कावळ्या

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : २०७० फुट

श्रेणी : मध्यम

पावसाळ्यात वरंधा घाट हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी गर्दी ओसंडुन वाहते पण या घाटावरचा पहारेकरी असलेला कावळा उर्फ कौला किल्ला मात्र कोणाच्याही खीजगणीतही नसतो. घाटवाट तेथे किल्ला हे प्राचीन काळापासून रूढ झालेले एक समीकरण आहे. कोकणातील रायगड व घाटमाथ्यावरील पुणे यांना जोडणारा महत्वाचा घाटमार्ग म्हणजे वरंधा घाट. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या या वरंधा घाटाच्या रक्षणाकरता व टेहळणीसाठी कावळा किल्ला बांधला गेला. वरंधा घाटमार्ग सतत वापरात राहील्याने ब्रिटिशांनी इ.स.१८५७ मध्ये या घाटमार्गाचे पक्क्या रस्त्यात रुपांतर केले. कावळा किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वरंधा घाट गाठावा लागतो. पुण्याहून भोरमार्गे वरंधा घाट हे अंतर १०५ कि.मी आहे पण भोरपासून वरंधा घाटाचा रस्ता अतिशय खराब आहे. मुंबईकरांना महाडमार्गे वरंधा घाटात जाणे सोयीचे असुन हे अंतर १९२ कि.मी. आहे. वरंधा घाटाच्या माथ्यावरच कावळा किल्ला असलेल्या डोंगराची सोंड दक्षिणोत्तर पसरली असुन या सोंडेच्या उत्तर बाजुवर कावळ्या किल्ला उभा आहे. ... महाडमार्गे वरंधा घाटातून वर आल्यानंतर पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्याची हद्द जेथे मिळते त्या खिंडीतच कावळ्या किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. वरंधा घाट बनवताना हि खिंड फोडुन मोठी करण्यात आली आहे. खिंडीच्या पुढील भागात रस्त्यावरच वाघजाईचे मंदिर व काही टपरीवजा अल्पोपहारगृह आहेत. या खिंडीत वळणावर किंवा वाघजाई मंदिरापाशी गाडी लावता येते. उन्हाळ्यात गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने सोबत पुरसे पाणी घेऊनच किल्ल्याची वाटचाल सुरु करावी. वाटेच्या सुरवातीस दोन टप्प्यात असलेल्या १५-२० पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन गेल्यावर आपण एका चौथऱ्यावर पोहोचतो. येथे डावीकडील बाजुस खाली उतरत जाणाऱ्या १०-१२ बांधीव पायऱ्या असुन खालील बाजुस बुरुजाचे गोलाकार बांधकाम आहे. किल्ला येथुन बराच दूर असल्याने या स्थानाची एकुण रचना पहाता या ठिकाणी किल्ल्याच्या वाटेवरील अथवा घाटवाटेवरील मेट असावे असे वाटते. येथुन समोर कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत सरळ जाणारी वाट दिसते. गडाच्या डोंगरावर असलेले गवत गावकरी गुरांसाठी कापुन आणत असल्याने हि वाट चांगलीच मळलेली आहे. या वाटेने साधारण १५ मिनिट चालल्यावर एक छोटा चढ चढून आपण लहानशा सपाटीवर येतो. या सपाटीवरून उजवीकडे न्हावीण सुळका तर डावीकडे उत्तरेला लांबवर किल्ल्याच्या टोकावरील बुरुजावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. किल्ला याच भागात असल्याने त्या दिशेने आपली वाटचाल सुरु करायची. येथे समोर असलेली टेकडी चढुन गेल्यावर वर लहानशी सपाटी लागते. हि सपाटी उतरून पुढील उंचवटा पार करताना चढताना या उंचवट्याखाली तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. हा उंचवटा पार करून पुढे आल्यावर परत खाली उतरताना दरीच्या काठाच्या दिशेने काही प्रमाणात शिल्लक असलेली उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. तटबंदी पाहुन पुढील उंचवटा पार करत आपण गडाच्या मुख्य सपाटीवर येतो. या ठिकाणी कातळात कोरलेली दोन टाकी असुन यातील एक टाके पुर्णपणे मातीने भरलेले आहे तर दुसरे टाके दुर्गप्रेमींनी माती काढुन साफ केलेले आहे. या टाक्यात पाणी आहे पण तुर्तास ते पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या मागील बाजुस टेकाड असुन या टेकाडावरील माती टाक्यात येऊ नये यासाठी लहान दगडी भिंत बांधलेली आहे पण सध्या हि भिंत देखील टेकाडावरून येणाऱ्या मातीखाली गाडली गेली आहे. टाक्याशेजारी नव्याने बांधलेली विटांची उध्वस्त घुमटी असुन त्यात तांदळा आहे. या भागात बऱ्यापैकी सपाटी असली तरी मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेले आहे व बहुतांशी अवशेष या जंगलात लुप्त झाले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यापासुन दिसणारा भगवा ध्वज टाक्यामागे असलेल्या टेकाडावरील बुरुजावर आहे. या बुरुजाकडे जाण्यासाठी टाक्यामागे असलेल्या पायवाटेने हा उंचवटा चढुन जावे. उंचवट्यावर कारवीच्या झाडीत लपलेला घडीव दगडात बांधलेला एक चौथरा पहायला मिळतो. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटी पासुन उंची १९८० फुट आहे. चौथरा पार करून पुढे आल्यावर गडाच्या टोकावर असलेल्या बुरुजावर फडकणारा भगवा झेंडा नजरेस पडतो. या झेंडा बुरुजावर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. घाटातील खिंडीतून या बुरुजावर येण्यासाठी एक तास लागतो. बुरुजावरून सह्याद्रीच्या रांगेत पसरलेले वरंधाघाट,मढेघाट, गोप्याघाट,शेवत्याघाट या घाटवाटा तर राजगड, तोरणा, रायगड हे किल्ले व शिवथरघळचा परिसर नजरेस पडतो. येथुन टाक्याकडे परत जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एकतर आल्या वाटेने परत मागे फिरावे किंवा बुरुजाकडून एक वाट उजवीकडे झाडीत उतरते. या वाटेनी दाट झाडीतून उतरत १० मिनिटात बुरुजाच्या उंचवट्याला उजव्या बाजुने वळसा घालत आपण पाण्याच्या टाक्यापाशी येतो. येथुन आल्यावाटेने खिंडीतुन वाघजाई मंदिराकडे परतता येते. अनेक ठिकाणी आपल्याला वरंधा घाटामुळे कावळा किल्ला दोन भागात विभागल्याचे वाचनात येते. आपण आता पहिला तो किल्ल्याचा उत्तरेकडील भाग आहे तर दक्षिणेकडचा भाग हा घाटातील वाघजाई मंदिराच्या वरील बाजुस आहे. वाघजाई मंदिराकडून भोरच्या दिशेने निघाल्यावर साधारण २०० फुटावर रस्त्याच्या उजवीकडे एक मळलेली पायवाट वर डोंगरावर जाताना दिसते. या वाटेने ७-८ मिनिटे वर चढल्यावर वाटेला उजवीकडे व डावीकडे असे दोन फाटे फुटतात. यातील डावीकडील वाटेने थोडे पुढे गेल्यावर एकामागे एक अशी कातळाच्या पोटात खोदलेली पिण्यायोग्य पाण्याची आठ टाकी नजरेस पडतात. यातील एक टाके जोडटाके असुन या टाक्याच्या पुढील बाजुस जनावरांना पाणी पिण्यासाठी चर खोदण्यात आला आहे. घाटातील खाद्यविक्रेते या पाण्याचा वापर करत असल्याने टाक्याकडे येणारी वाट चांगलीच मळलेली आहे. टाकी पाहुन मागे फिरावे व डावीकडील पायवाटेने पुढे आल्यावर वाघजाई मंदिराकडे पोहोचतो. हे वाघजाई देवीचे मुळ ठिकाण असुन स्थानिकांनी त्यावर सिमेंटचे लहानसे मंदिर उभारलेले आहे. मंदिराच्या पुढील भागात खाली उतरण्यासाठी कातळात कोरलेली वाट असुन या वाटेच्या खालील दोन्ही बाजुस कातळात कोरलेल्या लहान देवड्या आहेत. या वाटेने घाटाच्या दुसऱ्या बाजुस सहजपणे उतरता येते. गडाच्या या भागात फिरताना कोठेही गडपणाच्या खुणा दर्शविणारे तटबंदी, बुरुज, चौथरा यासारखे अवशेष दिसुन येत नाही. हे पाहता या ठिकाणी किल्ला असेल काय? यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. या ठिकाणी किल्ला नसुन हा बहुदा घाटवाटेचाच एखादा भाग असावा असे वाटते. या ठिकाणाची आपली गडफेरी अर्ध्या तासात पुर्ण होते. किल्ल्याचे हे दोन्ही भाग फिरण्यासाठी अडीच तास पुरेसे होतात. कावळा किल्ला रायगड किल्ल्याच्या सरंक्षण फळीत असल्याने याला दुहेरी महत्व आहे. शिवथरघळीच्या माथ्यावर असलेल्या चंद्रराव मोऱ्यांच्या वाडयाच्या रक्षणासाठी तसेच दूरवर शत्रूची टेहळणी करण्यासाठी व इतर रायगडच्या प्रभावळीतील इतर किल्ल्यांशी संपर्क साधण्यासाठी कावळ्याचा वापर होत असावा. डेक्कन कॉलेजातील पूरातत्त्व विभागाचे अभ्यासक सचिन जोशी यांनी शिवपूर्व काळातील जासलोडगड उर्फ मोहनगड म्हणजे जननीचा डोंगर असे मत मांडले आहे पण काही जेष्ठ इतिहास संशोधकांच्या मते जननीच्या डोंगरावर फारशी सपाटी नसल्याने सध्या कावळ्या नावाने प्रचलित असणारा जोडकिल्ला हा जासलोडगड-मोहनगड असावा. जासलोडगड उर्फ मोहनगडाचा उल्लेख शिवाजी महाराजांनी १३ मे १६५९ रोजी बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात येतो. त्यात हिरडस मावळात ओस पडलेला जासलोडगड हा किल्ला परत वसविण्यासाठी २५ सैनिकांसह पिलाजी भोसले यांची किल्लेदार म्हणुन नेमणूक केल्याचे दिसुन येते. या पत्रात ते बाजीप्रभुना किल्ल्याचे नामकरण मोहनगड असे करून किल्लेदाराचा वाडा, सैनिकांसाठी निवारा व किल्ल्याची मजबुती करून नंतरच गड सोडण्याची सुचना करतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!