कोरे कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोरे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून एडवन व कोरे येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. एडवन नाक्याहून थोडे पुढे गेल्यावर या रस्त्याला दोन फाटे फुटतात. यापैकी डावीकडील रस्ता दातिवरे येथे जातो तर उजवीकडील रस्ता कोरे गावात जातो. कोरे कोट सफाळे स्थानकापासून १3 कि.मी.तर एडवन नाक्यापासून २ कि.मी.वर आहे. कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने कोरे कोट म्हणुनच ओळखले जाते. कोरे कोट गावामध्येच भर वस्तीत असुन कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. कोरे गावात गेल्यावर दत्तमंदिर या थांब्याजवळ कोरे कोटाचे अवशेष नजरेस पडतात. कोरे कोटाची केवळ एका बाजूची अर्धवट भिंत अवशेषरूपाने शिल्लक आहे. ... या भिंतीवरच एका घराचे बांधकाम झाल्याने उर्वरीत भागावर आधुनिक सिमेंट संस्करण झालेले आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट पोर्तुगीजकालीन लहानसे शासकीय व प्रशासकीय कार्यालय असावे. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. स्थानिक लोक या वास्तूला माडी म्हणुन संबोधत असल्याने हि वास्तू दुमजली असावी व नंतरच्या काळात हिचा वापर राहण्यासाठी केला गेला आहे. याच्या भोवतालच्या भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हि वास्तू दुमजली होती आणि ते कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास ५ मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन कोरे गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची कामगिरी करत आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!