कान्हा

प्रकार : गढी

जिल्हा : परभणी

उंची : 0

श्रेणी : सोपी

परभणी जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना नेमगीरी,पाथरी,कान्हा,गंगाखेड,सेलु यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. यातील नेमगीरी, पाथरी हे दोन किल्ले वगळता उर्वरीत तीन ठिकाणे म्हणजे गढी आहेत. स्वतंत्रपुर्व काळापर्यंत या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने सुस्थितीत राहीले. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आता हे गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. कान्हा येथील गढी त्यापैकी एक. स्थानिकांना हि गढी देशमुख यांची गढी म्हणुन परीचीत आहे. कान्हा गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जिंतूर हे परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे शहर गाठावे लागते. कान्हा हे गाव येथे फारसे परीचीत नसल्याने येथुन १८ कि.मी. अंतरावर असलेले चारठाण गाव गाठावे लागते. चारठाण ते कान्हा हे अंतर ५ कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. कान्हा गावात प्रवेश करताना रस्त्यावरून गढीची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. गढीचे मुख्य गढी व परकोट असे दोन भाग पडलेले असुन मुख्य गढीच्या तटबंदीला लागुनच परकोटाची ढासळलेली तटबंदी आहे. ... गढीची तटबंदी साधारण ४० फुट उंच असुन खालील १५ फुटाचा भाग दगडांनी तर वरील भाग पांढऱ्या चिकणमातीत बांधलेला आहे. परकोटाची भिंत बहुतांशी नष्ट झालेली असल्याने तिच्या उंचीचा व त्यात असलेल्या दरवाजाचा अंदाज करता येत नाही. परकोटात दक्षिण बाजूला कधीकाळी घोड्यांच्या पागा होत्या. आता मात्र तेथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. परकोटाच्या उत्तरेकडील बाजुस नव्याने बांधलेला जनावरांचा गोठा असुन येथुनच मुख्य गढीत जाण्याचा मार्ग आहे. या दरवाजाच्या अलीकडे काही अंतरावर परकोटात असलेली विहीर पहायला मिळते. संपुर्ण गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन मुख्य गढीच्या तटबंदीत पाच बुरुज आहेत. यातील दोन बुरुजांच्या आधारे मुख्य गढीचा दरवाजा बांधलेला आहे. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन दोन बुरुजांमध्ये दगडविटांनी बांधलेला हा दरवाजा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात तर कमानीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीचा दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असुन दोन बुरुजामध्ये वळण देऊन अशा खुबीने बांधला आहे कि तो समोरून नजरेस पडत नाही. हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन याच्या आतील बाजुस नष्ट होत चाललेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण पहिल्या चौकात येतो. या चौकात डावीकडे गढीचा तिसरा दरवाजा आहे. गढीचे सर्व दरवाजे काटकोनात बांधलेले या दरवाजाने आत शिरल्यावर आपण एका प्रशस्त चौकात येतो. या ठिकाणी दोन्ही बाजुस उंच चौथरे असुन कधीकाळी हे ठिकाण म्हणजे गढीची सदर (कार्यालयीन जागा ) होती. येथे समोरच चौथा ढासळलेला दरवाजा असुन पाच पायऱ्या चढुन वर आल्यावर आपण गढीच्या अंतर्गत भागात येतो. आत एका मोठ्या दुमजली चौसोपी वाड्याचे अवशेष असुन त्याच्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली घरे आहेत. दरवाजाच्या अलीकडे तटबंदीवर ७० फुट खोल व ९ फुट व्यासाची विहीर असुन या विहिरीचे वरील बांधकाम घडीव दगडात तर तळातील बांधकाम विटा व चुन्यात केले आहे. विहिरीच्या अलीकडील बाजुस तटावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्या चढुन गेल्यावर बुरुजावर बांधलेल्या ओट्यावर बाबा दस्तगीर या सुफी संताची कबर आहे. गढीच्या अंतर्गत भागात फिरताना पावसाचे पाणी गढीबाहेर जाण्याच्या जागा, जमिनीखालील कोठारे तसेच धान्य साठविण्याची बळद पहायला मिळतात. गढीच्या आतील भागात नव्याने बांधलेली घरे असुन त्यामुळे गढीचे अंतर्गत स्वरूप पुर्णपणे बदललेले आहे. गढीचा हा भाग सर्वात उंचावर असल्याने येथुन संपुर्ण गाव व आसपासचा परीसर नजरेस पडतो. संपुर्ण गढी फिरण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गढीत सध्या कुणीही वास्तव्यास नसल्याने गढीच्या दरवाजाला टाळे असते. गढीचे वंशज देशमुख हे गढीबाहेर गावात वास्तव्यास असुन गढी फिरण्यास त्यांच्याकडून चावी घेता येते. गढीच्या निर्मीतीचा काळ अज्ञात असला तरी बाबासाहेब देशमुख हे या देशमुख घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात. या देशमुखांचे आडनाव कान्हेकर असे होते. इ.स.१९४८ साली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या काळात रझाकारांनी या गढीवर हल्ला केला असता तेव्हाचे गढीचे वंशज नानासाहेब देशमुख यांनी जवळच असलेल्या लोणी गावात आश्रय घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!