कुंभारखेडा
प्रकार : नगरकोट/ गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
रावेर तालुक्यातील गढी कोटांची भटकंती करताना आपल्याला रावेर किल्ल्याचे अवशेष व त्यासोबत काही अपरीचीत व नष्ट होत चाललेल्या गढी पहायला मिळतात. रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावात आपल्याला अशीच एक अपरीचीत गढी पहायला मिळते. या वास्तुला कोट म्हणावे कि गढी हा देखील एक प्रश्नच आहे. रावेर पासुन १२ कि.मी.अंतरावर कुंभारखेडा गाव आहे. या गावाची वेस म्हणजे ग्रामदरवाजा याला आता वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. विटांनी बांधलेला हा दरवाजा व त्याची कमान आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या वरील भागात ग्रामपंचायत कार्यालय थाटलेले आहे. या कार्यालयात जाण्यासाठी दरवाजाबाहेरील तटबंदीतुन मार्ग बनवला आहे. या कार्यालयामुळेच हा दरवाजा आजवर शिल्लक राहीला असावा. दरवाजाने आत शिरल्यावर समोर काही अंतरावर सिमेंटचा गिलावा केलेला एक बुरुज पहायला मिळतो. हा बुरुज म्हणजे कुंभारखेडा गढीची मागील बाजू आहे. या संपुर्ण बुरुजाचे बांधकाम चपट्या विटांनी केलेले आहे.या बुरूजा शेजारी असलेल्या बोळीतून आपल्याला गढीच्या दर्शनी भागात जाता येते. नवीन बांधकामामुळे गढीचा फारच थोडा भाग शिल्लक आहे.
...
गढीचा मुख्य दरवाजा आकाराने लहान असुन त्यावरील बांधकाम पहाता हि गढी दुमजली असल्याचे लक्षात येते. कधीकाळी दोन बुरुजाच्या मध्ये असलेल्या या दरवाजाचा उजवीकडील बुरुज पुर्णपणे नष्ट करून तेथे नवीन इमारत उभी राहिली आहे. दरवाजाचा डावीकडील बुरुज आजही शिल्लक असुन त्यावर कुणा संताची समाधी बांधलेली आहे. दरवाजाने आत शिरल्यावर आतील बाजूने दरवाजाकडे पाहिले असता दरवाजाला लागून दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. या व्यतिरिक्त गढीचा वा आतील इमारतीचा इतर कोणताही अवशेष शिल्लक नाही. या गढीत कुंभारखेडा गावच्या पाटलांचे वंशज रहायला असले तरी त्यांना या गढीविषयी अथवा त्यांच्या पुर्वजांविषयी फारशी माहिती सांगता येत नाही. ग्रामदरवाजा व गढीचा हा भाग पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदाराकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती सत्तेचा त्यात फारसा हस्तक्षेप नसे कारण सत्ता कोणाचीही असो स्थानिक वतनदार त्यांच्याशी जुळवुन घेत असत. हे वतनदार या गढीत वास्तव्यास असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असल्याचे आजही दिसुन येते.
© Suresh Nimbalkar