कित्तुर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : बेळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

बेळगाव आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. बेळगावात कित्तुर गावचे नाव घेताच सर्वांना आठवते ती कित्तुरची राणी चेनम्मा. महाराष्ट्रात झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव जितक्या आदराने घेतले जाते तितक्याच आदराने कर्नाटकात राणी चेनम्माचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रात झाशीची राणी आणि तिचे शौर्य याविषयी सर्वांना माहिती आहे पण त्याआधी इंग्रजाविरुद्ध शस्त्र उचलत राणी लक्ष्मीबाई इतकाच पराक्रम गाजवणारी पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक चेन्नम्मा विषयी फारशी माहिती नाही. इ.स.१८५७ मधील स्वातंत्र्यसंग्रामाच्या ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे पण बेळगाव व कित्तुरला भेट देणारे दुर्गप्रेमी वगळता बहुतांशी लोकांना राणी चेनम्मा ठाऊकच नाही. राणी चेनम्माची कर्मभुमी म्हणजे कित्तुरचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला कित्तुर शहर गाठावे लागते. बेळगाव ते कित्तुर हे अंतर ५० कि.मी.असुन बेळगावहुन कित्तुरला जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. ... किल्ला पहायला जाताना कित्तुर शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात घोडयावर स्वार असलेला राणी चेनम्माचा भव्य पुतळा पहायला मिळतो. कित्तुरचा किल्ला देसाई घराण्यातील गौडा सरदेसाई यांनी १६६० ते १६९१ दरम्यान बांधला. किल्ला बांधण्यासाठी किल्ल्याच्या परिसरातील दगडांचा वापर केल्याच्या खुणा किल्ल्याच्या आसपास फिरताना पहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी व त्यातील जंग्या आजही सुस्थितीत असुन २८ एकरमध्ये असलेल्या या किल्ल्याच्या चारही बाजुस खंदक खोदलेला आहे. या तटबंदीत एकुण ११ बुरुज असुन एक बुरुज किल्ल्याच्या मध्यभागी संपुर्ण किल्ल्यात नजर ठेवण्यासाठी बांधलेला आहे. आज आपण प्रवेश करतो हा गडाचा मुख्य मार्ग नसुन गडात पक्का रस्ता नेण्यासाठी तटबंदी फोडुन हा मार्ग बांधलेला आहे. गडाचा मुख्य दरवाजा पुर्व बाजुच्या तटबंदीत असुन या ठिकाणी गडाचा लहान दरवाजा असण्याची शक्यता आहे. आपला गडातील प्रवेश हा गाडी रस्त्यानेच होतो पण किल्ल्यात गाडी नेण्यासाठी मनाई आहे. गडाच्या आत वस्तुसंग्रहालय तसेच उद्यान असुन आत प्रवेश करण्याची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ आहे. गडात प्रवेश करताना तटबंदीबाहेर असलेला खंदक व दूर दोन्ही टोकावर असलेले बुरुज पहायला मिळतात. खंदकात थोडयाफार प्रमाणात माती जमा झाली असुन तटबंदी मात्र व्यवस्थित आहे. गडात प्रवेश केल्यावर एक रस्ता सरळ एका उजवीकडे तर दुसरा डावीकडे जातो. हे सर्व रस्ते पुढे जाऊन एकत्र येतात. आपण मात्र डावीकडील रस्त्यावर वळुन आपल्या गडफेरी सुरु करायची. वाटेच्या सुरवातीलाच मुळ लहान मंदिरावर नव्याने बांधण्यात येत असलेले शिवमंदिर पहायला मिळते. येथुन तटबंदीच्या काठाने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या बाजुस येतो. येथे नव्याने बांधलेले देवीचे मंदीर असुन मंदिरासमोर दगडात दोन पादुका कोरलेली समाधी आहे. येथुन मुळ रस्त्याने तटबंदी डाव्या हाताला ठेवत तसेच पुढे आल्यावर आपण गडाच्या पुर्व तटबंदीजवळ पोहोचतो. या तटबंदीत दोन बुरुजामध्ये बंदीस्त केलेला गडाचा पुर्वाभिमुख मुख्य दरवाजा आहे. या दरवाजा समोरच गडावरील मुख्य वास्तु असलेला महाल आहे. मध्ययुगीन स्थापत्यकलेची रचना असलेला हा संपुर्ण महाल डोळसपणे पहायला हवा. ३३० x २२० फुट लांबी रुंदीचा हा महाल गडाच्या उत्तरपुर्व टोकाला असुन राजदरबार व रहाण्याचा महाल अशी याची रचना आहे. महालाच्या पुर्व दरवाजाने आत प्रवेश करताना दोन्ही बाजुस पहाऱ्याच्या जागा आहेत. आतील बाजुस बांधीव पटांगण असुन दोन्ही बाजुस लांबलचक चौथरे आहेत. या दोन्ही बाजुच्या चौथऱ्यावर कारंजे असुन चौथऱ्याखाली लहान खोली आहे. महालाच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरून कधीकाळी हा महाल तीन मजली असल्याचे दिसुन येते. महालात एकुण तीन विहिरी असुन दोन विहिरी सहजपणे नजरेस पडतात पण एक विहीर सहजपणे दिसत नाही. हा महालातील पाण्याचा राखीव साठा असावा. या शिवाय महालात दिवाणखाना,स्वयंपाकगृह,भोजनगृह,भांडारगृह,पोहण्याचा हौद, खलबतखाना, विश्रामगृह, शयनकक्ष, देवघर, हमामखाना, आगंतुक खाना, पाण्याच्या टाक्या हे सर्व भाग आजही ओळखु येण्याइतपत सुस्थितीत आहेत. महालाच्या एका भागात किल्ल्याचे शस्त्रागार आहे. महाल पाहुन पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजाजवळ येतो. बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुस पायऱ्या बांधलेल्या असुन हा बुरुज झेंडा बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरून संपुर्ण किल्ल्याचा अंतर्गत भाग तसेच बाहेरील दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. बुरुजाशेजारी हनुमान मंदीर असुन त्यासमोर कातळात कोरलेले तुळशीवृंदावन आहे. मंदिराकडून समोर रस्त्यावर आल्यावर आपण वस्तु संग्रहालयासमोर येतो. संग्रहालयाच्या आवारात किल्ल्यावरीळ दोन तोफा पहायला मिळतात. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास तर संग्रहालय पहाण्यासाठी अजुन एक तास लगतो. किल्याच्या संग्रहालयात असलेली प्राचीन शिल्प हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण संग्रहालयातील विरगळ, सतीशिळा व सप्तमातृका आवर्जून पहाण्यासारख्या आहेत. कित्तुर येथील संग्रहालयात इ.स. ११८८ सालचा गोव्याचा राजा जयकेशी तिसरा याचा शिलालेख असुन त्यात कित्तूरच्या देवस्थान जमीनीच्या भांडणाचा निकाल (दिव्य करून केलेला) कोरलेला आहे. यात कित्तुरचा पहील्यांदा उल्लेख आलेला आहे. इ.स.१५३४ सालीं कित्तूर गांव बेळगांवच्या असदखानाचा तुर्क सरदार युसफखान याला जहागीर होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस विजापूरकरांच्या सैन्याबरोबर मल्ल आडनांवाचे हिरेप्पा व चिकाप्पा नांवाचे दोन लिंगाईत भाऊ सावकारी करण्याकरतां या भागांत येऊन संपगांवास राहिले. कित्तुरकर देसायांचें हेच मूळ पुरुष होत. यातील हिरेप्पानें रणांगणावर मोठें शौर्य दाखवल्याने त्याला हुबळी परगण्याची सरदेशमुखी व समशेर-जंग-बहादुर हा किताब मिळाला. या कुळांतील पांचवा देसाई कित्तूर येथें स्थायिक झाला. संपगांव व बिडी हीं दोन ठाणींहि त्यांच्याच ताब्यांत होतीं. १७ व्या शतकाच्या अखेर संपुर्ण कर्नाटकांत कित्तूरकर मुडी मल्लप्पा देसाई हाच प्रख्यात देसाई होता. सावनूरचा नबाब रौफखान यानें कित्तुरच्या देसायांशीं जे करार केले त्यात हाच मुडी मल्लप्पा देसाई होता. इ.स.१७४६ सदाशिवरावभाऊनी महादजीपंत पुरंदऱ्यासोबत या भागात स्वारी केली. त्यांनी तुंगभद्रेपर्यंत जाऊन सावनूरकर नवाब व या भागातील देसाईंना जरब बसवली. त्यांनी कित्तूर,गोकाक,परसगड, यादवाड असे ३५ परगणे काबीज केले. इ.स.१७४६सालीं सावनूरच्या नबाबास इतर मुलुखाबरोबर कित्तुर मराठ्यांच्या स्वाधीन करावें लागलें. इ.स.१७५६ पासून परसगड, संपगांव व बिडि हे परगणे कित्तुरकर देसायांकडे वंश परंपरागत होते. इ.स.१७७८ सालीं त्यांनीं गोकाक ताब्यांत घेतलें. इ.स. १७७८ सालीं हैदरनें खंडणी व इतर नजराणा देण्याच्या अटीवर हा मुलूख कित्तुरकरांकडे ठेवला. पण इ.स.१७७९ सालीं परशुरामभाऊ पटवर्धनांनी गोकाक सर केलें व देसायांस कैद केलें. इ.स.१७८५ सालीं टिपूनें कित्तुर, नरगुंद, रामदुर्ग वगैरे काबीज करून कित्तुर येथें आपली एक सैन्याची तुकडी ठेवली होती. टिपूच्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी नाना फडणीसाने निजामाची उदगीर येथे भेट घेतली व दोघांनी टिपूवर एकत्र स्वारी करण्याचे ठरले. मराठे व निजाम एकत्र येऊन पेशव्यांनी गणेशपंत बेहेरे व तुकोजी होळकर यांच्या हाताखालीं २५ हजार सैन्य देऊन कित्तुर येथें टिपूच्या बुर्हाणुद्दीन नांवाच्या सरदाराचा पराभव केला परंतु कित्तूरचा किल्ला टिपूच्या ताब्यांत राहीला. इ.स.१७८७ सालीं सावनेर येथे झालेल्या लढाईत टिपूने मराठ्यांबरोबर तह केला. तहानुसार ४८ लक्ष रु. खंडणी व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर हे किल्ले मराठ्यांस परत देण्याचे ठरले पण मराठा सैन्य मागे फिरताच टिपुने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला. कित्तुर टिपूच्या ताब्यांत (इ.स.१७८५-१७८७) असताना येथील देसायांच्या जहागिरीचा कारभार टिपूचा सेनापति बद्र-उल्-झमान पहात असे व देसायांस कांहीं रक्कम खर्चास मिळे. इ.स.१७९२ सालीं झालेल्या श्रीरंगपट्टणच्या तहानुसार कित्तूरचा किल्ला व प्रदेश पुन्हां मराठ्यांकडे आला. तो पेशव्यांनी परशुरामभाऊ पटवर्धन यांनां सरंजामांत दिला. भाऊनीं कित्तुरास एक मामलेदार ठेवून तें ठाणें धारवाड सुभ्यांत दाखल करून तेथील देसायांस बेगमीस नेमणूक करून दिली. हे देसाई मराठयांचे शत्रू असलेल्या हैदर व टिपु यांना सामील होऊन मराठयांना नेहमी त्रास देत म्हणून वरील योजना पेशव्यांनी केली. इ.स.१८०० सालीं धोंड्या वाघानें मराठ्यांचे सेनापति धोंडोपंत गोखले यांच्या पिछाडीवर कित्तुरजवळ छापा घातला व धोंडोपंतास ठार मारलें. इ.स.१७९१ सालीं याच धोंडोपंतांनीं धोंड्या वाघास पराजित केलें होतें. कित्तुर परगणा धोंड्या वाघाच्या ताब्यांत काही महिने होता. इ.स.१८०२ सालीं कित्तुरकर मल्लसर्जा देसाईच्या ताब्यांत (१७८२-१८१६ ) कित्तूरचा सालीना चार लाख रुपये उत्पन्नाचा मुलूख असून तो सालीना पेशव्यांस ६० हजार रुपये खंडणी देत असे. याच वर्षी जनरल वेलस्ली श्रीरंपट्टणाहून पुण्यास बाजीराव पेशव्यांच्या मदतीस जात असतां या देसायांनीं त्यास मदत केली होती. त्यामुळें त्यांचा सरंजाम कायम राहिला. इ.स.१८०९ सालीं या देसाईस पेशव्यांनीं पुण्यात बोलविलें होतें. यावेळी झालेल्या करारात त्याची जहागीर त्याच्याकडे कायम ठेवत त्यास `प्रतापराव’ हा किताब देण्यांत आला. या बदल्यात देसाईनीं पेशव्यांनां वर्षाकाठी एक लाख पांच हजार रुपये खंडणी द्यावी असें ठरलें. प्रतापराव किताब मिळाला याची आठवण म्हणुन देसाईनीं नंदगडाजवळ प्रतापगड नांवाचा एक किल्ला बांधला. इ.स.१८१८ सालीं झालेल्या बेळगांवच्या मराठा इंग्रज युद्धात कित्तुरकर देसायांनीं पेशव्यांविरुद्ध इंग्रजांना लढाऊ सामान देऊन मदत केली. बारावा देसाई शिवलिंगरुद्र सर्जा हा १८२४ मध्ये निपुत्रिक मेल्याने राणी चेन्नम्माने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन गादीवर बसवले पण ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा धारवाडचा कलेक्टर थॅकरेने हे दत्तकविधान मान्य केले नाही व कित्तुरची देशमुखी जप्त केली. आपले कित्तूर संस्थान बरखास्त होणार हि बातमी कळताच राणी चेन्नम्माने इंग्रजांकडे आपले दत्तक विधान मंजूर व्हावे, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. ते सर्व व्यर्थ गेल्यामुळे चेन्नम्मापुढे लढाईशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. यावर राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध उठाव केला. हा उठाव कित्तुरचे युद्ध म्हणुन प्रसिध्द आहे. राणी चेन्नम्माला लष्करी मदत करण्यासाठी कोल्हापूरच्या बुवासाहेब महाराजांनी एक हजार घोडदळ व पाच हजारांचे पायदळ बरोबर घेऊन कित्तूरकडे कूच केले. पण ही गोष्ट धारवाडच्या एजंटला कळल्यावर त्याने मुंबईच्या गव्हर्नरास कळवली. पुढे गव्हर्नरच्या आदेशावरुन पालिटीकल एजंटने बुवासाहेबांना इशाऱ्याचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाल्यावर मात्र सैन्यासह बुवासाहेब कोल्हापुरास परत आले. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. या लढाईत थॅकरे मारला गेला पण २ डिसेंबर १८२४ रोजी कित्तूर इंग्रजांनी जिंकले. यावेळीं इंग्रजांना किल्ल्यांत १६ लाख रुपये रोख व ४ लाखांचे जवाहीर, घोडे, उंट, हत्ती यांसह ३६ तोफा, बंदुका, तलवारी आणि प्रचंड दारूगोळा असा ऐवज हाती लागला. राणी चेन्नम्माला बैलहोंगलच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या कैदेत २१ फेब्रुवारी १८२९ रोजी ही शुर राणी मरण पावली व इंग्रजांनी कित्तुर संस्थान खालसा केले. क्रांतिकारक राणी चेन्नम्मा यांच्या या शौर्यास कोटी-कोटी प्रणाम.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!