किनगावराजा

प्रकार : गढी

जिल्हा : बुलढाणा

उंची : 0

श्रेणी : सोपी

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात जालना-मेहकर रस्त्यावर किनगावराजा नावाचे गाव आहे. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखोजीराव जाधवराव ह्यांच्या वतंनदारीतील हे एक महत्वाचे गाव होते. काळाच्या ओघात राजे जाधवांची या गावात असलेली गढी मोठया प्रमाणात नष्ट झाली असुन या गढीचे काही अवशेष आजही इतिहासाशी आपले नाते सांगत आहेत. सिंदखेडराजा या तालुक्याच्या ठिकाणाहुन केवळ १३ कि.मी.वर असलेले किनगावराजा बुलढाणा शहरापासुन ८२ कि.मी.अंतरावर तर जालना शहरापासुन ४७ कि.मी.अंतरावर आहे. किनगावराजा गावातील कामाक्षी मंदिरामागील भागात आपल्यालाया गढीचे अवशेष पहायला मिळतात. किनगावराजा गढीचे अवशेष म्हणजे गढीची दोन दिशांना शिल्लक असलेली मातीची तटबंदी व या तटबंदीतील मातीचे तीन बुरुज. जाधवरावांची हि गढी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या गढी परिसरात जाधवरावांच्या वंशजांची घरे आहेत. ... गढीचे शिल्लक अवशेष व परीसर पहाता चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली असुन या गढीच्या चार टोकाला चार बुरुज असावेत पण आपल्याला सध्या तीनच बुरुज पहायला मिळतात. या बुरुजांची उंची साधारण २५ फुट आहे. गढीच्या शिल्लक असलेल्या तटबंदीवर दरवाजाची ढासळलेली कमान असुन हे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. तटबंदीवरील बांधकामात असलेले दगड पहाता या गढीचे बांधकाम दगडात असावे पण हे दगड गावातील घरांच्या बांधकामासाठी नेल्याने केवळ आतील मातीचा भराव उरला आहे. गढीचे इतर काही अवशेष शिल्लक नसल्याने केवळ १५ मिनिटात आपली भटकंती पुर्ण होते. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात मुळे घराण्याकडे असलेली सिंदखेडची देशमुखी १५७६ साली लखुजी जाधवाना मिळाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा,देऊळगावराजा,आडगावराजा, किनगावराजा, मेहुणाराजा,उमरद व जवळखेड या ठिकाणी विस्तारल्या आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!