कुटरनोट्टी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : बेळगाव
उंची : २४०० फुट
श्रेणी : सोपी
अपरीचीत किल्ल्यांच्या वाटेला आलेली दुर्दशा केवळ महाराष्ट्रात नसुन थोडयाफार फरकाने महाराष्ट्रालगत असलेल्या इतर प्रांतातही दिसुन येते. बेळगाव प्रांतातील दुर्गभ्रमंती करताना आम्हाला असाच एक अपरीचीत व दुर्लक्षीत किल्ला पहायला मिळाला. किल्ल्याचे नेमके नाव आज कुणालाही अगदी गावकऱ्याना देखील ठाऊक नाही. कुटरनट्टी व शिल्टीभावी अशा दोन गावांच्या सरहद्दीवर असलेल्या या किल्ल्याला नेमके कोणत्या गावाचे नाव द्यावे हा देखील प्रश्न आहे कारण गडावरील देवळात असलेले दोन्ही गावाचे भाविक हा आमच्या गावातील किल्ला आहे असे सांगतात. गावाच्या हद्दीचा प्रश्न सोडला तर हा किल्ला शिल्टीभावी गावापासुन ८ कि.मी.अंतरावर तर कुटरनट्टी गावापासुन २ कि.मी.अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात असलेला हा किल्ला गोकाक-बैलहोंगल मार्गावर गोकाक येथुन २५ कि.मी. तर बैलहोंगल येथुन देखील २५ कि.मी.अंतरावर आहे.
...
बैलहोंगल येथील किल्ले पाहिल्यावर चाचडी किल्ला पाहुन गोकाककडे जाताना हा किल्ला वाटेवरच आहे. चाचडी येथुन बैलहोंगल-गोकाक मार्गावर ८ कि.मी.अंतरावर डावीकडे कुटरनट्टी गावात जाणारा फाटा आहे तर उजवीकडे कच्चा रस्ता समोरील टेकडीच्या दिशेने जातो.या कच्च्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे जाणारा फाटा आहे. येथुन समोर डावीकडे टेकडीकडे पाहिले असता गडाचा बुरुज नजरेस पडतो. या रस्त्याने पुढे गेल्यावर डावीकडे एक प्रशस्त पटांगण व मंदीर पहायला मिळते. या मंदिराकडून रस्त्याच्या उजव्या बाजुस गडावर जाणारा पायरीमार्ग आहे. जीपसारखे वाहन असल्यास सरळ रस्त्याने गाडी थेट गडावर जाते पण लहान गाडी असल्यास मंदिराकडे थांबवावी. घडीव दगडात बांधलेले हे मंदीर मारुतीचे असुन मंदिरासमोर दगडी बांधणीतील उंच दीपमाळ आहे. पायऱ्याच्या वाटेने १० मिनिटात आपण गडाच्या तटबंदीखाली पोहोचतो. येथे तटाबाहेर कातळात कोरलेले देवीचे लहान मंदीर असुन आत देवीचा तांदळा स्थापन केलेला आहे. मंदिराला वळसा घालुन पुढे आल्यावर आपण गडाच्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. गडाचा आकार अतिशय लहान असुन आतील परिसर ७ गुंठे इतपत असावा. गडाची तटबंदी रचीव दगडात बांधलेली असुन गडाच्या तटबंदीत ३ बुरुज आहे. यातील एक बुरुज आकाराने थोडा मोठा आहे. गडाची तटबंदी फारशी उंच नसुन तटावर फांजी बांधलेली असुन बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. गडाच्या मध्यभागी पडझड झालेली दगडी वास्तु असुन प्रसंगी बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. गडफेरी करण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. या भागात गडाची हि एकमेव टेकडी असल्याने येथुन खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडच माहीत नसल्याने इतिहासाबद्दल न बोललेले बरे. गडाच्या परीसरात फारशी वस्ती नसल्याने तसेच भाषेची अडचण असल्याने सोबत गडाचे अक्षांश-रेखांश ( 15.989811, 74.874810) देत आहे.
© Suresh Nimbalkar