कुर्डुगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : १८०० फुट

श्रेणी : मध्यम

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. प्राचीन काळापासुन पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल ताम्हिणी घाटमार्गाने घाटावरील बाजारपेठेत जात असे. या ताम्हिणी घाटाच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता. कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याहून कोकणात उतरणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवर आहे. सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला किंवा विश्रामगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नसुन सह्याद्रीधारेपासून वेगळा सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. ... कुर्डुगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २२०० फुट असुन याची बांधणी अंदाजे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याच्या कालावधीत झाली असावी. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवाजीराजांच्या समकालीन आणि सहकारी घराण्याच्या अखत्यारीत होता. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. उंबर्डी हे गडाचे पायथ्याचे गाव पुण्यापासुन मुळशी-विळे-जिते-उंबर्डीमार्गे १२६ किमी अंतरावर आहे तर मुंबईपासुन पनवेल-पाली-कोलाड-बागड एमआयडीसी -तासगाव -कांदळगाव- बामणवाडी मार्गे १४६ किमी अंतरावर आहे. उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. गावाच्या थोडं बाहेर एक पुरातन आणि काहीसं भग्न असं काळ्या पाषाणातलं शिवमंदिर आहे. मंदिरा शेजारून चालायला लागल्यावर सपाटी सुरू होते. या सपाटीवर एक छोटेसे तळे असुन खुप मोठया प्रमाणावर वस्तीचे अवशेष आढळुन येतात. या अवशेषांचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत. या अवशेषांमध्ये घडीव दगडाची लांबलचक भिंत, वाड्याच्या दरवाजाची कमान, घरांचे व मंदिराचे घडीव दगड पाया व इतरही बरेच काही दिसते पण बोध होत नाही. पंधरा-वीस मिनिटांतच किल्ल्याच्या खड्या चढणीला सुरुवात होते. गडाची पायवाट चांगली मळलेली आहे. गडावर कुर्डुपेठ नावाची छोटी वस्ती असल्यानं पायवाट रोजच्या वापरातली आहे. पायथ्यापासुन कुर्डुपेठपर्यंत विजेचे खांब गेले आहेत त्यांचा माग काढत गेलो की साधारण दीड तासात आपण कुर्डुपेठेत पोहोचतो. वाट फारच दमछाक करणारी आहे. विश्रामगडाचा उत्तुंग सुळका गावाच्या मागेच उभा असुन त्याच्यावरचा बुरुजही गावातून स्पष्ट दिसतो. कुर्डुपेठेतुन गडाकडे निघालो की पाचच मिनिटांत डावीकडे कुर्डाई देवीचं अलीकडेच जीर्णोद्धार केलेले कौलारू मंदिर आहे. या कुर्डाई देवीच्या नावावरूनच विश्रामगडाला कुर्डुगड असं नाव पडलं असावं. मंदिरात देवीची मुर्ती असुन मंदिराच्या बाहेर विरगळ, दीपमाळ व गजांतलक्ष्मीचं शिल्प आहे. मंदिरापासून पंधरा मिनिटांत आपण किल्ल्याच्या दरवाजात येतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच बारमाही टाक असुन कुर्डुपेठ ह्या गावास येथुनच पाणीपुरवठा होतो. कातळात खोदलेल्या पायऱ्या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. इथुन पुढे किल्ल्याच्या डाव्या अंगानी वाट पुढे जाते आणि वळुन वर उत्तरेकडील हनुमान बुरुजावर येते. येथे आल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर ४ फुट उंचीची कोरीव मिशा, कमरेला खंजीर आणि पायाखाली दैत्याला चिरडणारं मारुतीचं भंगलेली उघड्यावर असलेली हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. एकंदर घडणीवरून हि पेशवेकालीन मुर्ती असावी. सुळक्यावर दक्षिण बाजुला कोप-यावर किल्ल्यापेक्षा ९० फुट उंचीवर लहानशी चौकोनी गुहा दिसते पण तेथे जाणारी वाट कोसळलेली आहे. गिर्यारोहणाच्या सामानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही. कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. दगडांनी भरलेल्या या गुहेत दोनशे माणसं सहजपणे बसू शकतील. या गुहेच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी व काही बांधकाम केलेले आढळते. गडाच्या मागील बाजुस एक उत्तम बांधणीचा बुरूज असून बुरुजाखाली प्रचंड खोल दरी असल्याने या बुरुजास स्थानिक लोक कडेलोटाचा बुरूज असे म्हणतात. हा बुरुज आपल्याला घनगडच्या माथ्यावरील बुरुजाची आठवण करून देतो. किल्ल्यातच दोन सुळके असुन यातील मोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. या सुळक्यावर जायला वाट नाही. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्याच्या मुख्य सुळक्याला एक अजून छोटा सुळका बिलगला आहे. या दोघांच्या मध्ये एक घसाऱ्याची वाट असून ती पार केल्यावर आपण एका नैसर्गिक खिडकीशी पोहोचतो. ही घळीतली वाट तशी अवघड आणि निसरडी असुन इथे मधमाशांची पोळी असल्यामुळे खबरदारी घ्यावी लागते. येथुन कोकणातील दुरपर्यंतचा मुलुख सहज नजरेस पडतो. सुळक्याच्या पायथ्याशी बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात. सुळका पाहुन वळसा घालून पुढे गेल्यावर एक दरड कोसळलेली दिसते. येथुन पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. यापेक्षा आल्या मार्गाने परत फिरून हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे यावे. या भागात एक बुरुज व बांधकामाचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात. येथुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच त्या बाजुने पाहिलेली कोसळलेली दरड या बाजुने पहायला मिळते.या बाजुला देखील एक मोठी नैसर्गिक गुहा असुन या गुहेत देखील ५० माणसे सहजपणे बसतील. हे पाहुन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा घेर लहान असुन सपाटी फारशी नाही. या किल्ल्याच्या तीन बाजू नैसर्गिक उभ्या कडय़ाच्या असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे. किल्ल्याला एकुण चार बुरुज असुन खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी शिवाय काही धान्यकोठारेही आहेत. किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास एक तास पुरतो. मराठा काळात शिबंदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होई. इतिहासात या किल्ल्याविषयी एक महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. कुर्डुगडाच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक घळ आहे. सध्या या घळीतील वर जाण्याचा मार्ग तुटला आहे. या घळीत एक तपस्वी साधू राहात होते. त्यांचेकडे एक शिवलिंग बाण होता. त्याची बारा वर्षे अखंड पूजा करणा-यास राज्यप्राप्ती होईल असे समजल्याने बाजी पासलकराने तो बाण मिळविला व शिवरायांना नजर केला. पुढे शिवरायांना राज्यप्राप्ती झाली. शिवरायांच्या निधनानंतर हा बाण राजाराम महाराजांच्या बरोबर सिंहगडावर आणला गेला व त्यांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधी मंदिरात तब्बल २५० वर्षे होता. इतिहासात चंद्रशेखर बाण या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग साता-याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवले आहे. पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७०मध्ये आखल्यावर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यावर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगड स्वराज्यात दाखल झाले. या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजीचा विश्वासू सेवक येल्या मांग, बाजीचा आश्रित अनंता खुरसुले, जंजि-याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. १८१८च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!