केळवे जंजीरा
प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : मध्यम
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन रिक्षाने अथवा एस.टीने केळवे गावात यावे. केळवे शितळादेवी मंदिरा वरुन बाजाराकडून पुढे जाणाऱ्या दांडाखाडी मार्गावरच्या केळवे कस्टम कार्यालयाकडून उजव्या बाजुने कोळीवाड्यास जाणाऱ्या वाटेवरून केळवे जंजिऱ्याचे दर्शन होते. केळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावच्या दक्षिणेला दांडा खाडी जेथे समुद्राला मिळते तेथे एका मोठया खडकावर उभारण्यात आला आहे. समुद्रात नांगरलेल्या एखाद्या जहाजा सारखा दिसणारा हा जलदुर्ग आजही चांगल्या अवस्थेत आहे. गडाच्या चार बाजु आजही चांगल्या स्थितीत दिसतात पण समुद्राच्या लाटांचा तडाख्यात त्याच्या तटबंदीची थोडेफार झीज झाली आहे.
...
किल्ल्याचा अंतर्भाग मात्र भग्नावस्थेत आहे. भरतीच्यावेळी समुद्राच्या पाण्याने जेव्हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने किल्ल्यात प्रवेश होतो तर ओहोटीच्या वेळी अलिबागच्या किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी लांबवर ओहरले जाते आणि पाण्याने वेढलेली किल्याभोवतालची जमीन उघडी पडते त्यावेळी किल्ल्यात जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासुन १० फुट उंचीवर असुन लाटांमुळे ५ फुटावर तटबंदीत तयार झालेल्या खाचेच्या सहाय्याने आपल्याला कोटात शिरता येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस तोफा व बंदुकांच्या माऱ्यासाठी जंग्या असुन आतील बाजुस दरवाज्यामागील अडसर लावण्यासाठी दगडात खाच केलेली आहे. पहिल्या दरवाज्यातुन आंत प्रवेश केल्यावर समोर दुसरे प्रवेशद्वार व त्याच्या बाजूची जंग्या असणारी तटबंदी दिसते. या दुसऱ्या दरवाजाने आंत शिरल्यावर डाव्या बाजूस उध्वस्त वास्तुचे अवशेष व पाण्यावाचुन कोरडा पडलेला हौद दिसतो. यापुढे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार लागते. किल्ल्याचा हा भाग अर्धवर्तुळाकार असुन दुमजली आहे. या अर्धवर्तुळाकार तटबंदीमध्ये लाकडी वासे लावण्यासाठी जागोजागी केलेल्या खाचा दिसतात तसेच दोन्ही मजल्यावर जागोजागी बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या व तोफासाठी झरोके आहेत. या झरोक्यांचा उपयोग तोफा ठेवण्याबरोबर व्यापारी नौकाकडून जकात वसुलीसाठी केला जात असावा. किल्ला छोटेखानी असून अर्ध्या तासात पाहून होतो. किल्ला भर समुद्रात असल्याने किल्ल्यासमोर समुद्रास मिळणारी दांडा खाडी व समुद्र या दोन्ही गोष्टीवर पोर्तुगीजांचे नियंत्रण आले. या भागात असणाऱ्या इतर सोळा किल्ल्यांबरोबरच हा किल्लाही पोर्तुगिजांनी बांधला होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणी बुरुजांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक ते संरक्षण व रसद पुरविणे हा होता. पोर्तुगीज – मराठे युद्धाच्या वेळी चिमाजी अप्पांनी पेशव्यांना लिहलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. केळवे किल्ल्यासोबत हा पाणकोट किल्लादेखील मराठयांनी फेब्रुवारी १७३९ मध्ये जिंकून घेतला आणि पोर्तुगीझांचे या भागातून उच्चाटन केले. प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar