कान्हुर पठार
प्रकार : गढी
जिल्हा : नगर
उंची : 0
श्रेणी : सोपी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कान्हुर पठार गावी पेशवेकाळात सुभेदार नारो बाबाजी नगरकर यांनी बांधलेली गढी म्हणजे एक लहानसा भुईकोटच आहे. इंग्रजी काळात इ.स.१९२२ पर्यंत सरकारी काम या गढीतुनच चालत असल्याने हि गढी सरकारवाडा म्हणुन गावात परीचीत आहे. कान्हुर पठार हे गाव पुण्यापासून १०३ कि.मी.अंतरावर असुन पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १३ कि.मी अंतरावर आहे. कधीकाळी तटबंदीच्या आत असलेले हे टुमदार गाव आता वाढत्या लोकवस्तीने तटबंदीबाहेर अस्ताव्यस्त पसरलेले आहे. या नगरकोटाचा एक दरवाजा व त्या शेजारील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन टाकळी ढोकेश्वर कडून गावात प्रवेश करताना हा दरवाजा व त्याशेजारील तटबंदी पहायला मिळते. पश्चिमाभिमुख असलेला हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजा समोरच काही अंतरावर मारुतीचे मंदिर आहे. नगरकोटाची उर्वरीत तटबंदी आपल्याला ओढ्याच्या बाजूला पहायला मिळते. हि तटबंदी साधारण १०-१२ फुट उंच आहे. गावच्या विस्तारामुळे गढीची पश्चिम व उत्तरेकडची तटबंदी व त्यातील दोन बुरुज पाडले गेले आहेत.
...
हा भाग पाडुन तेथे मंगल कार्यालय तसेच व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे.चौकोनी आकाराची हि गढी साधारण सव्वा एकरवर पसरलेली असुन मुख्य गढीच्या तटबंदीत दोन व परकोटात एक असे केवळ तीन बुरुज आज शिल्लक आहेत. गढीची तटबंदी ओबडधोबड दगडात बांधलेली असुन वरील भागात बांधकामासाठी मातीचे भेंडे वापरलेले आहेत. बुरुजाचे तळातील बांधकाम मात्र घडीव दगडात केलेले आहे. मुख्य रस्त्यावरून गढीची तटबंदी दिसल्यावर गढीत जाण्यासाठी या शिल्लक असलेल्या तटबंदीला वळसा घालुन जावे लागते. गढीत प्रवेश करण्यासाठी परकोटात एक व मुख्य गढीला एक असे दोन दरवाजे आहेत. परकोटाचा पुर्वाभिमुख दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन त्याचे वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. परकोटाच्या दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाने परकोटात प्रवेश केला असता समोरच बालाजी मंदिर पहायला मिळते.या मंदीरात असलेली मुर्ती नारो बाबाजी यांनी लढाई साठी कर्नाटकात गेले असता आणल्याचे सांगीतले जाते. परकोटाचा हा भाग मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी बांधलेला असुन परकोटाच्या भिंतीत एक लहान बुरुज बांधलेला आहे. परकोटाच्या या भागात कधीकाळी घोड्याच्या पागा होत्या. गढीचा आतील मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीवर दोन उठावदार कमळे कोरलेली असुन माथ्यावर विटांनी नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यात आत जाण्यासाठी लहान दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाला टाळे असल्याने आत जाता येत नाही पण झरोक्यातून समोरील भाग पहाता येतो. आतील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन त्यात पडझड झालेल्या वाड्याचे अवशेष दिसुन येतात. हा वाडा दुमजली असुन अलीकडील काळापर्यंत सुस्थितीत असल्याचे आसपासचे रहिवाशी सांगतात. देखभाली अभावी वाड्याच्या आतील इमारती जमीनदोस्त होत आहेत. याशिवाय वाड्यात एक विहीर असल्याचे देखील ते सांगतात. कोकणातील गावडे अबिरे गावातील महादेवशास्त्री अभ्यंकर यांनी पुण्यात पेशव्यांच्या पदरी नोकरी मिळविली. त्यांचे नातू नारो बाबाजी यांनी पेशव्यांच्या सोबत अनेक मोहिमेत भाग घेतला. नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७४२ मध्ये नारो बाबाजींस कान्हूर पठार येथे काही जमीन इनाम व पारनेरची कमाविसी दिली. इ.स १७४९ मध्ये नारो बाबाजी यांनी कान्हुर पठार येथे वाडा बांधला. इ.स.१७४९ मध्ये अहमदनगर किल्ल्यावरील मोहिमेत नानासाहेब पेशव्यांबरोबर नारो बाबाजी सामील होते. किल्ला जिंकल्यावर पेशव्यांनी त्यांना या भागाची सुभेदारी दिली. नगर शहरासह जिल्ह्यातला मोठा परिसर त्यांच्या जहागिरीत आल्याने ते नगर येथे स्थायीक झाले व त्यांनी नगरकर हे नाव धारण केले. नारो बाबाजी यांनी पेशवाईत जमीनधारा पद्धतीत सुधारणा केली व नवीन करपद्धत अंमलात आणली. नाना फडणवीस यांच्याशी मतभेद झाले असता नारो बाबाजी यांनी आपली सुभेदारी सोडली होती. इ.स. १७९५ साली नारो बाबाजी यांनी आपला अखेरचा श्वास कान्हूरच्या याच वाड्यात घेतला. १०४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या नारो बाबाजींनी सहा पेशव्यांच्या कारकीर्दी पाहिल्या. पुढे त्यांचा मुलगा माधवराव उर्फ महादजी, नारायण आणि त्यानंतर नातू यशवंतराव सुभेदार म्हणून गादीवर आले.
© Suresh Nimbalkar