काळदुर्ग
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : १५१० फुट
श्रेणी : मध्यम
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभुनही मुंबईजवळ असलेल्या या भागाचा पर्यटनासाठी म्हणावा तितका विकास झाला नाही. उत्तर कोकणातील पुर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने वेढलेला सुर्या व वैतरणा नदीच्या संगमाजवळ पालघर-मनोर मार्गातील चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी काळदुर्ग हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. काळदुर्ग किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे पालघर तर मुंबई अहमदाबाद मार्गावरील मनोर हे जवळचे ठिकाण आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पालघर मनोर मार्गावरील वाघोबा खिंड हे पायथ्याचे ठिकाण पालघर रेल्वे स्थानकापासुन ७ कि.मी.वर तर मुंबई- अहमदाबाद मार्गावरील मनोर पासून १४ कि.मी.वर आहे. मनोरच्या बाजुने घाटात प्रवेश करताना किल्ल्याचे सुंदर दर्शन होते.
...
किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३८६ फुट असली तरी वाघोबा खिंडीपर्यंत ४०० फुट उंचीचा चढ आपण गाडीने पार करतो. चहाड घाटातील खिंडीत वाघोबाचे छोटे मंदिर असुन येथे मोठया प्रमाणात माकडे आहेत. मंदिरामागे पाण्याचा हातपंप असुन किल्ल्यावर पाणी नसल्याने येथुनच पाणी भरुन घ्यावे. पंपाजवळ काही दगडात बांधलेल्या पायऱ्या दिसुन येतात. येथुनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरु होते. किल्ला माथा,माची आणि पठार अशा भागात विभागलेला असुन वर जाणारी हि ठळक वाट सरळ चढत आपल्याला थेट माथ्यावर घेऊन जाते. वाट गर्द झाडीतुन जात असल्याने उन्हाचा त्रास होत नाही पण किल्लाही दिसत नाही. साधारण पाउण तासात आपण गडाखाली असलेल्या एका लहानशा सपाटीवर पोहचतो. या ठिकाणी मातीने भरून गेलेले खडकात खोदलेले लहान टाके दिसते. पायथ्याहून निघाल्यापासुन येथुन पहिल्यांदा डावीकडे पुर्वेला किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याचा माथा साधारण चौकोनी आकाराचा असुन चारही बाजुला कातळकडे आहेत. या सपाटीवरून पुढे आल्यानंतर हि वाट खिंडीतील नाळेवरून डावीकडे किल्ल्याच्या चढाला लागते. या वाटेने पंधरा मिनिटे चढुन आल्यावर उजवीकडे एक छोटासा सुळका दिसतो तर डावीकडे किल्ल्याचा माथा दिसतो. सुळका पाहुन झाल्यावर मूळ वाटेने किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीवरून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या ठिकाणी डोंगरउतारावर कातळात ठळकपणे खोदलेले १०x६ फुट आकाराचे टाके पहायला मिळते. टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. टाके पाहुन आठ-दहा पावले वर आल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा हा भाग संपुर्णपणे कातळाचा बनलेला असुन या कातळाच्या काठावर अनेक खळगे कोरलेले दिसुन येतात. कातळाच्या कडेने या खळग्यात लाकडे रोवुन त्या आधारे कठडे व पहारेकऱ्यासाठी निवारे उभारण्याची हि सोय आहे. आपण वर आलो तेथुन समोरच एक वाट खाली उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरल्यावर आपण गडावरील सर्वात मोठ्या पण सद्यस्थितीत कोरडे पडलेल्या टाक्याकडे येतो. हे टाके पाहुन परत वर आल्यावर एका बाजुला किल्ल्याच्या वरच्या भागात जाण्यासाठी चार पाच पायऱ्या दिसतात तर दुसऱ्या टोकाला कातळात खोदलेला मोठा गोल खळगा दिसतो. हि गडावरील ध्वज फडकविण्याची जागा असावी. या खळग्याला लागून असलेल्या पायवाटेने काही अंतर खाली आल्यावर आपण मेघोबाच्या मंदिराजवळ येतो. या ठिकाणी दगडाच्या रचीव आवारात भग्न शिवलिंग, नंदी,दगडी ढोणी व काही तांदळा पहायला मिळतात. हे पाहुन मागे फिरल्यावर आधी पाहिलेल्या चारपाच पायऱ्या चढुन आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. खालील भागाप्रमाणे या ठिकाणी देखील कातळाच्या काठाला अनेक खळगे कोरलेले आहेत. किल्ल्याच्या या माथ्यावर शेवाळलेल्या पाण्याचे अजुन एक लहान टाके पहायला मिळते. किल्ल्यावर पठारावर एक व माथ्यावर तीन अशी एकुण चार टाकी पहायला मिळतात. वाघोबा खिंडीतून इथपर्यंत यायला दीड तास पुरेसा होतो. किल्ल्याच्या या भागातुन उत्तरेला असावा, ईशान्येला अशेरी, पुर्वेला कोहोज व सुर्यावैतरणा संगम, आग्नेयेला टकमक, दक्षिणेला तांदुळवाडी तर पश्मिमेला पालघर शहर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. इतिहासात काळदुर्ग किल्ल्याचे उल्लेख काळमेघ, नंदिमाळ या नावाने येतात. किल्ल्याच्या बांधकामाबाबत संदर्भ उपलब्ध नसले तरी माहिमच्या बिंब राजाकडे असलेला हा किल्ला त्याकाळात अथवा त्याआधी बांधला गेला असावा. नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे संभाजी राजांच्या काळात काही काळापुरता हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पण पोर्तुगीजांनी तो परत जिंकुन घेतला. इ.स.१७३७ ते १७३९च्या वसई मोहिमेत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar