खतलवाड कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : वलसाड

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या सागरीपट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन थोडेफार शिल्लक असलेले अवशेष पहायला मिळतात. संजाणजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला कतलवाडा कोट हा त्यातील एक मध्यम आकाराचा कोट. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा भाग भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांचे येथुन उच्चाटन झाल्यावर हा प्रांत स्वराज्यात आल्याने मी या कोटांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. आमचे एक दुर्गवेडे मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्ही या कोटाला भेट देऊ शकलो. कतलवाडा कोट पहाण्यासाठी संजाण हे जवळचे रेल्वे स्थानक असुन संजाण- कतलवाडा हे अंतर ५ कि.मी.आहे. ... कतलवाडा येथे जाण्यासाठी संजाण रेल्वे स्थानकातून खाजगी रिक्षांची सोय आहे. कतलवाडा बाजारपेठेतुन गायत्री मंदिराकडे जाणारा रस्ता आपल्याला कतलवाडा कोटाजवळ घेऊन जातो. स्थानिक लोक कतलवाडा कोटास मेडी म्हणुन ओळखतात. तुंब खाडीकाठी असलेल्या एका लहानशा उंचवट्यावर हा कोट बांधलेला असुन या कोटाचा परिसर साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. कोटाजवळ जाताच सर्वप्रथम नजरेस पडते ती तटबंदीची भिंत. या भिंतीजवळ कोटाला पाणीपुरवठा करणारी विहीर असुन वापर नसल्याने या विहिरीची आता कचराकुंडी झाली आहे. येथे तटबंदीला लागुनच एक भग्न मुर्ती अवशेष ठेवलेला आहे. कोळीवाड्याची वस्ती वाढत या कोटापर्यंत आली असुन तिने या कोटाचा घास घेण्यास सुरवात केली आहे. कोटाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन सर्वत्र झाडी माजलेली आहे. नदीच्या बाजुने कोटाभोवती फिरताना नदीपात्राला लागुनच असलेली उध्वस्त तटबंदी दिसते. म्हणजे खाडीच्या बाजुने कोटाला दुहेरी तटबंदी असावी. खालील बाजुस असलेली तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असली तरी वरील बाजुस शिल्लक असलेल्या तटबंदीतील बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या व तोफेसाठी असलेला झरोका पहायला मिळतो. या बुरुजावर चुन्यामध्ये कोरलेले पोर्तुगीज चिन्ह पहायला मिळते. किल्ल्याचा परीसरात मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन आत काटेरी झुडुपे वाढल्याने नीटपणे फिरता येत नाही. कोटाच्या बांधकामासाठी ओबडधोबड दगड वापरलेले असुन आतील बाजुस काही ठिकाणी चुन्याचा गिलावा दिलेला आहे. कोटाचा आकार व स्थान पहाता कोटाचे इतर अवशेष असावेत पण झाडी वाढल्याने ते पुर्णपणे झाकोळले आहेत. कोटाची पुर्ण प्रदक्षिणा करता येत नसल्याने आपली भटकंती थोडक्यातच आटोपती घ्यावी लागते. कतलवाडा कोटाला लागुन असलेले तुंब नदीचे खाडीपात्र थेट समुद्राला भिडत असल्याने आजही या नदीपात्रात लहान होडया चालतात. मध्ययुगीन काळात कतलवाड हे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदर होते. या बंदरातील जहाजे थेट आतपर्यंत येत असल्याने पोर्तुगीजांनी या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती केली. या खाडीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नदीपात्रात पलगाम कोट तर आतील बाजुस संजाण किल्ला आहे. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्र किनाऱ्यावरच बांधले. वसई ते दमण परिसरातील गढीकोट हे समुद्राशी समांतर रेषेत बांधलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३७ ते १७३९च्या वसई मोहिमेदरम्यान हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!