कोपर्डे
प्रकार : गढी/ नगरकोट
जिल्हा : सातारा
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात वाडे व गढीकोटांची संख्या हजारोच्या घरात आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. कोपर्डे गावात असलेले पानिपतकार शिंदे यांच्या तीन वाड्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. जेष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव शिवदे यांचे महाराष्ट्रातील गढी आणि वाडे हे पुस्तक वगळता इतर कोठेही या वाड्यांचा उल्लेख येत नाही. या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.
...
खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील शिंदे यांची गढीवजा गढी पुण्यापासुन सासवड-जेजुरी-निरा-लोणंदमार्गे ९० कि.मी.अंतरावर तर साताऱ्या पासुन ४० कि.मी. अंतरावर आहे. लोणंदहुन जाताना तांबवे गावापुढे डावीकडे कोपर्डे गावाचा फाटा लागतो. जवळपासच्या १३ गावचे वतन असलेले पानिपतकार शिंदे यांचे हे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर गतकाळाच्या खुणा बाळगुन आहे. एकेकाळी कोपर्डे गाव एका कोटात वसलेले असुन कधीकाळी या गावाला तटबंदी व बुरुज असल्याच्या खुणा जागोजाग दिसुन येतात. कोपर्डे गावात आपला प्रवेश हा या वेशीच्या दरवाजातूनच होतो. संपुर्ण दगडी बांधणीतील हा दरवाजा १८-२० फुट उंच असुन याच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत. वेशीतून आत प्रवेश करताच डाव्या बाजुस पहिला वाडा असुन या वाडयाची घडीव दगडात बांधलेली तटबंदी व बुरुज आपले लक्ष वेधुन घेते. तटबंदीचा फांजीवरील भाग विटांनी बांधलेला असुन दरवाज्याच्या वरील भागात नगारखान्यासारख्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. दरवाज्याच्या आतील दोन्ही बाजुस देवड्या असुन या दोन्ही दरवाजाशेजारी वरील भागात जाण्यासाठी बंदीस्त दगडी जिने आहेत. या जिन्याने तटावर आले असता संपुर्ण वाड्याचा अंतर्भाग पहायला मिळतो. सध्या अस्तित्वात असलेले बांधकाम पहाता हा वाडा दुमजली किंवा तीनमजली असावा. चारही बाजुस तटबंदी व चार टोकास चार बुरुज अशी रचना असलेल्या या वाडयाची तटबंदी व बुरुज आज पुर्णपणे कोसळलेले असुन केवळ दर्शनी भागातील तटबंदी व त्यातील एक बुरुज आज शिल्लक आहे. या बुरुजाच्या आत वरील मजल्यावर एक खोली असुन त्यात जाण्यासाठी वेगळा जिना आहे. मूळ वाड्याचा हा एकमेव अवशेष शिल्लक असुन वाड्यात नव्याने बांधलेल्या घरांनी इतर अवशेष भुईसपाट केले आहेत. गावात असलेल्या तीन वाड्यापैकी हा वाडा सर्वात मोठा असुन याचे आवार अर्ध्या एकरपेक्षा जास्त आहे. वाड्याच्या आवारात घडीव दगडांनी बांधलेली पायऱ्या व कमान असलेली विहीर असुन या विहिरीचे पाणी दगडी पाट बांधुन वाड्यात फिरविले आहे. उर्वरित दोन वाडे या वाड्यापासून काही अंतरावर असुन हे दोन्ही एकमेकाला खेटुन आहेत. यातील एक वाडा मोठया प्रमाणात नष्ट झाला असुन दुसरा वाडा मात्र तग धरून आहे पण याच्या आत नव्याने बांधलेल्या घरांनी आतील अवशेष पुर्णपणे नष्ट केले आहेत. या वाडयाची तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेली असुन तटबंदीचा वरील भाग विटांनी बांधलेला आहे. आयताकृती आकार असलेल्या या वाडयाचा परीसर पाव एकरचा असुन त्यात चारही बाजूस असणारी तटबंदी व टोकाचे चार बुरुज आजही शिल्लक आहेत. तटबंदी शिल्लक असली तर तटावर जाण्यासाठी असलेला जिना कोसळल्याने तटावर जाता येत नाही. वाड्याचा मूळ दरवाजा आजही शिल्लक असुन याच्या वरील भागात देखील नगारखान्यासारखी वास्तु दिसुन येते. या दोन्ही वाडयाच्या अंतर्गत भागात पाण्याची सोय दिसुन येत नाही. या वाडयाच्या समोरील बाजूस काही अंतरावर नदीकाठी एक दगडी बांधकामातील एक शिवमंदीर आहे. या शिवमंदिराशेजारी दोन समाधीचे चौथरे असुन यातील एका चौथऱ्यावर छत्री बांधली आहे. या चौथऱ्यावरील बांधकामात असलेला शिलालेखाचा दगड काढुन तेथे नवीन दगड बसविलेला आहे. या शिवाय तेथील पिंपळाच्या झाडाखाली एक विरगळ व सतीचा हात कोरलेला दगड दिसुन येतो. नदीपात्रात असलेली दगडी वास्तु सतीचे देवालय म्हणून ओळखली जाते. या वास्तु भोवती मोठया प्रमाणात कचरा जमा झाला असुन झाडी वाढल्याने तेथे जाता येत नाही. गढी व हा परीसर पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पानिपतच्या लढाईनंतर परत आलेल्या शिंदे मंडळींचे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य झाले. त्यांतील शिंदे घराण्यातील तीन असामी फलटणकर नाईक निंबाळकरांच्या आश्रयाने कोपर्डे येथे स्थायिक झाल्या. त्यांना कोपर्डे येथील जवळपासची तेरा गावे इनाम म्हणून मिळाली. कोपर्डे या ठिकाणी वाडे बांधून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. पानिपत वरून परत आलेल्या या शिंदे मंडळींना पानिपतकर शिंदे म्हणून ओळखले जाते. ग्वाल्हेर येथे असलेला पानिपतकर गोटातील शिंदे हे या शिंदे परिवाराचे वंशज आहेत. या शिंदेंचे दोन नाग व मध्ये सूर्य असे चित्र असलेले स्वतंत्र निशाण असल्याचे येथील शिंदे मंडळी सागंतात. यांच्या देवघरात आजही नाग व सुर्य असल्याचा टाक पुजला जातो.
© Suresh Nimbalkar