कुलंग

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४१६५ फुट

श्रेणी : कठीण

सह्याद्रीतील सर्वात उंच गडांपैकी ज्याची उंची ४८२२ फुट आहे असा कुलंगगड सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. यातील कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग आणि इगतपुरीच्या दक्षिणेला १०-१२ किमीवर कुलंग उभा आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेची सुरुवात कुलंग गडापासून होते. या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात मोठा किल्ला आहे. ... ह्याचे दोन भाग आहेत - कुलंग व छोटा कुलंग. छोटा कुलंग हा पश्चिमेकडील लहान भाग आहे. गडाच्या पूर्वेला मदन व अलंग किल्ले दिसतात. पायथ्याशी असलेल्या कुलंगवाडीतून खालील जंगलामधून पायवाटेने वरच्या पठारावर जाता येते. कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. कुलंगच्या उजव्या बाजुने उतरणाऱ्या या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळ कोरीव पायऱ्या आहेत. सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. याच्या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा समोर येतो. या पायऱ्या चढून आपण गडप्रवेश करतो. कुलंगचा दुसरा दरवाजा व त्या शेजारील तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. यातील मधली गुहा आकाराने मोठी असुन आत दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत. गुहेजवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची २-३ मोठी टाकी दिसतात. या टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या वरील बाजूस २ मोठया वाड्यांचे चौथरे पहायला मिळतात. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला कुलंगच्या पश्चिम टोकावर नेते. गडाचे पश्चिम टोक बुरुज बांधुन बंदीस्त केलेले आहे. येथुन समोर दिसणारा डोंगर म्हणजे छोटा कुलंग असुन दुरवर घाटघर गावातून येणारी वाट तसेच विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. येथुन मागे फिरून मुक्कामाच्या गुहेपाशी यायचे व समोरील उतारावर असलेल्या टाक्याच्या दिशेने आपली पुढील गडफेरी सुरु करायची. पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. या टाक्यातील पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. यातील एका टाक्याच्या काठावर शिवलींग कोरलेले आहे. टाकी पाहून सरळ निघाल्यावर १५ मिनीटात आपण गडावरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. या घळीत वरील बाजूने वाहुन येणारे पाणी अडवण्यासाठी बंधारा घातलेला असुन या बंधाऱ्यात पाण्याचा जास्त साठा करता यावा यासाठी कातळात एकाखाली एक अशी अनेक टाकी कोरलेली आहेत. जेणेकरुन आधी पाणी या टाक्यात जमा होईल व टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी नाळी बांधलेली असुन या नाळीच्या तोंडावर दगडी गोमुख बांधले होते. सध्या हे दगडी गोमुख तुटुन खाली पडले आहे. बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकावर आले असता येथे अनेक घरांची जोती पहायला मिळतात. गडावर मोठ्या प्रमाणात असलेले वास्तू अवशेष व बंधारा पहाता गड नांदता असताना गडावर मोठ्या प्रमाणात वस्ती असावी तसेच काही महत्वाच्या व्यक्ती किल्ल्यावर वास्तव्यास असाव्या. या कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कात्राबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या- मेंढ्या घाट तसेच कसाराघाट मार्गावर टेहळणी करण्यासाठी महत्वाचा होता. ह्या गडाच्या इतिहासाबद्दल फारसी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे हा कोणी बांधला वगैरे आपल्याला आज तरी कळत नाही. हा किल्ला शिवाजी राजाकडे कधी नव्हता व सन १७६० मध्ये मराठ्यांनी हा जिंकून घेतला. त्यानंतर सन १८१८ मध्ये कर्नल मॅकडोव्हेलच्या सैन्याने हा जिंकला व गड कायमचा निकामी करण्यासाठी गडाच्या पायऱ्या सुरंग लावून उडवल्या. प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट सह्याद्रि रांगांमध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्यासाठी व्यापारी मार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे, बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळात या परीसराला चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांचा अंमल येताच हेतुपूर्वक त्यांनी गडांची नासधूस केली. ह्याचेच परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले. इंग्रजांनी यात बदल करताच याचे पडसाद स्थानिक जमातीं मध्ये उमटले. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणली. जुन्नर येथे काळा चबुतरा याच आदिवासी लढ्याची आठवण करून देतो. महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरूद्ध लढ्याचा आरंभ आदिवासी लढ्यापासून आणी तोही प्रवरा खोऱ्यापासून सुरू झाला. १८१८ साली महादेवकोळी आणी भील्ल जमातीने पहिला लढा स्वत:च्या हक्कांसाठी उभारला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणी रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला. नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणी शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला नेहमीच भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. ह्या भटकंतीसाठी एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंगकुलंगच्या पोटातून जाणारा मार्ग हा घनदाट जंगलातुन आणी कारवीच्या जंगलातून जातो त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!