कायर
प्रकार : भुईकोट
जिल्हा : यवतमाळ
उंची : 0
श्रेणी : सोपी
इतिहासाचा अभ्यास करताना यवतमाळ जिल्ह्यावर काहीसा अन्याय झालाय असे असे वाटते कारण या जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना रावेरी,कायर,दुर्ग,कळंब यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. स्थानिकांना हे गडकिल्ले माहित असले तरी इतरांना मात्र हे किल्ले अपरिचित आहे. हे किल्ले अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे किल्ले जवळ पास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला असाच एक किल्ला आपल्याला वाणी तालुक्यातील कायर गावात पहायला मिळतो. वाणी-मुकुटबन मार्गावर असलेले हे गाव वाणी या तालुक्याच्या ठिकाणापासुन साधारण १९ कि.मी.अंतरावर आहे. गावामागे असलेल्या एका टेकडीवर हा किल्ला वसलेला असुन गावात कोणासही विचारल्यास आपण सहजपणे या किल्ल्यापर्यंत पोहोचतो. किल्ल्याच्या थोडे अलीकडे रस्त्यावरच गणपतीचे प्राचीन मंदीर आहे, या मंदीराबाहेर काही कोरीव शिल्प पहायला मिळतात.
...
गावामागील ५० फुट उंचीच्या एका टेकडीवर कायर किल्ला वसलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. किल्ल्याचा परीसर साधारण २२ एकर असुन याची संपुर्ण तटबंदी आपल्याला ढिगाऱ्याच्या रुपात पहायला मिळते. किल्ल्याच्या माथ्यावर वर्षानुवर्षे शेती केली जात असल्याने त्यावरील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. या व्यतिरिक्त गावात इतिहासाशी नाते सांगणारे दोन मंदीराचे चौथरे असुन त्यातील एका चौथऱ्यावर भैरवाची दर दुसऱ्या चौथऱ्यावर शिवलिंग,नंदी,विष्णु, गणेश यांच्या मुर्ती दिसुन येतात. किल्ला फार पुर्वी पडीक झाल्याने त्याची ओळख देखील बुजलेली आहे.
© Suresh Nimbalkar