कोटकामते
प्रकार : भुईकोट
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : 0
श्रेणी : सोपी
कोकणातील बहुतेक भुईकोट काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष आजही शिल्लक असले तरी ते किल्ले मात्र विस्मृतीत गेलेले आहेत. अशा किल्ल्यांचे अस्तीत्व आज नावापुरते इतिहासाच्या पानातच उरले आहे. कोटकामते हा असाच विस्मृतीत गेलेला एक कोट. देवगड तालुक्यात असलेला हा कोट आजही आपल्या अंगाखांद्यावर किल्ल्याचे अवशेष बाळगून असला तरी केवळ हा किल्ला अस्तीत्वात नसुन या किल्ल्याचा केवळ एक बुरुज गावाबाहेर रस्त्याच्या कडेला पहायला मिळतो या माहितीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. तर काही ठिकाणी कोटकामतेचे भगवती मंदीर या कोटातच वसलेले आहे अशी माहिती वाचायला मिळते. पण प्रत्यक्षात कोटकामते कोट व भगवती मंदीर यामध्ये अर्धा कि.मी.अंतर आहे. कामते गावाला कोटकामते हे नाव या कोटामुळे पडले आहे. देवगड तालुक्यातील कोटकामते किल्ला देवगड शहरापासुन २० कि.मी. अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव फाट्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.
...
या दोन्ही मार्गांनी गावात शिरण्याआधी अर्धा कि.मी.अलीकडे या किल्ल्याचा बुरुज नजरेस पडतो. अनेक ठिकाणी किल्ल्याचा हा एकमेव बुरुज शिल्लक असल्याचे वाचनात येते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिति मात्र वेगळीच आहे. नारिंग्रे नदीकाठावर असलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण दिड एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एक-दोन नव्हे तर पाच बुरुज व मातीखाली दबत चाललेली तटबंदी पहायला मिळते. किल्ला असलेल्या भागाचा उंचवटा आजही शिल्लक असुन दरवाजाकडील भाग वगळता कोठूनही सहजपणे किल्ल्यावर जाता येत नाही. कोटाच्या मागील भागात नारिंग्रे नदीचे पात्र असुन कोटाच्या तटबंदीला लागुनच या नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या व एक बुरुज बांधलेला आहे. हा बुरुज व पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत. कोटाच्या चारही बाजुस खंदक असुन आज हे सर्व खंदक मातीने भरलेले आहेत. या खंदकाची जमिनीकडील बाजु घडीव चिऱ्यानी बांधलेली आहे. गाडीमार्गाच्या दिशेने कोटात शिरण्यासाठी वाट असुन वाटेच्या सुरवातीस असलेले मातीचे ढिगारे पहाता या ठिकाणी कोटाचा दरवाजा असावा असे वाटते. कोटाच्या आतील बाजुस आंब्याची बाग असुन या बागेची निगा न राखल्याने मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढली आहे. त्यामुळे कोटात फिरता येत नाही. कोटातील आंब्याची बाग पहाता आत विहीर असण्याची शक्यता आहे. संपुर्ण कोटाची बाहेरून फेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सावंतांकडून होणाऱ्या सततच्या कुरापतीना आळा घालण्यासाठी मराठा आरमार सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यांच्या ताब्यातील देवगड व साळशी या प्रांताच्या मध्यभागी कोटकामते या भुईकोटाची उभारणी केली. या कोटासोबतच त्यांनी भगवती देवीचे मंदीर बांधले असावे. त्या अर्थाचा शिलालेख या मंदिरावर पहायला मिळतो. या शिलालेखातील मजकुर :-‘‘श्री भगवती ॥श्री॥मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ॥ सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ॥१॥(शके १६४७) या किल्ल्याचा पहिला उल्लेख वाडीकर खेम सावंत यांनी ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर १७१९ दरम्यान पोर्तुगीजांना लिहिलेल्या पत्रात येतो. या पत्रात सावंतानी आंग्रे यांनी बांधलेल्या नवीन किल्ल्याविषयी कळवले असुन त्या विरुद्ध लढण्यासाठी दहा तोफा,तोफगोळे,घोडे व नौका अशा सामानाची मागणी केली आहे. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांच्या तुळाजी आंग्रे विरुद्धच्या संयुक्त मोहिमेत १७५५-५६ दरम्यान पेशव्यांनी कोटकामते जिंकला. इ.स. १७७४ मधील पोर्तुगीजांच्या नोंदीनुसार कोटकामते किल्ला विजयदुर्ग परीसराच्या मध्यभागी होता. ७ एप्रिल १८१८ रोजी कर्नल इम्लाकने देवगड घेतल्यावर कोटकामते किल्ला न लढताच शरण गेला. १८६२ साली झालेल्या किल्ल्यांच्या पाहणीत कोटकामते किल्ल्यात चार तोफा असल्याचा उल्लेख येतो यातील तीन तोफा आपल्याला भगवती मंदिराच्या आवारात पहायला मिळतात. यातील २ तोफा मंदिराच्या दरवाजात असुन एक तोफ पाराजवळ उलट पुरलेली आहे.
© Suresh Nimbalkar