कासारदुर्ग
प्रकार : भुईकोट
जिल्हा : रत्नागिरी
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील अनेक किल्ले आज लोकांच्या विस्मृतीत गेले असुन इतिहासाच्या पानात डोकावणारे हे किल्ले नेमके कुठे आहेत त्याची नेमकी स्थाननिश्चिती होत नाही. पुण्यातील श्री.सचिन जोशी यांनी संशोधन करून नव्याने काही किल्ले प्रकाशात आणले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील मोहनगड, रायगड मधील पन्हाळदुर्ग, तर रत्नागिरी जिल्ह्यातील कासारदुर्ग,माणिकदुर्ग,नवतेदुर्ग हे किल्ले प्रामुख्याने येतात. यातील कासारदुर्ग या किल्ल्याची माहिती आपल्याला मिळते ती श्री.आनंद पाळंदे यांच्या दुर्गवास्तु या पुस्तकातुन. कोकणातील रत्नगिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेला हा दुर्ग अंजनवेलची वहिवाट या पुस्तकातुन इतिहासात डोकावताना दिसतो. आजपर्यंत अज्ञातवासात असलेला हा दुर्ग पुर्णपणे दुर्लक्षीत असल्याने शेवटच्या घटका मोजत आहे. कोतळूक-आबलोली रस्त्यावर शीर गावाजवळ कुटगिरी नदीकाठी असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गुहागर-शृंगारतळी-वेळंब-शीर हा मार्ग सोयीचा आहे.
...
शीर गावात कोणालाही हा किल्ला माहित नसल्याने पुर्ण माहीती घेऊनच या किल्ल्यास भेट द्यावी. शीर गावातुन आबलोली मार्ग ओलांडुन कुटगिरी-पाभरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुटगिरी नदीचा पुल ओलांडल्यावर साधारण २०० फुट अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आतील बाजुला हा किल्ला आहे. शीर गावाकडून येताना आपण एक लहानसा घाट चढूनच वर येतो म्हणजे या किल्ल्याला काही अंशी गिरीदुर्गच म्हणावे लागेल. येथे रस्त्याच्या उजव्या बाजुस आत २-३ घरे आहेत. कुटगिरी नदीच्या वक्राकार पात्राचा खंदक म्हणुन वापर करत उर्वरीत बाजुला खंदक खोदुन या किल्ल्याची रचना करण्यात आली आहे. दक्षिणोत्तर असलेल्या या खंदकाची लांबी साधारण ३००-३५० फुट असुन रुंदी १५ फुट तर खोली ६ फुट आहे. y आज किल्ला म्हणुन आपल्याला हा खंदक व त्यातील ३-४ पायऱ्या पहाता येतात. खंदक काही ठिकाणी बुजलेला असुन त्यातुन पलीकडे जाण्यासाठी वाट बनवली आहे. खंदकाच्या आतील बाजूस तटबंदीचे झिजलेले जांभा दगड व काही घडीव चिरे पहायला मिळतात. याशिवाय आतील बाजूस चौथऱ्याचे काही दगड दिसतात पण त्यावर प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली आहे. किल्ल्याच्या उर्वरीत भागात शेती केली जात असल्याने इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ल्यावर इतर काही अवशेष नसल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते. या किल्ल्याची भटकंती करताना सोबत खाजगी वाहन असणे सोयीचे ठरते. अंजनवेलची वहिवाट या कागदपत्रात हा किल्ला व परिसर कुणा विजयनगरच्या पवार नामक सरदाराच्या ताब्यात होता. स्थानिक लोक किल्ल्याच्या नावाची उत्पत्ती सांगताना या ठिकाणी कासार लोकांची वसाहत असल्याचे सांगतात. कासारदुर्ग,माणिकदुर्ग,नवतेदुर्ग हे तीनही किल्ले पालशेत बंदरावरून कऱ्हाड बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर आहेत. या मार्गावर कर वसुलीसाठी व व्यापाऱ्यांना सरंक्षण देण्यासाठी या किल्ल्यांची निर्मीती केली गेली असावी. किल्ल्याची आजची अवस्था पाहता हा किल्ला शिवकाळात ओस पडला असावा. यापेक्षा जास्त माहिती या किल्ल्याविषयी मिळत नाही.
© Suresh Nimbalkar