कोरेगाव

प्रकार : गढी

जिल्हा : अहमदनगर

उंची : 0

महाराष्ट्रातील अनेक गढ्या आज वापरात नसल्याने ओस पडल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. काही गढ्या ओस पडल्याने व त्याच्या मालकांचा कोणताही पत्ता नसल्याने स्थानिकांनी या गढ्यांचा ताबा घेऊन तेथे मंदीर किंवा तत्सम उपक्रम सुरु केले आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी गढीच्या वंशजांनी आजच्या काळात गढीची देखभाल करणे शक्य होत नसल्याने या गढ्या स्थानीक संस्थाना त्यांचे स्थानिक उपक्रम राबविण्यासाठी बहाल केलेल्या आहेत. पण काहीही झाले तरी गढीची दुर्दशा काही संपत नाही व नित्य नेमाने गढीची पडझड सुरूच आहे. स्थानिक उपक्रमासाठी बहाल झालेली अशीच एक गढी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याची भटकंती करताना कर्जत तालुक्यात असलेल्या कोरेगाव या गावात पहायला मिळते. दुर्गप्रेमिनी कोरेगाव गावाचा उल्लेख ऐकताना एक गोष्ट आवर्जुन ध्यानात घ्यावी आणि ती म्हणजे पुणे किंवा सातारा येथे असलेले कोरेगाव हे ठिकाण या कोरेगाव ठिकाणापासुन पूर्णपणे वेगळे आहे. चला तर मग या अपरिचित अशा कोरेगाव गढीची भटकंती करून घेऊ. ... अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले कोरेगाव हे गाव अहमदनगर शहरापासुन ७५ कि.मी.अंतरावर तर कर्जत या तालुक्याच्या ठिकाणाहुन फक्त ६ कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश करताना कधीकाळी हे गाव बंदिस्त तटबंदीच्या आत वसलेले होते याची जाणीव होते. आज हा नगरकोट पुर्णपणे नष्ट झाला असला तरी काही ठिकाणी त्याच्या अस्तीत्वाच्या खुणा पहायला मिळतात. गावाबाहेर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आपल्याला या कोटाची तटबंदी, उध्वस्त दरवाजा तसेच दरवाजाच्या आतील बाजूस असलेली पहारेकऱ्याची देवडी देखील पहायला मिळते. हा दरवाजा उत्तराभिमुख असुन दरवाजासमोर मारुतीचे मंदीर आहे. या मंदिरापासुन काही अंतरावर खूप मोठी मध्ययुगीन विहीर पहायला मिळते. याशिवाय गावाच्या उत्तर बाजूस अजून एक दरवाजा असल्याचे स्थानिक सांगतात पण हा दरवाजा आता पाडुन त्या जागी आता आधुनिक कमान उभारण्यात आली आहे. या कमानी जवळ एक जुने दगडी मंदीर असुन काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गावच्या मध्यभागी एक जुनी गढी असुन या गढीच्या आत नव्याने बांधलेले कोरेश्वर मंदीर आहे. आयताकृती आकाराची हि गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या या तटबंदीत आता ढासळलेल्या अवस्थेतील दोन बुरुज पहायला मिळतात. गढीचे उत्तराभिमुख असलेले मूळ प्रवेशद्वार आजही शिल्लक असले तरी त्याशेजारील बुरुज व इतर बांधकाम नव्याने करण्यात आले आहे. गढीच्या इतर भागात असलेली तटबंदी हि अतिशय जीर्ण अवस्थेत असुन काही काळाचीच सोबती आहे. या तटबंदीचे तळातील काम हे मोठमोठ्या घडीव दगडात केलेले असुन त्यावरील काम ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. हे बांधकाम बहुदा शिवपुर्वकालीन असावे. गढी पुर्णपणे अपरिचित असुन गढीचा इतिहास स्थानिकांना देखील माहित नाही. गावचा फेरफटका केला असता एका ठिकाणी कट्ट्यावर मध्यम आकाराची तोफ पहायला मिळते. कोरेगावचा हा सर्व अपरिचित इतिहास पाहण्यासाठी एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!