कुडाळ

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील अनेक भुईकोट काळाच्या ओघात नष्ट झाले असुन आज या कोटांचे उल्लेख केवळ इतिहासाच्या पुस्तकात आढळुन येतात. इतकेच नव्हे तर स्थानीक लोकदेखील या कोटाबाबत वा त्याच्या माहितीबद्दल अनभिज्ञ आहे. अशा अनेक भुईकोटापैकी एक भुईकोट म्हणजे कुडाळचा किल्ला. कुडाळ शहर सावंतवाडी पासुन १० कि.मी.अंतरावर तर मालवण पासुन १५ कि.मी.अंतरावर आहे. कुडाळ बसस्थानका समोर असलेला हा किल्ला स्थानिकांना जराही परिचित नसल्याने किल्ला न विचारता घोडेबाव विहीर म्हणुन चौकशी करावी. घोडेबाव विहीर हि किल्ल्याच्या आतील भागात असुन कुडाळ किल्ल्याचा हा एकमेव अवशेष आज शिल्लक आहे. कोटात प्रवेश करताना वाटेच्या उजव्या बाजुस कोटेश्वर मंदीर असुन नावात कोट शब्द सामावलेले हे गडदेवता मंदीर असावे. मंदीर म्हणजे नव्याने बांधलेली एक लहानशी घुमटी असुन या घुमटीवर पत्र्याचा निवारा उभारला आहे. कोटाच्या आतील भागात आज सरकारी कार्यालये उभी आहेत. ... मंदिराकडून थोडे पुढे येऊन उजवीकडील फाटकातुन आत शिरल्यावर आपल्याला उजव्या बाजुला काही थडगी तर समोरच भलीमोठी चावीच्या आकाराची विहीर दिसुन येते. विहिरीचा घेर साधारण ८० फुट असुन खोली ५० फुटापेक्षा जास्त आहे. विहिरीत उतरण्यासाठी रुंद पायऱ्या असुन विहिरीच्या तळाकडील भागात दरवाजा आहे. विहिरीच्या या रुंद पायऱ्या व दरवाजा यावरूनच या विहिरीला घोडेबाव नाव पडले असावे. विहिरीच्या उजव्या बाजुस ढासळलेल्या तटबंदीचा ढिगारा दिसुन येतो. विहीर पाहुन फाटकातुन बाहेर आल्यावर सरळ पुढे जाताना उजव्या बाजुस दोन इमारतीच्या मधील भागात एक मोठी कबर दिसुन येते. रस्त्याच्या समोरील बाजुस न्यायालयाची इमारत असुन या इमारतीच्या आवारात ४० तोफगोळे दगडी तळखड्यांवर एका रांगेत मानून ठेवले आहेत. न्यायालयाच्या उजव्या बाजुस पाटेकर मंदीर असुन या मंदिराच्या मागील बाजुस कोटाचा उध्वस्त बुरुज आहे. या बुरुजाची वरील भिंत नव्याने बांधलेली असुन पलीकडील भागात कोटाचा बुजत चाललेला खंदक पहायला मिळतो. न्यायालयाच्या मागील बाजुस मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीमध्ये एक तोफ पडलेली आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण कोट फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या कुडाळचें नांव कुट्ट अथवा कुट्टापरान्त असें होतें व तो परांत व अपरांत या कोंकणच्या दोन भागांपैकीं अपरांतात होता. प्राचीन कुडाळवर ११ व्या शतकापूर्वीं कदंब व चालुक्य यांची सत्ता होती. ११व्या शतकापासून १५ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्राह्मण (कुडाळ देशकर) सावंत घराण्याची प्रथम अनुक्रमें कदंब व यादव यांचे मांडलिक व नंतर स्वतंत्र सत्ता होती. कदंबाच्या वेळचा ‘नऊशें इरिदिगे’ नांवाचा प्रांत हा कुडाळ प्रांत असावा. कुडाळवर चालुक्य,राष्ट्रकुट,शिलाहार,कदंब,यादव,बहमनी,विजयनगर, आदिलशाही अशा विविध सत्ता नांदल्या. इ.स.१४७० मध्ये बहामनीच्या ताब्यात असलेला हा भाग इ.स.१४९० मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात आला व त्याच काळात येथे कोट बांधला गेला अथवा दुरुस्त केला गेला. इ.स.१५९७ मध्ये प्रभु देसाई पदासाठी झालेल्या आपसी लढाईत मांग सावंत व देव दळवी मरण पावले व आदिलशहाने हा प्रांत देसाईंना दिला. इ.स.१६२७ मध्ये आदिलशहाने खेम सावंतांना या भागाची देशमुखी दिली. २५ ऑगस्ट १६४८ माघील एका पत्रानुसार खेम सावंतांचा मुलगा लखम सावंत हा कुडाळचा सरदेसाई होता. इ.स.१६५९ ते १६६० च्या दरम्यान मराठयांच्या कोकण मोहिमेत कुडाळ स्वराज्यात आले पण महाराज पन्हाळ्यावर अडकलेले पाहुन सावंतानी कुडाळ पुन्हा ताब्यात घेतले. इ.स.१६६३ मधील कोकण मोहिमेत कुडाळ काबीज केल्यावर महाराजांनी रावजी सोमनाथ यांना येथील सुभेदार नेमुन कृष्णा सावंत यांना देशमुखी दिली. इ.स.१६६४ मध्ये आदिलशहाने कुडाळवर अजीजखानाला रवाना केले. अजीजखान व लखम सावंत यांच्या एकत्रित हल्ल्यानंतर मराठ्यांनी मे १६६४ ला तह करून किल्ला अजीजखानच्या हवाली केला. १० जुन १६६४ला अजीजखान मरण पावल्याने त्याच्या जागी खवासखानची नेमणुक करण्यात आली. शिवरायांनी डिसेंबर १६६४ दरम्यान खवासखान याचा खानापुर येथे पराभव केला व कुडाळ परत मराठयांच्या ताब्यात आले. यानंतर १६६५ मध्ये कुडाळ आदिलशहाच्या ताब्यात दिसते पण १६६६ मध्ये ते परत मराठयांच्या ताब्यात आल्यावर महाराजांनी वेगळा कुडाळ सुभा बनवुन त्यात २०३ गावे सामील केली. बारदेशातील मीठ स्वराज्यात स्वस्त दराने विकले जाऊ लागल्याने महाराजांनी ६ डिसेंबर १६७१ रोजी लिहिलेल्या पत्रात कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराउ यांना बारदेशाच्या मिठावर जबर जकात आकारण्यास सांगितले. याकाळात वाडीकर सावंत स्वराज्यात सामील झाल्याने कुडाळ प्रांत महाराजांच्या अखेरपर्यंत स्वराज्यात राहिला. शिवरायांच्या मृत्युनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला असता त्याचा मुलगा शहाआलम तळकोकणावर चालुन आला व डिसेंबर १६८३ मध्ये त्याने कुडाळ जाळले. पण मराठयांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्याला मागे फिरावे लागले व एप्रिल १६८४ मध्ये कुडाळ परत मराठयांच्या ताब्यात आले. संभाजी महाराजांच्या काळात कवी कलश कुडाळचे सुभेदार असताना सावंत व देसाई मोगलांना फितूर झाले. मोगली फौजदार अब्दुल राजाखान यांच्या सैन्यानिशी त्यांनी कुडाळवर हल्ला केला व देवस्थाने भ्रष्ट केली पण कुडाळ मराठयांच्याच ताब्यात राहीले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर एप्रिल-मे १६८९ दरम्यान मोगल सरदार यशवंतराव दळवी याने कुडाळ ताब्यात घेतले. १६९०च्या अखेरीस राजाराम महाराजांनी वतने दयायला सुरवात केल्यावर वतनाच्या आशेने सावंत व देसाई पुन्हा मराठ्यांना सामील झाले त्यामुळे कुडाळचा मोगली फौजदार राजाखान पळुन डीचोलीस गेला व कुडाळ मराठयांच्या ताब्यात आले. त्यानंतर सावंत-देसाई पुन्हा मोगलांना सामील झाले व ऑगस्ट १६९६ दरम्यान कुडाळ मोगलांच्या ताब्यात गेले. इ.स.१७०७ मध्ये औरंजेबच्या म्रुत्युनंतर झालेल्या मराठा सत्ता वाटपात कुडाळ प्रांत करवीरकरांच्या ताब्यात आला. इ.स.१७१० मध्ये करवीरकराकडून कुडाळ प्रांत सावंतांना देण्यात आला. इ.स.१७१४ मध्ये करवीर छत्रपतीनी रामचंद्रपंत अमात्य यांना दिलेल्या वतनात कुडाळ सुभा सामील होता. इ.स.१७१८ मध्ये खेम सावंतानी कुडाळवर हल्ला केल्याने करवीर संभाजी राजेंनी सावंतवाडीवर हल्ला करून सावंतांचा पराभव केला. पण करवीरचे सैन्य मागे फिरल्यावर सावंतानी कुडाळवर हल्ला करत किल्ला ताब्यात घेतला. यात नारायण प्रभु मारले गेले. ऑक्टोबर १७१९ मध्ये करवीरकर व कान्होजी आंग्रे यांनी कुडाळवर स्वारी करत कोट ताब्यात घेतला. तुळाजी आंग्रे व पेशवे यांच्या संघर्षात सावंतानी पेशव्यांना साथ दिल्याने जानेवारी १७४८ मध्ये आंग्रे यांनी सावंताच्या ताब्यातील कुडाळ कोट घेतला पण पेशव्यांचे सैन्य घाटमाथ्यावर आल्याचे कळताच कोट सोडुन निघून गेले. सन १७५० दरम्यान तुळाजी आंग्रे यांनी कुडाळ कोटावर पुन्हा हल्ला केला असता त्यांचा सरदार मानाजी फाकडे तर सावंतांचा रजपूत सरदार नवसिंग अंगोजी काटे ठार झाले पण कुडाळ सावंतांच्या ताब्यात राहिले. या लढाईत जिवाजी विश्राम सबनीस यांनी मोठा पराक्रम गाजवला. इ.स.१८१८ साली कुडाळ किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. इ.स.१८३२मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावरील खर्च कमी केल्याने किल्ल्याची आर्थीक स्थिती डळमळीत झाली. १८४४ला करवीर राज्यात इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठवानंतर इंग्रजांनी केलेल्या किल्ल्यांच्या पाडापाडीत कुडाळ किल्ला पाडला गेला. तरीही १८८०च्या गझेटमधील नोंदीनुसार या किल्ल्याची स्थिती बऱ्यापैकी असुन किल्ल्याला खंदक, बुरूज, तीन दरवाजे, एक चोर दरवाजा व काही तोफा असल्याचे नोंदवले आहे. यात घोडबाव विहिरीचा देखील उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!