कोळकेवाडी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : १८३० फुट
श्रेणी : कठीण
कोकणातील बरेच किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असुन आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत. पण बारवाई व कोळकेवाडी यासारखे किल्ले तर इतिहासाच्या पानातही दिसत नाही. शिवपुर्वकाळात नष्ट झालेला व केवळ दसपटीचा इतिहास या पुस्तकातुन ओझरता डोकावणारा असाच एक किल्ला म्हणजे कोळकेवाडी दुर्ग. आज या डोंगरावर बुरुज,तटबंदी यासारखे किल्ला म्हणुन कोणतेही अवशेष शिल्लक नसुन काही लेणी,पाण्याचे टाके व एका वास्तुचे तुरळक अवशेष दिसुन येतात. गडावर फारसे कोणी जात नसल्याने जाण्याची वाट वापरात नाही. या भागात भुकंपाचे धक्के वारंवार बसत असल्याने गडावरील पायवाटा धोक्याच्या आहेत. त्यामुळे वाटाड्या असल्याशिवाय गडावर जाऊ नये. गडाखाली धनगरवाडीत असलेल्या घरातील सुरेश कोकरे व त्यांची दोन्ही मुले यांना संपुर्ण गडाची माहीती आहे त्यामुळे शक्यतो त्यांना घेऊन गड पहाणे योग्य ठरते. चिपळूण शहरापासून १० कि.मी अंतरावर कोळकेवाडी धरण आहे.
...
या धरणाच्या मागील बाजुस सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन सुटावलेल्या डोंगरावर कोळकेवाडी किल्ला आहे. कोळकेवाडी दुर्गावर जाण्यासाठी चिपळूण कराड मार्गावरील अलोरे गावातुन कोळकेवाडी गावाच्या टोकाला असलेला धनगरवाडा गाठावा लागतो. चिपळूण एस.टी.डेपोतून कोळकेवाडीतील बुद्धवाडीपर्यंत बस येत असल्याने बरेचजण बुद्धवाडीतुन धनगरवाडा गाठण्याचा सल्ला देतात पण हा मार्ग पुर्णपणे गैरसोयीचा आहे. या मार्गाने गेल्यास कोळकेवाडी धरणाच्या पाण्याचा फुगवटा पार करण्यासाठी दुरपर्यंत चालत जावे लागते त्यामुळे गडावर जाण्याचा एक तास वाढतो शिवाय बुद्धवाडीतुन कोणीही वाटाड्या मिळत नाही. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अलोरे-हसरेवाडी-जांभरई-धनगरवाडा. खाजगी वाहन असल्यास या मार्गाने थेट धनगरवाडा असलेल्या पुलापर्यंत जाता येते. धनगरवाडयाच्या शेवटी असलेल्या सुरेश कोकरे यांच्या घरामागील टेकडीवरून गडावर जाणारी वाट आहे. टेकडी चढुन वर आल्यावर आपल्याला टेकडीच्या दुसऱ्या बाजुने आलेला कच्चा रस्ता दिसतो. रोजगार हमी योजने अंतर्गत वाहनांसाठी बांधलेल्या या कच्च्या रस्त्याचे सध्या पायवाटेत रुपांतर झालेले आहे. हा रस्ता जेथे संपतो तेथे उजव्या बाजूला एक पायवाट गर्द रानात शिरते. गडावर जाणारी हि वाट दाट जंगलातुन व कारवीच्या रानातून जाते. हे जंगल पार करून आपण गडाच्या डोंगरसोंडेसमोर असलेल्या लहान पठारावर येतो. पावसाळ्यात गावकरी येथे गुरे चरण्यासाठी आणतात. येथुन संपुर्ण कोळकेवाडी किल्ल्याचे दर्शन होते व खऱ्या अर्थाने गडावर जाणारी पायवाट सुरु होते. सोंडेवरील वाटेने गड चढत आपण गडाच्या डोंगराला भिडतो. येथे एक पायवाट गडाचा डोंगर डावीकडे तर दरी उजवीकडे ठेवत पुढे जाताना दिसते. मुळ वाट सोडुन या वाटेने गेले असता २०-२२ फुटावर कातळात कोरलेली एक मोठी गुहा पहायला मिळते. गुहेचे तोंड लहान असुन गळतीमुळे गुहेत पाणी जमा झाले आहे. पाणी पिण्यायोग्य असुन गडावर केवळ इथेच पाणी उपलब्ध आहे. गुहेच्या एका कोपऱ्यात गडावर सापडलेली विरगळ, भग्न नंदी यासारखे अवशेष ठेवले आहेत. या गुहेकडून एक अवघड पायवाट पुढे जाताना दिसते. गुहा पाहुन परत मुळ वाटेवर यावे व पुढील सोंड चढण्यास सुरवात करावी. वाट निमुळती असुन त्यावर गवत वाढलेले असल्याने अतिशय सावधगिरीने चढाई करावी. या वाटेवर दोन-तीन ठिकाणी खंदक खोदुन वाटेला अधिक सुरक्षा देण्यात आली आहे. सोंडेच्या वरील भागात आल्यावर एक वाट डावीकडे कड्याला चिटकून पुढे जाताना दिसते. या वाटेने कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या एकात एक अशा दोन गुहा दिसतात. आतील गुहेला लहान दरवाजा असुन तळात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. यातील बाहेरील गुहा टाक्यासारखी असुन या टाक्याला कडयाच्या दिशेने उभ्या कड्यावर दरवाजा सारखी खाच मारली आहे. या गुहेचे तोंड पश्चिमेला असल्याने आतील गुहेचे वारा व पाउस यापासून रक्षण करण्यासाठी बाहेरील गुहेची कातळकोरीव भिंत उभारली आहे व बाहेरील गुहेत जमा होणारे पाणी या खाचेतुन बाहेर काढलेले आहे. बाहेरील टाक्याच्या पुढील भागात अजुन काही गुहा असुन या गुहा पहाण्यासाठी टाक्यातून प्रस्तरारोहण करून पुढे जावे. टाक्याच्या पुढील भागात असलेली गुहा मोठ्या प्रमाणात मातीने भरली असुन या गुहेच्या पुढील भागात मातीने भरलेले टाके आहे. या गुहेच्या पुढील भागात दोन भागात विभागलेली गडावरील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेच्या दर्शनी भागात दरवाजावर दोन झरोके कोरले असुन त्यांच्या मध्यभागी जाळीदार नक्षी कोरली आहे. गुहेच्या आतील बाजुने या झरोक्याजवळ पोटमाळा कोरलेला आहे. या गुहेच्या आतील बाजुस असलेलेली गुहा कातळ भिंतीने बाहेरील गुहेपासून वेगळी केली असुन आत प्रकाश जाण्यासाठी या भिंतीत दोन झरोके आहेत. आतील गुहेत जाण्यासाठी शेजारील दुसऱ्या गुहेतुन मार्ग आहे. आतील गुहेत मोठया प्रमाणात वाटवाघळांची वस्ती असुन संपुर्ण गुहा त्यांच्या विष्ठेच्या उग्र दर्पाने भरलेली आहे. या सर्व गुहा म्हणजे अर्धवट कोरलेली लेणी असुन नंतर याचा वापर किल्ल्यासाठी केला गेला असावा. गुहा पाहुन आलेल्या मार्गाने परत फिरावे व सोंडेवर येऊन किल्ल्याच्या माथ्याच्या दिशेने वाटचाल करावी. हि वाट अतिशय निमुळती व गवताने घसरडी बनलेली असल्याने येथुन शक्यतो कोणी वर जात नाही. गडमाथा समुद्रसपाटीपासून १८६० फुट उंचावर असुन अतिशय निमुळता आहे. गडमाथ्यावर गवतात लपलेला एक लहान व एक मोठा असे दोन चौथरे असुन यातील मोठ्या चौथऱ्यावर उघडयावर चार विरगळ एक भग्न शिवलिंग व एका मुनीची मुर्ती ठेवली आहे. गडमाथ्याच्या दुसऱ्या बाजूस दरी असुन दरीमागे सह्याद्रीची डोंगररांग पसरलेली आहे. माथ्यावरून या दरीत उतरण्यासाठी निसरडी पायवाट असुन आपण पाहिलेल्या सर्वात सुरवातीच्या पाणी असलेल्या गुहेकडून या दरीत जाण्यासाठी दुसरी पायवाट आहे. दरीतुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील डोंगरावर चढल्यावर दगडात खोदलेल पाण्याच टाक लागत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाके पहाण्यासाठी पाउण तासाची पायपीट करावी लागते शिवाय वाटही धोकादायक आहे त्यामुळे माथ्यावरच आपली गडफेरी पुर्ण करावी. डोंगररागेच्या उजव्या बाजुस असलेल्या डोंगरावर जंगली जयगड आहे. गडावरून कोळकेवाडी धरण व सह्याद्रीची रांग अगदी चित्र रेखाटल्यासारखी सुंदर दिसते. पायथ्यापासुन गड फिरून परत जाण्यासाठी ५ तास लागतात. सह्याद्री डोंगर रांगेपासुन सुटावलेल्या डोंगरावरील या किल्ल्याचे स्थान पाहता देश व कोकण यांना जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या रक्षणासाठी व टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. पेढांबे येथील दसपटीचा इतिहास या पुस्तकात कोळकेवाडी दुर्गाचा उल्लेख येतो. १३ व्या शतकात बहामनी राजवटीत बाराराव कोळी यांच्या ताब्यात हा भाग होता. मोरे,सुर्वे यांच्या प्रमाणे हे बाराराव या भागावर आपली सत्ता राखुन होते. या भागात असलेला बारवाई किल्ला त्यांचे मुख्य ठिकाण होते. या किल्ल्यासोबत कोळकेवाडी किल्लाही बारारावांच्या ताब्यात होता. बहामनी सुलतानाने या बारारावाना पराभुत करण्यासाठी तीन मोहिमा केल्या. इ.स.१३८० च्या सुमारास पहिल्या मोहीमेतील शेख आकुसखान यास बारारावानी कुंभार्ली घाटात सोनपायाजवळ कोकणवावी-पोफळी येथे पराभूत केले तर दुसऱ्या मोहीमेतील भाईखान यास दळवटणे येथे पराभूत केले. तिसऱ्या वेळी मोहीमेतील सरदार बहादूरशेख यास चिपळूणजवळ ठार केले. या सरदाराच्या नावानेच आज चिपळूण येथील बहादुरशेख नाका ओळखला जातो व त्याचा पीर पुजला जातो. अखेरीस बहामनी सरदारांनी भेदनीतीचा अवलंब केल्याने माधवराव रविराव शिंदे शत्रुला फितुर झाले. शेवटी बारारावांचे राज्य बुडाले व सुलतानाने शिंद्यांना चोवीस गावाची खोती दिली. या बारा रावांच्या बायका कलमणी येथे सती गेल्या.
© Suresh Nimbalkar