कारेगाव

प्रकार : नगरकोट

जिल्हा : पुणे

उंची : 0

पुणे नगर जिल्ह्यांची भटकंती करताना या दोन्ही जिल्ह्यात आपल्याला गिरीदुर्ग तसेच अनेक गढ्या पहायला मिळतात. या दोन्ही वास्तुंच्या बरोबरीने आपल्याला अजून एक महत्वाची वास्तु पहायला मिळते,ती म्हणजे नगरकोट. कधीकाळी संपुर्ण गावाला आपल्या कोटाच्या कवेत घेऊन त्याचे रक्षण करणारी हि वास्तु आज पुर्णपणे दुर्लक्षीत झालेली आहे. काळाच्या ओघात बहुतांशी कोटांची दगडी तटबंदी आज ढासळली असुन या तटबंदीतील दगड मातीचा वापर स्थानिकांनी आपापली घरे बांधण्यासाठी केला आहे. या कोटांचे दरवाजे आजही शिल्लक असुन या भव्य दरवाजांकडे आज गावाची वेस म्हणुन पाहिले जाते. असाच एक तटबंदी नष्ट झालेला व केवळ वेस शिल्लक असलेला नगरकोट आपल्याला रांजणगावाजवळील कारेगावात पहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगावाजवळ असलेले कारेगाव हे गाव पुण्याहुन ५५ कि.मी. अंतरावर आहे. रांजणगावात असलेला महागणपती हे अष्टविनायकातील आठ गणपतीपैकी एक गणपती असल्याने येथे जाण्यासाठी पुण्याहुन वाहनांची चांगली सोय आहे. ... रांजणगाव ते कारेगाव हे अंतर ६ कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी रिक्षाची चांगली सोय आहे. पुणे महामार्गाने जाताना कारेगावाजवळ आले असता दुरूनच रस्त्याच्या आतील बाजुस असलेली कारेगाव्ची वेस नजरेस पडते. गावची वेस म्हणुन ओळखले जाणारे हे ठिकाण नगरकोटाचा दरवाजा असल्याचे सहजपणे जाणवते. हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन त्याच्या आतील बाजुस दरवाजाच्या वरील भागात तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहे. दरवाजा व बुरुजाचे पूर्वीचे बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन त्यावरील दुरुस्ती अलीकडील काळात सिमेंटने करण्यात आली आहे. दरवाजाच्या वरील भागात महाराजांचा अश्वारूढ पुतळा असुन बुरुजावर तोफा व मावळे यांचे पुतळे आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे कोटाचे इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झालेले असुन केवळ हा दरवाजा शिल्लक आहे. त्यामुळे दरवाजात सुरु झालेली आपली दुर्गफेरी दरवाजातच संपते. कारेगावची हि वेस पहाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात, नगरकोट हा दुर्लक्षित विषय असल्याने या कोटाची माहिती अथवा इतिहास इतर कोठेही उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!