केसर ए हिंद

प्रकार : गढी

जिल्हा : भंडारा

उंची : 0

कैसर-ए-हिंद हि ब्रिटीश काळात दिली जाणारी एक मानाची पदवी. महात्मा गांधी व सरोजिनी नायडू या सारख्या व्यक्तींना इंग्रजांनी या पदवीने सन्मानीत केल्याचे दिसुन येते. आपल्या सारख्या दुर्गप्रेमींनी किल्ला संदर्भात कैसर-ए-हिंद या शब्दाचा शोध घेतला असता पंजाब जिल्ह्यात पाकीस्तानच्या सिमेवर कैसर-ए-हिंद नावाचा एक किल्ला असल्याचे वाचनात येते. १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात हा किल्ला काही काळासाठी पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतला पण युद्ध संपेपर्यंत तो पुन्हा भारतात आला. कैसर-ए-हिंद या नावाची इथे चर्चा करण्याचे कारण म्हणजे भंडारा शहरात या नावाने ओळखली जाणारी एक इंग्रज काळातील वास्तु आपल्याला पहायला मिळते. भंडारा शहरात गेले असता आवर्जुन पहावी अशी हि वास्तु असुन भंडारा शहरातील बस स्थानकापासुन चालत केवळ दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. या वास्तुच्या तटबंदीची व आतील इमारतींची पुर्णपणे पडझड झालेलीं असुन केवळ दर्शनी भाग शिल्लक आहे. या संपुर्ण वास्तुचे बांधकाम लाल दगडात केलेले असुन या वास्तुचा प्रशस्त दरवाजा एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसुन येतो. हा दरवाजा सुशोभित करण्यासाठी काही प्रमाणात चुन्याचा वापर करण्यात आला आहे. ... दरवाजाच्या दोन्ही बाजुस पंचकोनी नक्षीदार मनोरे बांधलेले असुन मनोऱ्याच्या माथ्यावर घुमटाकार सज्जे बांधलेले आहेत. दरवाजाच्या वरील भागात उंचावर इंग्रजी भाषेतील शिलालेख असुन त्यावरील अक्षरे काळाच्या ओघात पुसट झाल्याने तो वाचता येत नाही. त्यामुळे या वास्तुच्या बांधकामाचे नेमके वर्ष व प्रयोजन कळत नाही. या दरवाजाच्या दोन्ही बाजुस दगडी खांबावर तोललेला व्हरांडा असुन त्यात दोन्ही बाजुस तीन कमानी पहायला मिळतात. या कमानी आता विटांनी बंद करण्यात आल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. सध्या या वास्तुच्या आतील भागाचा वापर जनावरांचा कोंडवाडा म्हणुन केला जातो. इ.स. १८१८ मध्ये सप्टेंबर महिन्यात मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजांनी नागपुरच्या भोसल्यांचा पराभव करून भंडारा शहर ताब्यात घेतले. त्यांनंतरच्या काळात हि वास्तु उभारण्यात आली असावी. (या वास्तुचा दरवाजा एखाद्या गढी प्रमाणे दिसत असल्याने व आसपास चौकशी करून या वास्तुची नेमकी माहिती न कळल्याने या ठिकाणाची येथे नोंद घेतली आहे.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!