कोथळीगड / पेठ किल्ला
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : २१२५ फुट
श्रेणी : मध्यम
कर्जतपासुन २२ कि.मी.अंतरावर असलेल्या भीमाशंकरच्या डोंगररांगेत एका सुळक्यावर कोथळीगड नावाचा प्राचीन किल्ल्ला आहे. मुख्य सह्याद्री रांगेपासून विलग झालेल्या डोंगरावर उभा असलेला एक सुळका असे ह्याचे रूप आहे. आंबिवली गावातून गडाखाली असलेल्या पेठ गावात जाण्यासाठी मातीचा कच्चा रस्ता आहे. किल्ल्याची बाजारपेठ या गडाच्या पठारावर होती त्यामुळे या पठारावर असलेल्या गावाचे नावही पेठ व गडालासुद्धा पेठचा किल्ला असे नाव पडले आहे. पायथ्याजवळच्या पेठ गावातून किल्ल्याचा सुळका व त्यावरील किल्ल्याचे अवशेष नजरेस पडतात. गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट असुन ही वाट अर्ध्या तासात आपल्याला किल्ल्याच्या दरवाजात घेऊन जाते. किल्ल्याचा दरवाजा व त्यावरील कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन केवळ दगडी चौकट शिल्लक आहे. येथुन वर पाहीले दरीकाठावर असलेली किल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज नजरेस पडतात.
...
पेठच्या किल्ल्यावर दुर्गवास्तुचा अक्षरश: खजीना आहे. सुळक्याजवळ आल्यावर डावीकडे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. सुरवातीला असलेल्या लहान गुहेजवळ पाण्याचे टाके असुन या टाक्याजवळ शेंदुर फासलेली गणेशमुर्ती आहे. या लहान गुहेत गावकऱ्यानी भैरवाची व देवीची मुर्ती स्थापन केलेली आहे. यापुढे असलेली भैरोबाची गुहा म्हणजे आपल्यासारख्या दुर्गभटक्यांचे निवासस्थान. या गुहेत एकावेळी ४०-५० जण सहज मुक्काम करू शकतात. हि गुहा म्हणजे एक प्राचीन लेणे असुन या गुहेत एक दालन व छताला आधार देणारे खांब कोरलेले आहेत. या सर्व खांबावर मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. गुहेतील जमीन पूर्णपणे सपाट असुन काही ठिकाणी गोल खळगे आहेत व त्यात तोफेचे गोळे ठेवले आहेत. गुहेजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळील भुयारातुन किल्ल्याच्या सुळक्यावर जाणारा मार्ग आहे. किल्ल्याचा हा मार्ग सुळक्याच्या पोटात कोरून काढलेला असुन सुळक्याचा शब्दश: कोथळा काढलेला आहे. किल्ल्याची हि रचना त्याचे कोथळीगड नाव सार्थ ठरवते. या वाटेने जाताना आपल्याला देवगिरी किल्ल्याचा अंधारी मार्ग आठवतो. या मार्गात किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी सुळक्याच्या आतील बाजुने पायऱ्या कोरलेल्या आहेत. किल्ल्याचा हा मार्ग सरळ नसुन वळणे घेत आपण या भुयारातून सुळक्याच्या वरील बाजुस बाहेर पडतो. या पुढील मार्ग काहीसा अरुंद असून कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करून आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो. गडाचा हा दरवाजा देखील कातळात कोरलेला असुन दरवाजाच्या उजवीकडील भिंतीवर शरभशिल्प व गजशिल्प कोरलेले आहे. गडमाथ्यावर पाण्याचे एक मोठे टाके व एक लहान टाके वगळता इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाही. गडमाथ्यावरुन भीमाशंकर अभयारण्य,पदरगड, सिद्धगड, मलंगगड, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड हे किल्ले नजरेस पडतात. गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घालताना सुळक्याच्या पोटात कोरलेली अनेक टाकी व काही गुहा पहायला मिळतात. गुहेच्या उजव्या बाजुस सुळक्याखाली असलेल्या सोंडेवर मध्यम आकाराच्या दोन तोफा असुन यातील एक तोफ गाडयावर ठेवलेली तर दुसरी जमिनीवर पडलेली आहे. याशिवाय गावातील मारुती मंदिरासमोर तोफेचा मागील पंचरशी भाग पहायला मिळतो. किल्ल्यावरील पाण्याची टाकी व लेणी पहाता हा किल्ला प्राचीन काळापासुन अस्तित्वात असल्याचे दिसुन येते. कर्जतहून खेड- कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा वापर होत असावा. या किल्ल्याचा शिवकाळानंतरचा इतिहास आपल्याला मोगली दरबारात रोज लिहिल्या जाणाऱ्या अखबार या दैनंदिनीच्या कागदपत्रात मिळतो. शिवकाळात या किल्ल्यावर मराठयांचे शस्त्रागार होते. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब दक्षिणेत आल्यावर या भागातील किल्ले घेण्यासाठी त्याने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर याची नेमणुक केली. अब्दुल कादर याने तळकोकणात आपली छावणी केली व स्थानिक लोकांना आपल्या सैन्यात भरती केले. मराठयांचे या किल्ल्यावर शस्त्रागार असल्याचे पाहुन अब्दुल ३०० बंदूकधारी सैनिकांनीशी गडाच्या पायथ्याशी पोहोचला. यावेळी नारोजी त्रिंबक हे गडाचे हवालदार होते. मुघलांच्या या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा याची बेगमी करणे गरजेचे होते. यासाठी ते गडाबाहेर पडले व गडाचा ताबा माणकोजी पांढरे यांना दिला. मराठयांचे या किल्ल्यावर शस्त्रागार असल्याचे कळताच अब्दुल कादर ३०० बंदूकधारी सैनिकांनीशी गडाच्या पायथ्याशी पोहोचला. शिवाजी महाराजांच्या दरबारात असलेला काझी हैदर या काळात मुघलांना फितुर झाला होता. अब्दुल कादर याने त्याच्या मध्यस्थीने माणकोजी पांढरे यांना फितूर केले. रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले. किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यावर आधीच दारूगोळा व धान्य याची कमतरता होती त्यात मराठ्यानी गडावर जाणारी रसद अडवल्याने अब्दुल कादरची परिस्थिती कठीण झाली. वेढा पडल्यावर १०-१२ दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. नारोजी त्रिंबक यांनी खोरे येथे अब्दुलखानची वाट अडवली. येथे झालेल्या लढाईत नारोजी त्रिंबक व काही मराठा सैनीक धारातीर्थी पडले आणि कोथळागड कायमचा मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखान या मुघल सरदाराने नारोजी त्रिंबकांचे डोके रस्त्यावर टांगले व किल्ला जिंकल्याची निशाणी म्हणुन सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवली. औरंगजेबाने त्याच्या संशयी स्वभावानुसार कोथळागड नावाचा किल्ला असल्याची खात्री केल्यावर अब्दुल कादरला बक्षिसे दिली व किल्ल्याचे नामकरण मिफ्ताहुलफतह असे नामकरण केले. फितुर काझी हैदरला मोठे बक्षीस देण्यात आले. फितुरीमुळे मराठयांच्या हातुन हा मोक्याचा किल्ला निसटला. यानंतर गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश लाभले नाही. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणाऱ्या मऱ्हमतखानाच्या सैन्याला मराठयांच्या ७००० सैन्याच्या तुकडीने अडवले पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. यातील २०० जण दोरीच्या शिडीने किल्ल्यात शिरले. बराच रक्तपात झाला पण मराठयांना यश मिळाले नाही. नंतरच्या काळात या किल्ल्याची फारशी नोंद दिसून येत नाही. इ.स. १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे सरदार बापुराव यांनी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला पण तो इंग्रजांच्या ताब्यात केव्हा गेला याची नोंद मिळत नाही. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.
© Suresh Nimbalkar