खापा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : नागपुर
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात आजही आपल्याला आपली ओळख हरवुन बसलेले काही किल्ले पहायला मिळतात. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात असलेला खापा किल्ला त्यापैकी एक. कागदोपत्री कोठेही नोंद नसलेला हा किल्ला त्याचे गडपण संपुन केवळ एक दर्गा म्हणुन या परीसरात परिचित आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अलीकडे लोकांना परिचित झालेला किल्ला अशीच खापा किल्ल्याची ओळख सांगता येईल. आमचे विदर्भातील इतिहास अभ्यासक मित्र श्री. गणेश बनसोडे यांच्या माध्यमातुन मला या किल्ल्याची माहीती मिळाली व काही कामानिमित्त नागपूर येथे गेलो असता या किल्ल्यावर जाण्याची सवड मिळाली. खापा शहराजवळ असलेला हा किल्ला नागपूर शहरापासुन ४० कि.मी.अंतरावर असुन सावनेर येथुन फक्त ८ कि.मी. अंतरावर आहे. खापा शहराबाहेर असलेला हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला असुन किल्ल्याच्या जवळच कन्हान नदीचे पात्र आहे. खापा किल्ला त्यावर असलेल्या दर्ग्याच्या नावे म्हणजे हजरत लष्करशहा शहीद रहमतुल्ला याच्या नावे ओळखला जातो. पण किल्ल्याकडे जाताना किल्ल्याच्या अलीकडे असलेला किल्लावस्ती हा फलक मात्र तो कधीकाळी किल्ला असल्याची जाणीव करून देतो.
...
खापा शहाराबाहेरून जाणारा एक रस्ता आपल्याला थेट किल्ल्याजवळ आणुन सोडतो. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असुन त्याजागी नव्याने सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. असे असले तरी किल्ल्याची मुळ तटबंदी व त्यातील बुरुज आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण पाउण एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदी मध्ये गोलाकार आकाराचे ६ बुरुज तर चौकोनी आकाराचे दोन बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी साधारण १२ फुट उंच असुन त्यावर चर्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा दरवाजा आजही शिल्लक असला तरी त्याची कमान मात्र नष्ट झालेली आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडील बाजूस फांजीवरून दरवाजाच्या शेजारी असलेल्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण आता या बुरुजाचीच पडझड झालेली आहे. दरवाजा समोर काही अंतरावर हजरत लष्करशहा शहीद रहमतुल्ला यांची कबर असुन या कबरी भोवताली इतर काही लहान लहान कबरी आहेत. किल्ल्याच्या चार टोकावर असलेल्या चार गोलाकार बुरुजावर नव्याने बांधलेल्या कबरी असुन किल्ल्यातील थोडीफार मोकळी जागा वगळता संपुर्ण किल्ल्याचे कब्रस्तान करण्यात आहे. किल्ल्यात छत नसलेली एक जुनी इमारत असुन ती वास्तु म्हणजे मस्जिद असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्याची एका बाजूस असलेली तटबंदी तोडुन त्यातुन किल्ल्यात येण्यासाठी दरवाजा व पायऱ्या बांधलेल्या आहेत. या व्यतिरिक्त किल्ल्यात नव्याने बांधलेल्या काही धार्मीक वास्तु आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर असलेले मोठे झरोके पहाता तेथे कधीकाळी तोफा असण्याची शक्यता आहे. याशिवाय संपुर्ण तटबंदीमध्ये व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. किल्ल्यात असलेल्या स्थानिकांशी बोलणे झाले असता ते हा किल्ला असल्याचे सांगतात पण किल्ल्याचा इतिहास विचारला असता ते संदर्भ नसलेल्या बाबांच्या कथा सांगायला सुरवात करतात. त्यामुळे किल्ल्याचा काळ व इतिहास कळून येत नाही. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता हा किल्ला साधारण १८ व्या शतकात म्हणजे रघूजीराजे भोसले यांच्या काळात बांधला गेला असावा असे वाटते. कदाचित हा किल्ला नसुन एखादी गढी असण्याची जास्त शक्यता आहे. संपुर्ण किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो व आपण परतीच्या मार्गाला लागतो.
© Suresh Nimbalkar