण्याचा योग आमच्या नशिबी नव्हता कारण एक महिना आधीच रस्ता रुंदीकरण करताना व या दरवाजाला लागून असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी हा दरवाजा पाडण्यात आला होता. दरवाजा पाडण्यात आला असला तरी या दरवाजाला लागुन असलेले दोन्ही बुरुज मात्र शिल्लक होते. सद्यस्थितीत शिल्लक असलेले हे बुरुज विटांनी बांधलेले असुन त्यांची उंची १५ फुट आहे पण त्यांची मूळ उंची यापेक्षा जास्त असावी. हे दोन अर्धगोलाकार बुरुज वगळता गढीचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. या दरवाजाने आत शिरल्यावर सरळ चालत गेल्यावर आपण सरदार चौकात पोहोचतो. ... येथे डावीकडे आपल्याला गढीवजा वाड्याचे प्रवेशद्वार पहायला मिळते. वाडा अतिशय जुना असुन पडीक अवस्थेत असला तरी काही कुटुंबे तेथे रहात आहेत. वाडा चौसोपी असुन वाड्याच्या लाकडावर अतिशय सुंदर असे नक्षीदार कोरीवकाम केलेले आहे. हा वाडा पाटलांचा वाडा म्हणुन ओळखला जात असला तरी येथे रहात असलेल्या पाटलांच्या वंशजांना त्यांच्या पुर्वजांची कोणतीच माहित नाही. वाडयात असलेल्या एका वयोवृद्ध आजीने या वाड्याचे संबंध बांबरूड राणीचे यांच्याशी असल्याचे सांगीतले. पण हे संबंध म्हणजे सोयरसंबंध कि राजकीय संबंध हे त्यांना स्पष्ट करता आले नाही. या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदार घराण्याकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती सत्ता कोणाचीही असो, त्यांच्याशी जुळवुन घेण्याचे काम हे स्थानिक वतनदार करत असत. हे वतनदार त्यांचा बहुतांशी कारभार त्याच्या गढीतुन सांभाळत असल्याने या भागात गढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसुन येते. हे वतनदार या गढीत वास्तव्यास असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असे पण या वाड्यात तसे काही दिसुन येत नाही. खिर्डी गावची भटकंती करण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!