कांचना

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ७८५ फुट

श्रेणी : कठीण

शिवाजी महाराजांनी स्वतः भाग घेतलेल्या लढाईमधील एक महत्वाची लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई’. दुसऱ्यांदा सुरत शहर लुटुन परत जात असताना मराठा सैन्य व मुघलांची कांचनबारी येथे समोरासमोर गाठ पडली व मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. उघड्या मैदानावर पहिल्यांदाच समोरासमोर शत्रुचा त्यांच्याच प्रदेशात केलेला पराभव यामुळे वणी-दिंडोरीचा हा संग्राम कांचनबारीची लढाई म्हणुन प्रसिद्ध आहे. पण हि लढाई ज्या किल्ल्यांच्या साक्षीने लढली गेली ते किल्ले कांचना मंचना मात्र प्रसिद्धीपासून खुप दूर आहेत. कांचना मंचना हि एकाच डोंगरावर असलेली दोन स्वतंत्र शिखरे असल्याने काहीजण यांना एकच किल्ला मानतात तर काहीजण यांना जुळे दुर्ग मानतात. हे दोन्ही किल्ले एकाच डोंगरावर असले तरी त्यामधील एका शिखराने या दोन्ही किल्ल्यांमध्ये दोन खिंड निर्माण झाल्याने ते एकमेकांपासून दुरावलेले आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी दोन दिशांना दोन वेगवेगळे मार्ग असल्याने यांचा दोन स्वतंत्र किल्ले असाच उल्लेख करता येईल. यातील पहिला किल्ला म्हणजे किल्ले कांचना. देवळा तालुक्यात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासुन १०० कि.मी.अंतरावर असुन देवळा या तालुक्याच्या ठिकाणाहून १४ कि.मी. अंतरावर आहे. ... कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन पहिली वाट हि कांचना मंचना किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या कांचने गावातुन वर जाते. उभा चढ व मातीचा घसारा असणारी हि वाट प्रथम मंचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते व तेथुन या दोन्ही किल्ल्याच्या मध्यात असलेल्या सुळक्याला उजव्या बाजूने वळसा घालुन कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. या वाटेने गेल्यास प्रथम मंचना करून नंतर कांचनावर जाता येते. कांचना किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट हि किल्ल्याच्या दक्षिण बाजुस आहे. कांचने गावातुन जाताना कांचनबारी (खिंड) पार केल्यावर डावीकडील रस्ता खेळदरी गावात जातो. खेळदरी गाव येथुन ६ कि.मी.अंतरावर आहे. या रस्त्याने साधारण १००० फुट आत आल्यावर डावीकडे एक कच्चा रस्ता कांचन मंचन किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने १ कि.मी.आत आल्यावर हा रस्ता काटकोनात उजवीकडे वळतो. या वळणावर डावीकडे एक शेतघर असुन तेथुनच किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत आपण कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. नंतर शिखराला वळसा घालुन मंचना किल्ल्यावर जाता येते. कांचने गावातुन येणाऱ्या वाटेच्या तुलनेने हि वाट सोपी पण वेळ खाणारी आहे. एका वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात दोन्ही किल्ले पाहू होतात. या दोन्ही वाटांवर काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. किल्ल्याच्या दक्षिण बाजुने म्हणजे खेळदरी गावाच्या दिशेला असलेल्या वाटेने किल्ला चढायला सुरवात केल्यास साधारण दीड तासात आपण कांचन किल्ल्याच्या सुळक्याखालील गुहेत पोहोचतो. या गुहेत कातळात कोरलेली पाण्याची एकुण दहा टाकी असुन त्यातील काही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. हि टाकी पाहुन डावीकडुन वर जाणाऱ्या वाटेने आपण कांचना किल्ला व त्याशेजारील सुळका यामध्ये असलेल्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीत डावीकडे असलेल्या सुळक्यात कातळात एक कोनाडा तसेच हनुमान शिल्प कोरलेले आहे. उघडयावर असल्याने या शिल्पाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. येथे कधीकाळी कांचना किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे. कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पावट्या असुन त्यावर आधारासाठी खोबण्या आहेत. हि वाट काही प्रमाणात कठीण असली तरी अवघड नाही. नव्याने भटकंती करणाऱ्यानी दोरीच्या आधाराशिवाय या वाटेने जाणे टाळावे. या वाटेने प्रस्तरारोहण करत अर्ध्या पावट्या चढुन वर गेल्यावर डावीकडे एक पुसटशी पायवाट कड्याला बिलगुन पुढे जाताना दिसते.घसाऱ्यामुळे हि वाट काहीशी धोकादायक आहे. या वाटेने सरळ गेल्यास आपल्याला कातळात कोरलेल्या चार लहान गुहा व एक दोन खांब असलेली मोठी गुहा पहायला मिळते, या शिवाय या वाटेवर पाण्याने भरलेली दोन मोठी खांबटाकी आहेत. हा सर्व भाग अतिशय सावधगिरीने पार करावा लागतो. हे सर्व पाहुन मागे फिरावे व उर्वरीत चढ पार करत गडमाथ्यावर दाखल व्हावे. निमुळता गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३७१०फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्याच्या टोकाला अजुन एक सुळका असुन या सुळक्याकडे जाताना एका रेषेत कातळात कोरलेली एकुण सात टाकी पहायला मिळतात. या टाक्यात मोठ्या प्रमाणात निवडुंग वाढलेले असुन एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. माथ्याच्या टोकाशी असलेल्या सुळक्यावर कोणतेही अवशेष नसुन तेथे जाण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज आहे. सुळक्याच्या पोटात डावीकडील बाजुस एक लहान गुहा कोरलेली आहे. गडाचा माथा हा एकप्रकारे सुळकाच असल्याने त्याच्या काठावर कोणतीही बांधीव तटबंदी दिसुन येत नाही. किल्ल्याच्या माथ्यावरून धोडप,राजधेर,कोळधेर,इंद्राई हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. वर चढलो त्या मार्गाने सावधगिरीने खाली खिंडीत उतरल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गुहेतील टाक्यापासून उर्वरीत किला पहाण्यास एका तास पुरेसा होतो. खेळदरी गावातुन आल्यास कांचन किल्ला पाहुन झाल्यावर शेजारील सुळक्याला डावीकडील बाजूने वळसा घालत मंचना किल्ल्याकडे प्रस्थान करावे. नाशिकमधील बऱ्याच भागात आपल्याला नाथपंथीयांचा प्रभाव दिसुन येतो. याच नाथपंथातील गुरु गोरक्षनाथ यांनी आपला शिष्य मच्छिंद्रनाथ याची सोन्याच्या मोहापासुन मुक्ती करण्यासाठी आपल्या तपसामर्थ्याने हा डोंगर सोन्याचा केल्याची कथा सांगितली जाते. सोन्याचा डोंगर म्हणजे कांचना अशी या डोंगराच्या नावाची उत्पत्ती सांगीतली जाते. पश्चिम महाराष्ट्रात दोन डोंगरामधील खाच खिंड म्हणुन ओळखली जाते तर बागलाण खानदेशात हि खिंड बारी म्हणुन ओळखली जाते. बागलाण मधील या कांचन खिंडीमार्गे म्हणजे कांचनबारीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन-मांचन किल्ल्याची निर्मिती प्राचीन काळात केली गेली असावी. ऑक्टोबर १६७० मध्ये सुरतेची दुसऱ्यादा लुट करून राजगडकडे जात असता दाऊदखान कुरेशी हा मोगली सरदार बुऱ्हाणपुर येथुन महाराजांच्या मागावर निघाला. त्यावेळी बागलाण मोगलांच्या ताब्यात असल्याने स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते शिवाय दाऊदखान बरोबर गाठ पडण्याची शक्यता होती. यावेळी महाराजांनी सेनेची दोन भाग करून २००० सैनिकांसोबत लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० मावळे सोबत घेऊन पिछाडीवर थांबले. दाउदखान व इख्लासखान हे दोन सरदार सुमारे १५००० सैन्य घेऊन कांचनबारी परीसरात पोहोचले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी सकाळीच कांचनबारी परीसरात युद्धाला तोंड फुटले. समोरासमोर झालेल्या या पहील्या लढाईचे स्वतः महाराजांनी नेतृत्व केले. सहा तास चाललेल्या या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांनी मोगलांवर आक्रमण करत त्यांचे जवळपास ३००० सैन्य कापून काढले व मोगलांचा दारुण पराभव झाला. समोरासमोर झालेल्या या लढाईत मराठ्यांनी कमी वेळात मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धभूमीचे नेमके स्थान आजही निश्चित नसल्याने इतिहासात काही ठिकाणी ही लढाई वणी-दिंडोरी संग्राम म्हणुन ओळखली जाते. या युद्धामुळे आपण मोगलांना समोरासमोरील युद्धात पराभुत करू शकतो हा मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. महाराज येथुन कुंजरगडाकडे निघुन गेले. या लढाईनंतर दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल मराठ्यांना मिळाला. पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील केले. इ.स.१८१८ मध्ये जून महिन्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!