कानिफनाथगड

प्रकार : गढी

जिल्हा : हिंगोली

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात किल्ले पहायला मिळतात. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. हिंगोली जिल्ह्यात आपल्याला लहानशा टेकडावर असलेले गढीवजा किल्ले पहायला मिळतात. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने यातील काही गढ्यांचे आता मंदीरात रुपांतर होत चालले आहेत. होलगीरा येथे येड्राई धरणाच्या काठावर असलेला कानिफनाथ भुईकोट त्यापैकी एक. या किल्ल्याच्या आत असलेल्या नाथपंथीय देवस्थानामुळे हा भुईकोट कानिफनाथ किल्ला म्हणुन ओळखला जातो. हा किल्ला जरी हिंगोली जिल्ह्यात असला तरी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथुन तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. हिंगोली ते होलगीरा हे अंतर ६० कि.मी.असुन जिंतूर ते होलगीरा हे अंतर ३० कि.मी.आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. ... होलगीरा गावाबाहेर साधारण २ कि.मी. अंतरावर येड्राई धरणाच्या पाणी फुगवटा काठावर हि गढी आहे. गढीचा एकुण परीसर पाउण एकर असुन कधीकाळी गढीबाहेर परकोट असल्याच्या खुणा दिसुन येतात. तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन या संपुर्ण तटबंदीचे काम घडीव दगडात केलेले आहे. गढीत प्रवेश करण्यासाठी चार दिशांना चार दरवाजे असुन एकुण पाच बुरुज आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या असुन तटावरून संपुर्ण गढीला फेरी मारता येते. तटबंदीच्या उत्तरपश्चिम भागात तटाला लागुन ओवऱ्या बांधलेल्या असुन यातील एका ओवरीत गढीबाहेर जाण्याचा भुयारी मार्ग आहे. गढीच्या मध्यभागी दगडी कमानीवर तोललेले दत्तात्रयाचे मंदिर असुन त्याच्या आसपास नवनाथांची समाधी मंदीरे आहेत. यात नाथांच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. याशिवाय गढीच्या आत एक शिवमंदिर असुन मंदीरासमोर एका चौथऱ्यावर नंदी मांडलेला आहे. गढीचे स्थान उंचावर असल्याने येथुन आसपासची गावे व दूरवर पसरलेला येड्राई धरणाचा पाणीसाठा नजरेस पडतो. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीच इतिहास ज्ञात नसला तरी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हैद्राबाद स्वतंत्र संग्रामावेळी निजामाच्या रझाकार सैन्याने या गढीत तळ ठोकला होता. आसपासच्या परिसरातील स्वतंत्र सैनिकांनी त्यांना विरोध करत गढीचा ताबा घेतला व त्यांना हुसकावुन लावले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!