कात्रड

प्रकार : गढी

जिल्हा : नगर

उंची : 0

श्रेणी : सोपी

अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा परीसरात भटकंती करताना आपल्याला अनेक नगरकोट व अपरीचीत गढी पहायला मिळतात. या गढी व कोट इतकी दुर्लक्षीत आहेत कि तेथे राहणाऱ्या स्थानिकांना देखील आपल्या पुर्वजांचा इतिहास माहीत नाही. कात्रड येथे दुर्लक्षीत असलेली गढी त्यापैकी एक. कात्रड हे गाव अहमदनगर पासुन ३० कि.मी.अंतरावर तर राहुरी या तालुक्याच्या ठिकाणाहुन २३ कि.मी.अंतरावर आहे. कात्रडच्या नगरवेशीतुन गावात होणारा आपला प्रवेश कधीकाळी कात्रड गाव नगरकोटाच्या आत वसले होते याची जाणीव करून देते. नगरकोटाचा अवशेष असलेला हा एकमेव दरवाजा आज शिल्लक असुन त्याचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. हा दरवाजा दोन मोठ्या बुरुजात बांधलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या एका देवडीत शेषशायी विष्णुची सुंदर मुर्ती आहे पण या मुर्तीची रंगरंगोटी केल्याने तिचे मुळ सौंदर्य लोपले आहे. दरवाजाच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या देवडीत दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाची कमान कोसळल्याने त्यावर नव्याने छप्पर घातलेले आहे. ... या दरवाजाचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण केले आहे. या दरवाजा पासुन थोड्याच अंतरावर गावाच्या मागील बाजुस एका लहानशा उंचवट्यावर कात्रडची गढी आहे. चौकोनी आकाराची हि गढी १० गुंठ्यावर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर चार गोलाकार बुरुज आहेत. तटबंदी व बुरुजाचा खालील अर्धा भाग घडीव दगडात बांधलेला असुन वरील बांधकाम मातीच्या भेंड्यानी केलेले आहे. गढीत प्रवेश करण्यापुर्वी दरवाजाच्या अलीकडे म्हणजे डाव्या बाजुस चौकोनी आकाराची एक वेगळीच विरगळ पहायला मिळते. या विरगळीच्या वरील भागात शिवपुजनाऐवजी गणपती पुजन दर्शविलेले असुन खालील भागात कोरलेल्या मुर्तीची वस्त्रे व केशभूषा मात्र सातवाहन काळातील आहे. दरवाजाच्या समोरील बाजुस चौकोनी आकाराची अजुन एक विरगळ पहायला मिळते. गढीचे प्रवेशद्वार व त्यातील लाकडी चौकट शिल्लक असली तरी दरवाजा मात्र जागेवर नाही. गढीत प्रवेश करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच वाड्याचा मुख्य दरवाजा आहे. घडीव दगडात बांधलेल्या या दरवाजावर दगडात नक्षीकाम केलेले असुन वरील बाजुस तीन कमले कोरलेली आहेत. वाडा व गढीची तटबंदी यात १५- २० फुटाचे अंतर असुन या जागेतुन संपुर्ण वाडयाला फेरी मारता येते. वाड्याची तळातील भिंत घडीव दगडात बांधलेली असुण वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. हि मुख्य भिंत वगळता आतील बाजुस नव्याने बांधकाम केलेले असुन निगा नसल्याने त्याची देखील आता पडझड झालेली आहे. वाड्याच्या मुख्य भिंतीत मुळ बांधकामातील काही कमानी व दालने आहेत. वाड्याभोवती फेरी मारली असता वाड्याच्या मागील बाजुस असलेला दुसरा दरवाजा व बाहेरच्या तटबंदीत असलेले दोन शौचकुप तसेच एका बुरुजाखाली कोठार पहायला मिळते. संपुर्ण गढी पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!