काळा कोट
प्रकार : भुईकोट
जिल्हा : बुलढाणा
उंची : 0
श्रेणी : सोपी
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा हे तालुक्याचे शहर आहे. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेलेले हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील एक महत्वाचे ठिकाण होते. सिंदखेडराजा येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व आहे. सिंदखेडराजा गावात राजे लखोजीराव जाधव यांच्या गढीबरोबर काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर, सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव व त्यांच्या पुत्रांच्या समाधी, पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या सारख्या अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. या सर्व वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. सिंदखेडराजा शहर बुलढाणा शहरापासुन ८० कि.मी.अंतरावर तर जालना शहरापासुन केवळ ३० कि.मी. अंतरावर आहे. या शहरात असलेला काळा कोट पहाण्यासाठी सिंदखेड गढी पाहुन झाल्यावर गढीसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर यावे.
...
या रस्त्याने डावीकडे जालनाच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर डाव्या बाजूला एक गल्ली जाते. या गल्लीच्या सुरवातीला काळाकोट व रंगमहाल असे दिशादर्शक फलक लावले आहेत. या वाटेने थोडे पुढे उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात. चौकोनी आकाराचा व साधारण अडीच एकरमध्ये पसरलेला हा कोट काळा कोट म्हणुन ओळखला जातो. गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज असुन पुर्व दिशेला मुख्य दरवाजा आहे. कोटाचे काम अपूर्ण राहिल्याने या वास्तुचे प्रयोजन भुईकोट किल्ला कि राहण्यासाठी गढी म्हणुन असावे ते सांगता येत नाही. आतील भाग म्हणजे सपाट मैदान असुन पुरातत्व खात्याने तटबंदीच्या आत वस्तुसंग्रहालयाची इमारत बांधली आहे. काळा कोट पहायला १५ मिनिटे पुरेशी होतात. काळाकोट पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रंगमहाल नावाची चौसोपी इमारत आहे. या इमारतीच्या बाहेरील बाजुस घोडयांच्या पागा असुन महालाच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर आतील बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यामध्ये महालाच्या छतावर जाण्यासाठी जिना आहे. पुरातत्व खात्याने या वास्तुचे संवर्धन कार्य हाती घेतले असुन या वास्तुला तिच्या मुळ स्वरुपात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रंगमहालाच्या चौथऱ्याखाली तळघर असुन वाडयाच्या चौकातुन त्यात उतरण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. या दरवाजातुन तळघरात तसेच रंगमहालाबाहेर असलेल्या घोडयाच्या पागेत व तेथुन बाहेर जाता येते. रंगमहालाच्या मागील बाजुस असलेल्या मैदानात दगडी बांधकामातील मोटेची खोल विहीर असुन या विहीरीतुन रंगमहालात पाणीपुरवठा होत असावा. विहिरीच्या काठावर काही कोरीव दगड पडलेले आहेत. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. इ.स. १५७६ साली लखुजी जाधवाना सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली तसेच बाजारपेठ वसवली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या. लखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी झालेला जिजाऊचा जन्म व इ.स. १६१० मध्ये शहाजीराजांशी झालेले त्यांचे लग्न अशा दोन महत्वाच्या घटना सिंदखेडराजा येथे घडल्या. राजे लखुजीराव यांचे नातु रावजगदेवराव जाधवराव यांनी इ.स.१६९० दरम्यान आपला कारभार सिँदखेड राजा येथुन देऊळगाव राजा येथे हलवल्याने देऊळगाव राजाचे महत्व वाढीस लागले. सिंदखेड येथे असलेला काळा कोट त्यांच्याच कारकिर्दीत बांधण्यास सुरवात झाली पण बादशहाने त्यास मनाई केल्याने हा कोट अर्धवटच बांधला गेला तर काही अभ्यासकांच्या मते हा कोट राजे लखोजीरावांच्या काळातच बांधायला घेतला. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा देवगिरीच्या दरबारात खुन झाला त्यावेळी या कोटाचे बांधकाम चालू होते. पण राजे लखुजी जाधव यांचा खुन झाल्याने हे कामं थांबले व अपशकुनी वास्तु म्हणुन या कोटाचा काळा कोट म्हणुन उल्लेख केला गेला. नंतरच्या काळात मुख्य ठाणे देऊळगाव राजा येथे हलविल्याने या वास्तुचे बांधकाम अर्धवटच राहिले.
© Suresh Nimbalkar