केंजळगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : ४१७० फुट
श्रेणी : मध्यम
रायरेश्वर पठार चढउतार करताना समोर पुर्व दिशेला शंभुमहादेव डोंगररांगेतील मांढरदेव शिखरावर असलेला टोपीच्या आकाराचा सुळका आपले लक्ष वेधुन घेतल्याशिवाय रहात नाही. मांढरदेव शिखरावर असलेला हा सुळका म्हणजे किल्ले केंजळगड उर्फ मोहनगड. एकाच डोंगर रांगेवर असलेले रायरेश्वर व केंजळगड केवळ एका खिंडीने एकमेकांपासुन वेगळे झाले असुन रायरेश्वर पठार पुणे जिल्ह्यात तर केंजळगड सातारा जिल्ह्यात मोडतो. भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्याच्या वाई प्रांतात असलेला हा किल्ला हिरडस मावळचाच एक भाग असुन गडापासुन वाई व भोर हे प्रांत समान अंतरावर म्हणजे साधारण २५ कि.मी.वर आहेत. पुण्याहुन जाण्यासाठी पुणे-भोर-अंबवडे–वडतुंबी-कोर्ले-ओहोळी-केंजळमाची असा गाडीमार्ग असुन साताऱ्याकडून वाईमार्गे आल्यास धोम धरणाच्या काठावरून मेणवली- खावली- केंजळमाची असा गाडीमार्ग आहे. भोरवरून आल्यास आधी केंजळगडचे वळण व नंतर खिंडीतून रायरेश्वरकडे जाणारा रस्ता लागतो
...
तर वाईमार्गे आल्यास आधी रायरेश्वरची खिंड व नंतर केंजळगडचे वळण लागते. गडाच्या माचीवर असलेल्या ओहोळी वस्तीपर्यंत पक्का रस्ता झाला असल्याने खाजगी वाहनाने थेट किल्ल्याच्या माचीवर जाता येते. ओहोळी वस्ती गडाच्या पुर्व बाजुस असलेल्या माचीवर वसलेली असुन वस्तीच्या मागील बाजुस गडाचा माथा पुर्वपश्चिम पसरलेला आहे. माचीवर असलेल्या ओहोळी वस्तीत १०-१२ घरे व शाळा असुन येथील केंजळाई देवळात ८-१० जणांची रहाण्याची सोय होते. वस्तीच्या मागील बाजुस असलेल्या झाडीतुन गडावर जाण्यासाठी उभी चढण असलेली वाट असुन अर्धी चढण चढुन गेल्यावर हि वाट डावीकडे वळते. हि वाट लक्षात ठेवणे फार महत्वाचे असुन सरळ गेल्यास तीव्र चढण व मातीचा घसारा असलेल्या वाटेने वर चढावे लागते व गडाच्या पुर्व सोंडेवरील माचीवर असलेले अवशेष देखील पहायचे राहून जातात. जंगलातून जाणाऱ्या वाटेने साधारण १० मिनिटे वर चढुन आल्यावर हि वाट डावीकडे वळते व गडाच्या पुर्व बाजुस असलेल्या निमुळत्या माचीवर येते. माचीवर प्रवेश केल्यावर समोरच एक चौथरा पहायला मिळतो. हा चौथरा पार करून पुढे गडाकडे जाताना वाटेवर कातळात खोदलेले एक टाके त त्याच्या पुढील भागात तीन वास्तुचे चौथरे पहायला मिळतात. या माचीवर गडाचे मेट तसेच काही प्रमाणात सैनिक देखील असावीत कारण एका कागदपत्रात गडाच्या पुर्व माचीवर सैन्याची छावणी असल्याचे उल्लेक येतात. या वाटेने गडाचा डोंगर डाव्या बाजुस ठेवत पुढे आल्यावर आपण गडाच्या तळातील पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजात पोहोचतो. दरवाजाची वरील कमान ढासळलेली असुन अर्धी चौकट आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या शिल्लक असलेल्या आतील भागात देवडी असुन कड्याकडील भाग तटबंदीसहित ढासळल्याने अंदाज करता येत नाही. काही ठिकाणी गडावरील घलई अथवा घळी दरवाजा असा उल्लेक येतो पण तो हाच असावा का हे ठोसपणे सांगता येत नाही. गडात प्रवेश केल्यावर एक वाट सरळ कड्याला लागुन पुढे जाताना दिसते तर दुसरी वाट डावीकडे वळुन गडमाथ्यावर जाताना दिसते. हा भाग संपुर्ण भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन सरळ वाटेने पुढे गेल्यावर कातळात लांबपर्यंत खोदलेली एक मोठी गुहा दिसुन येते. हि गुहा मोठया प्रमाणात मातीने भरलेली आहे. गुहेच्या आतील बाजुस एक लहान दरवाजा असुन त्याच्या आतील बाजुस एक दालन आहे. या दरवाजात माती भरल्याने सरपटत आत शिरावे लागते. गुहा पाहुन पुढे गेल्यावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन या टाक्याच्या बाहेरील बाजुस उंच तटबंदीची भिंत उभारली आहे. टाके पाहुन मागे फिरावे व गडमाथ्याच्या दिशेने निघावे. गडमाथ्यावर जाण्याचा मार्ग म्हणजे उभ्या कड्यावर कातळात कोरलेल्या ५०-५५ उंच पायऱ्या असुन या पायऱ्या म्हणजे गडाचे खास आकर्षण म्हणता येईल. येथे जवळपास २०० फुट उंचीचा कातळ सरळ रेषेत तासलेला असुन या कातळातच पायऱ्यांचा खोदीव मार्ग तयार केला आहे. पायऱ्यांच्या शेवटी असलेला दरवाजा व बुरुज तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असुन येथे प्रशस्त दरवाजा होता हे सांगणारा केवळ दरवाजाचा उंबरठा व दरवाजाचा अडसर घालण्याचे छिद्र दिसुन येते. या पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडाचा माथा समुद्रसपाटीपासुन ४१८५ फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम ९ एकरवर पसरलेला आहे.गडावर प्रवेश केल्यावर डावीकडील बाजुने तटबंदीवरून आपल्या गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने गडाच्या पुर्व टोकावर आपल्याला एक लांबलचक चौथरा व कातळात कोरलेली दोन कोरडी टाकी पहायला मिळतात. हि टाकी तटबंदीसाठी दगड काढण्यासाठी खोदली असावी व यात पाणी साठत नसावे. येथुन तटाच्या डावीकडील बाजुने पुढे आल्यावर तटाला लागुनच डोंगर उतारावर एक मोठे कातळात खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. तळ्याच्या पुढील भागात काही अंतरावर कोरडे पडलेले दुसरे तळे आहे. या तळ्याच्या पुढील भागातील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन फांजीवर माती आल्याने ती दिसुन येत नाही. या तटबंदीत सांडपाणी वाहून नेण्यासाठी छिद्र असुन एक उध्वस्त शौचकुप आहे. येथुन पुढे आल्यावर आपण गडाच्या पश्चिम दिशेला सुस्थितीत असलेल्या तत्बंदिजवळ पोहोचतो. या तटबंदीत तोफांचा मारा करण्यासाठी झरोके तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. तटबंदीच्या पुढील उतारावर कातळात कोरलेली तीन टाकी असुन यातील एक टाके मातीने बुजले आहे तर उर्वरीत दोन टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नसावे. या ठिकाणी उतारावर तटाला लागुन अजुन एक मोठे तळे असावे कारण तळ्याच्या पाण्यामुळे या उतारावर असलेली तटबंदी मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली आहे. वाटेच्या उजवीकडे असलेल्या काही बांधीव पायऱ्या चढुन आपण गडाच्या मध्यावर दिसणाऱ्या उंचवट्यावर येतो. या ठिकाणी एक चुन्याचा घाणा असुन त्याच्या पुढील भागात विटांचे बांधकाम व चुन्याचा गिलावा असलेली पडझड झालेली वास्तु आहे. या वास्तुच्या पडलेल्या अवशेषात काही खापरी नळ दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे हमामखाना अथवा गडावर पाणीपुरवठा करण्याची सोय असावी. या वास्तुच्या पुढील भागात गडावरील सर्वात मोठा तलाव असुन सध्या तो पुर्णपणे कोरडा पडलेला आहे. येथुन मागे फिरून तटबंदीच्या काठाने तसेच पुढे गेल्यावर आपण गडाच्या पश्चिम बुरुजावर येतो. बुरुजाच्या या भागात काही पडझड झालेले बांधकाम दिसुन येते. या बुरुजावरून रायरेश्वर वरून येणारी संपुर्ण वाट तसेच रायरेश्वरचे पठार नजरेस पडते. येथुन तटबंदीच्या दुसऱ्या बाजुने आपला परतीचा प्रवास सुरु होतो. या वाटेवर आपल्याला किल्ल्यावरील दारुगोळा कोठार पहायला मिळते. कोठाराच्या भिंती घडीव दगडात बांधलेल्या असुन छतावर पाणी थांबु नये यासाठी गोलाकार पण विटांनी बांधले आहे. तोफांची दारू जमिनीच्या ओलाव्याने सर्द होऊ नये यासाठी येथे जमिनीवर तुळई घालण्यासाठी भिंतीच्या तळात खाचे ठेवलेले असुन त्यावर लाकडी फळ्या ठेऊन त्याची बिछायत करण्याची सोय केलेली आहे. येथुन पुढे आल्यावर डाव्या बाजुस कोरडा पडलेला अजुन एक तलाव पहायला मिळतो. तलावाच्या पुढील भागात चुन्याचा दुसरा घाणा आहे. गडावरील चुन्याचे दोन घाणे व मोठया प्रमाणात असलेला पाणीसाठा पहाता गडावर मोठ्या प्रमाणात वस्ती असावी. चुन्याचा घाणा पाहुन पुढे आल्यावर आपण एका उध्वस्त मंदिराच्या आवारात पोहोचतो. येथे एका चौथऱ्यावर काही घडीव दगड तसेच तांदळा ठेवलेला असुन चौथऱ्यावर लालसर दगडात घडवलेल्या महिषासुरमर्दिनी मुर्तीचे भग्न अवशेष आहेत. या चौथऱ्याच्या पुढील भागात कोरीव दगडातील अजुन एक लहान चौथरा असुन या चौथऱ्यालगत दोन विरगळ आहेत. या मंदिराशेजारी असलेल्या उंचवट्यावर गवतात लपलेला एक मोठा चौथरा व त्यावर जोते असुन या वास्तुचे बऱ्यापैकी अवशेष तग धरून आहेत. हि वास्तु गडाची सदर अथवा किल्लेदाराचा वाडा असावा. वाडा पाहुन पुढे आल्यावर आपण गडमाथ्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी येतो व आपली गडफेरी पुर्ण होते. गडावरुन पश्चिमेला खाली खावली गाव, वाळकी नदी दिसते तर दक्षिणेकडे कमळगड, पाचगणी व महाबळेश्वरची पठारें दिसतात. संपुर्ण गडमाथा फिरण्यास एक तास पुरेसा होतो. मोहनगड, घेरखेळज, केंजळगड अथवा खेळजा अशा विवीध नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला बाराव्या शतकामध्ये भोज राजाने बांधल्याचे मानले जाते. गडाच्या कोरीव पायऱ्या व तळात असलेली खोदीव गुहा त्याच्या प्राचीनत्वाचे दाखले देतात. त्यानंतर निजामशाही, आदिलशाहीचा या गडावर अंमल असावा पण त्याचे कोणतेही उल्लेख मिळत नाही. त्यानंतर इ.स.१६४८ मध्ये केंजळगड अदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. अफजलखानच्या वधानंतर १६७४ पर्यंत केंजळगड वगळता वाई परिसरातील सर्व किल्ले महाराजांच्या ताब्यात आले होते. शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी मराठी फौजा पाठवल्या यावेळी गंगाजी विश्वसराव किरदत हा केंजळगडचा किल्लेदार होता. तो मराठयांना प्रतिकार करताना मारला गेला व २४ एप्रिल १६७४ मध्ये केंजळगड मराठयांच्या ताब्यात आला. पुढे १७०१ मध्ये गड मुघलांच्या ताब्यात गेला पण मराठयांनी वर्षभरात तो पुन्हा जिंकुन घेतला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने केंजळगडचा ताबा घेतला. सातारा प्रांतातील काही मोजक्या किल्ल्यांमधुन ब्रिटिशांना प्रतिकार झाला त्यात केंजळगडचे नाव येते. या किल्ल्यांवरून इंग्रज सैन्यावर तोफा डागल्या गेल्या पण आजमितीला किल्ल्यावर एकही तोफ दिसुन येत नाही. या भागात असलेल्या किल्ल्यावरील तोफांचे नेमके काय झाले हा एक अभ्यासाचा विषय आहे. इंग्रज अधिकारी एलफिन्स्टन गडाविषयी लिहिताना म्हणतो जर हा किल्ला चांगल्या रीतीनें लढविला तर शत्रूस अभेद्य आहे.
© Suresh Nimbalkar