कोकणदिवा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २७०० फुट

श्रेणी : कठीण

रायगडावरून आजुबाजुला नजर फिरवली की सह्याद्रीच्या बुलंद डोंगररांगा दृष्टीस पडतात. देशावरून कोकणात उतरणाऱ्या पायवाटा आणि दळणवळणा साठी वापरल्या गेलेल्या अनेक घाटवाटा रायगड परिसरात आहेत. सह्य़ाद्रीच्या रांगांतुन रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावले घाट. याच कावले घाटाच्या तोंडाशी असणारी कावला-बावला खिंड हि मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्ष आहे. २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीन खानाचे तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी उपदुर्गांची साखळी तयार केली व जुने गड मजबुत केले. ... या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. यापैकी एक दुर्ग कोकणदिवा हा कावळ्या घाटाच्या माथ्यावर या घाटाचा व रायगडचा संरक्षक दुर्ग म्हणुन रायगडाच्या उत्तर दिशेला पुणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवर उभा आहे. कोकणदिव्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५०० फुटाच्या आसपास आहे. कोकणदिव्याला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक कोकणातील महाडमार्गे सांदोशी गाव गाठायचे. तेथील विरगळी व उध्वस्त शिवमंदिर पाहुन कावळ्या घाटाचा खडा पहाड चढून वर खिंडीत जायचे व तेथुन पठार व उभा चढ चढुन कोकणदिव्यावर दाखल व्हायचे तर दुसरा देशावरून म्हणजे पुण्याजवळील पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर घोळ नावाचे एक गाव आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड-कोकणदिवा अशी भटकंती करत यायचे. किल्ल्याच्या माथ्यावर जाईपर्यंत वाटेत कोठेच पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत घ्यावे. कावले घाटाच्या अस्तित्वाच्या खुणा आजही इथे सापडतात. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली असुन येन खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे. येथुनच गडावर जाणारी वाट सुरु होते. कारवीच्या झाडांच्या दाट जंगलातुन गडावर जाणारी मुरमाड व घसरडी पायवाट आहे. येथुन वर माथ्यावर चढताना काळजी घेणे महत्वाचे आहे. शेजारच्या झाडांचा आधार घेतच गडावर जाता येते. वाटेत बरीच झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. गडमाथ्यावर जाताना अर्धा तास चढाईनंतर वाटेत एक कातळटप्पा लागतो. या कातळ टप्प्यातच पश्चिम बाजुला एक गुहा आहे. या गुहेत ७-८ जणांना सहजपणे रहाता येईल. गुहेशेजारीच पाण्याची ४ टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी स्वच्छ असुन पिण्यायोग्य आहे. हे टाके उघडे असुन त्यातुन पाणी काढायला कडयाच्या बाजुने हात जाण्याइतपत दगडात छिद्र ठेवलेले आहे. उर्वरीत ३ टाक्यांपैकी एक टाके जोडटाके असुन या टाक्याकडे जाण्याची वाट मात्र बरीच कठीण आहे. गुहेच्या पुढे वाटेला लागुनच अजुन एक कोरडे पडलेले टाके आहे. येथुन १० फूटाचा कातळटप्पा चढून गेल्यावर थोडीशी घसाऱ्याची वाट लागते. हि वाट पार केल्यावर आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा खुपच लहान असुन समोर भगवा फडकताना दिसतो. गडमाथ्यावरून दक्षिणेला रायगडावरील भवानी कडा, टकमक टोक व नगारखाना हि ठिकाणे तर पुर्वेला तोरणा किल्ला, आग्नेयेला लिंगाणा व पश्चिमेला कावळ्या घाट यांचे दर्शन होते. रायगड व त्यावरील अवशेष लांबुनही स्पष्ट दाखवणारा कोकणदिवा हा पुणे जिल्ह्यातला एकमेव किल्ला असावा. कोकणदिव्याचा मुख्य उपयोग हा रायगडाच्या प्रभावळीतील दुर्ग आणि या परिसरातील एक मोक्याचे टेहळणीचे ठिकाण म्हणून केला जात असे. कोकणदिव्याचे किल्ला म्हणुन इतिहासात संदर्भ कुठेही सापडत नाही. नीट नियोजन केल्यास एका दिवसात किल्ला पाहुन मुंबई अथवा पुण्याला परत जाता येईल.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!