कोरीगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३००० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई पुण्याजवळ थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणावळ्याच्या दक्षिणेला पवनमावळ व पौडखोऱ्याचा काही भाग येतो. मुळशी धरणाच्या परीसरात असलेल्या या मावळात येणाऱ्या ३६ गावामुळे हा भाग ३६ कोरबारस म्हणुन ओळखला जातो. कधीकाळी दुष्काळग्रस्त असलेला हा भाग सहारा प्रकल्प व धनदांडग्या लोकांनी येथे केलेल्या जमीन खरेदीमुळे चांगलाच समृद्ध(?) झाला आहे. या भागात तेलबैला, कैलासगड, कोरीगड आणि घनगड यासारखे किल्ले असुन लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. घाटमाथ्यावर असल्यामुळे या किल्ल्यावरून एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. सोबत खाजगी वाहन असल्यास लोणावळ्याहुन २२ कि.मी. अंतरावर असलेला कोरीगड उर्फ शहागड व त्यासोबत घनगड हे दोन्ही किल्ले एका दिवसात सहजपणे सर करता येण्यासारखे आहे. ... कोरीगडला जाण्यासाठी लोणावळा येथुन आंबवणेमार्गे जाणारी बस पकडावी व पेठ-शहापूर अथवा आंबवणे गावात उतरावे. आंबवणे गावातुन गडमाथ्यावर असलेली अखंड तटबंदी नजरेस पडते. या दोन्ही गावातुन गडावर जाण्यासाठी वाटा असुन पेठ शहापुर हे किल्ल्याच्या पायथ्याशी गडाची बाजारपेठ असलेले गाव आहे. यातील पेठ शहापुर गावातुन गडावर जाणारी वाट हि आंबवणे गावातून जाणाऱ्या वाटेपेक्षा चांगलीच मळलेली असुन तुलनेने सोपी देखील आहे. गडावर असलेल्या टाक्यात पाणी मिळेल याची शाश्वती नसल्याने वाटेतील हातपंपावर पाणी भरून घ्यावे. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला अर्ध्या तासात गडाखाली असलेल्या पायऱ्यांजवळ घेऊन जाते. गडावर जाणाऱ्या मुळ पायवाटेच्या जागी सहारा समुहाने या पायऱ्या १९९५ साली बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वाटेने वीस मिनिटांत आपण कातळात कोरलेल्या एका गुहेपाशी पोहोचतो. या गुहेच्या आत दोन दालने असुन शेजारील कातळात गणपती कोरलेला आहे. मुर्तीच्या वरील भागात लोखंडी छप्पर घालण्यात आले आहे. या गुहेसमोर १९८० सालापर्यंत एक बुरुज व त्याखाली दरवाजाचा उंबरठा शिल्लक होता आता मात्र तेथे काहीच दिसत नाही. येथून काही पायऱ्या चढून वर गेल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. टाके पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजुस झीज झालेली एक लहान गुहा असुन या गुहेच्या खालील बाजुस पाण्याचे लहान टाके आहे. येथुन पाच मिनिटात आपण गडाच्या पुर्वाभिमुख असलेल्या गणेश दरवाजात पोहोचतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाच्या पुढील भागात काटकोनात पुर्णपणे नामशेष झालेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. गडाचा माथा म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेले पठार आहे. गडाला कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असले तरी संपुर्ण तटबंदी बांधुन काढली आहे. हि तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असुन एखाद-दुसरा अपवाद वगळता तटावरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. या तटबंदीत जागोजागी बुरुज बांधलेले असुन बंदुकी व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व झरोके ठेवलेले आहेत. दरवाजासमोर काही अंतरावर शंकराचे मंदिर असुन मंदिराच्या आवारात चार तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिरामागे दोन तलाव असुन या तळ्यात मोठया प्रमाणात शेवाळ वाढलेले असुन काळे विंचू आहेत. त्यामुळे पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. तलावाजवळच वाड्याचे अवशेष आहेत. तळ्यांच्या पुढे पश्चिमोत्तर कड्यात काही गुहा आहेत. यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी विष्णूची मूर्ती आहे. येथुन तटाच्या फांजीवर चढुन पेठ शहापूर गावाच्या दिशेला असलेल्या उत्तरेकडील झेंडा बुरुजावर जावे. या बुरुजावरुन पेठ शहापुर गावातुन येणारी वाट, समोर नागफणीचे टोक, राजमाची तर उजवीकडे तुंग,मोरगिरी, तिकोना असा दूरवरचा परिसर दिसतो. या बुरुजावरुन मागे फिरून आपण सुरवात केलेल्या शंकराच्या मंदिराकडे यावे. येथुन पठारावर दुरवर गडदेवता कोराई देवीचे जीर्णोद्धार केलेले मंदिर दिसते. या मंदिराकडे जाताना वाटेत हनुमान मंदिर असुन या मंदिरामागे कातळात कोरलेला लहान तलाव आहे. कोराईदेवीच्या मंदीरातील मुर्ती जुनी असुन चार फुट उंचीच्या या चतुर्भुज मुर्तीच्या चारही हातात शस्त्रे आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकल्यावर या देवीचे सोन्याचे दागिने मुंबईला नेऊन मुंबादेवीला अर्पण केले. मंदिरासमोरच एक दीपमाळ असुन शेजारी महिषासुरमर्दीनीची मुर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजुस तटावरील चौथऱ्यावर लक्ष्मी नावाची ८ फुट लांबीची मोठी तोफ आहे. मंदिरापुढे काही अंतरावर खालील बाजूस बांधलेला गडाचा सुस्थितीत असलेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. आंबवणे गावातुन गडावर आल्यास या वाटेने आपला गडावर प्रवेश होतो. गडावर फिरताना मोठ्या प्रमाणात घरांचे अवशेष तसेच अजुन एक तोफ पहायला मिळते. गडावर आजही एकुण सहा तोफा आहेत. गडाच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात बुरुज असुन दक्षिणेच्या टोकावर असलेला चिलखती बुरूज आपले वेगळेपण राखुन आहे. या बुरुजाला दुहेरी तटबंदीने अधिक बळकट केलेले आहे. या बुरुजावरून समोर मृगगड, सवाष्णीचा घाट,वाघजाई घाट,तेलबैला, मुळशीचा जलाशय व त्याच्या काठावर असलेले सहारा समुहाचे बंगले असा सर्व परिसर दिसतो. गडावर रहायचे असल्यास मंदिरात चार पाच जणाची राहण्याची सोय होते. येथुन गणेश दरवाजापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यासाठी दीड तास लागतो. गडाबद्दल फारसा इतिहास ज्ञात नसला तरी गडाच्या पश्चिमोत्तर भागात असलेल्या गुहा आणि जमीनीतील टाके गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. बहामनी राज्याचे विघटन झाल्यावर इ.स. १४८६-१४९० दरम्यान हा किल्ला निजामशाहीत सामील झाला. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड मराठयांनी जिंकून घेतला. इ.स.१७०० मध्ये पंत सचिवांनी हा किल्ला मुघलाकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो. यानंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आल्यावर राजकैदी ठेवण्यासाठी घनगड व याचा वापर करण्यात आला. ११,१२ व १३ मार्च १८१८ असे सलग तीन दिवस कर्नल प्रॉथरने किल्ल्यावर तोफगोळ्यांचा वर्षाव करून किल्ला भाजून काढला पण किल्ला शरण आला नाही. मात्र १४ मार्च १८१८ रोजी त्यातील एक गोळा दारूकोठारावर पडला व गडावर आग लागली. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली व त्यांना गड सोडावा लागला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!