कामणदुर्ग

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : २११० फुट

श्रेणी : मध्यम

ठाणे जिल्ह्यातील माहुली गड हा उंचीत सर्वप्रथम तर वसईजवळील कामनदुर्ग हा उंचीने २२०० फुट उंचीचा दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तासाची खडी चढाई करावी लागते. ठाणे जिल्ह्यातील वसई-भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलकुंडी गावातुन कामनदुर्गकडे जाण्यासाठी पायवाट आहे. सुरवातीस असणारी वाट दोन भागात विभागणारी असल्याने हि वाट गावातुन निट समजुन घ्यावी अन्यथा वाटाडया सोबत घ्यावा. एकदा का किल्ल्याच्या मळलेल्या वाटेला लागले कि चुकण्याची शक्यता नाही. बेलकुंडी गावामागे असलेल्या दोन डोंगरांच्या खिंडीत कामणदुर्गचा माथा दिसतो. गडावर जाण्यासाठी आपल्यला हे दोन्ही डोंगर पार करून जावे लागते कारण गडाची सोंड या दुसऱ्या डोंगराला भिडली असून या सोंडेवरून गडावर जाणारी वाट आहे. ... या वाटेवर दोन ठिकाणी लहान कातळटप्पे असुन एका ठिकाणी कातळात पायर्या खोदलेल्या आहेत. या पायर्याक चढून गेल्यावर आपण उध्वस्त तटबंदीतुन गडावर प्रवेश करतो. या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा असावा पण आज त्याच्या कोणत्याही खुणा दिसुन येत नाही. येथून समोरच असलेला कामणदूर्गचा सुळकेवजा गडमाथा आपले स्वागत करतो. वाटेच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेली पाण्याची ५ टाकी असुन यातील १ टाके वगळता इतर ४ दगडमातीने भरलेली आहेत. या एका टाक्यात मात्र मार्चपर्यंत पाण्याचा पाझर असतो. या टाक्यांच्या अलीकडे वाटेत झाडाखाली दोन स्त्रिया कोरलेले एक शिल्प आहे. या स्त्रियांनी त्यांच्या कानात मोठमोठी कर्णफुले घातलेली आहेत. टाकी पाहुन परत मुख्य वाटेवर येत पुढील वाटचाल करावी. या वाटेवर पुढे आपल्याला दोन ढासळलेले बुरुज व तटबंदी यांचे अवशेष पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात वाटेत उघड्यावरच एक टाके कोरलेले आहे पण या टाक्यात पाण्याचा एकही थेंब दिसत नाही. येथुन पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या काही पायर्याा चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. कडयाच्या या काठावर काही प्रमाणात रचीव दगडांची तटबंदी दिसुन येते. गडाच्या माथ्यावर एक खोदीव साचपाण्याचा तलाव असुन तो देखील कोरडा पडलेला आहे. किल्ल्यावर पाण्याची लहानमोठी एकुण अकरा कोरीव टाकी असुन एकाही टाक्यात पाणी टिकत नाही. ज्या गडावर पाणी नसेल तो गड कधीच वसत नाही या नियमाप्रमाणे वसईच्या मोहिमेत महत्वाची भुमिका बजावणारा हा गड नंतरच्या काळात ओस पडला. कारण पाण्याअभावी हा गड ब-याच वेळा सोडून द्यावा लागला. किल्ल्यावरुन तुंगारेश्वर, गुमतारा या किल्ल्याच्या आसपास असलेले घनदाट जंगल, पश्चिमेला वसईची खाडी ते धारावी असा दूरवरचा परीसर नजरेस पडतो. ११ व्या शतकातील महिकावतीची बखर या ग्रंथात कामनदुर्गचा उल्लेख कामवनदुर्ग नावाने येतो. प्राचिनकाळी वसई खाडीतुन कल्याण बंदराकडे ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी व या परिसरात टेहळणी करण्यासाठी कामनदुर्गाची उभारणी झाली असावी. इ.स.१६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या काळात हा गड पोर्तुगिजांकडून मराठयांच्या ताब्यात आला पण दोनच वर्षांनी म्हणजे १२ सप्टेंबर १६८५ रोजी कामणदूर्ग पुन्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. गडावर पाणी नसल्याने पोर्तुगिजांनी किल्ला सोडून दिला व तो ओस पडला. वसई मोहीमेत येणारा या किल्ल्याचा उल्लेख पहाता या लढाईत या किल्ल्याची महत्त्वाची भुमिका असावी. इ.स १७३७ मध्ये पोर्तुगिज-मराठा वसई युद्धात शंकराजी केशव फडके यांनी पेशव्यांना हा किल्ला वसवण्यासाठी पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात की किल्ला पोर्तुगिज परगण्याच्या मधोमध असुन किल्ल्यावरुन कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवता येईल. यावेळी कामणदुर्गावरील दोन टाके नव्याने खोदण्यात आली व जूनी दूरुस्त करुन किल्ला वसविण्यात आला. गड नांदता रहावा यासाठी नव्याने टाकी खोदुनही पाणी टिकेना यामुळे पाण्याअभावी मराठयांनी देखील हा गड सोडून दिला. पाण्याअभावी ओस पडणारा हा एकमेव दुर्ग असावा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!