केळवे दांडा

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मीवर दांडा खाडी आहे. केळवे स्थानकात उतरुन रिक्षाने अथवा एस.टीने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन बाजाराकडून पुढे जाताना दांडाखाडी पूल ओलांडल्यावर डाव्या हातास दांडा कोट पाहवयास मिळतो.दांडा खाडीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी दांडा किल्ल्याची निर्मिती केली होती. सध्या दांडा किल्ल्याचा वापर स्थानिकांकडून शौचालय म्हणून करण्यात येत असल्याने किल्ला पाहणे म्हणजे एक आव्हानच आहे. दांडा खाडी व केळवे गावास जोडणा-या पुलाजवळच प्रचंड वडाच्या झाडात दांडा किल्ला गुरफटला आहे. अवशेषावरुन येथे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. प्रवेशद्वाराच्या बाजूचा देवडी दिसणारा भाग ओळखता येतो. पोर्तुगीज अमलाची साक्ष देणारी पोर्तुगीज बांधणीची चौकोनी विहीर किल्ल्याला लागुन आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट एक वखारच आहे. याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. ... दांडा परिसरातील जलमार्गाने आलेल्या मालाची साठवण करण्यासाठी या वास्तूची निर्मिती करण्यात आलेली असावी. दांडा परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. या किल्ल्याच्या बांधकामात आढळणारी विशेष बाब म्हणजे खोबणीयुक्त विभाग वा दालन. याच्या अंतर्गत भागात भिंतीला समांतर अशी बैठकीची व्यवस्था आहे व इतर भागात मालाची साठवण करण्याकरिता मोकळी जागा आहे. दांडा गावाच्या परिसरात एकूण दोन विभागात पोर्तुगीजकालीन अवशेष असल्याने सदर किल्ल्यांच्या नावाविषयी गोंधळ होतो. केळव्याहून भवानीगडाकडे जाताना दांडा खाडीपूल ओलांडल्यावर डाव्या हाताचे अवशेष म्हणजे दांडा कोट तर उजव्या हाताला गावात विखुरलेले अवशेष म्हणजे दांडा कित्तल कोट. ह्या भागातील इतर सोळा किल्ल्यांबरोबरच हा किल्लाही पोर्तुगिजांनी बांधला होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. दांडा या प्रदेशाचा प्राचीन संदर्भ उल्लेख ‘दांडा ऋशादिगण’ असा आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!