कवठे
प्रकार : गढी
जिल्हा : पुणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
वर्तमानकाळात व इतिहासातील राजकारणात प्रसिध्द असलेल्या अनेक घराण्यापैकी एक घराणे म्हणजे माळव्यांतील परमार ऊर्फ पवार घराणे. उत्तर हिंदुस्थानाच्या माळवा प्रांतातील परमार ऊर्फ पवार हे रजपुत घराणे शिवकाळापुर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गढी व वाडे पहायला मिळतात. अशीच एक पवारांची गढी आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे गावात पहायला मिळते. कवठे येथील पवारांची गढी म्हणजे एक भक्कम असा भुईकोट किल्लाच आहे. कवठे गाव पुणे शहरापासुन ६३ कि.मी.अंतरावर तर पुणे -नगर महामार्गावरील शिक्रापूरहुन मलठणमार्गे २६ कि.मी. अंतरावर आहे. शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी २५ कि.मी. अंतरावर आहे. गढी गावाच्या बाहेर असल्याने गावातील गल्लीबोळ पार करत ग्रामपंचायत कार्यालयाकडून आपण गढीजवळ पोहोचतो. गढीची संपुर्ण तटबंदी व त्यातील बुरुज आजही सुस्थितीत आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज आहेत.
...
बुरुजावरील तोफांचे झरोके पहाता कधीकाळी या बुरुजावर तोफा असल्याचे जाणवते. गढीचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख ते तटबंदीच्या मध्यवर्ती भागात बांधलेले आहे. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्याच्या वरील भागात टोकदार खिळे ठोकलेले आहे. गढीत प्रवेश करण्यासाठी या दाराला लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. तटबंदीचा खालील भाग दगडात बांधलेला असुन त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे. संपुर्ण तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन त्यावरील भागात चर्या आहेत. गढीत प्रवेश केल्यावर समोरच भुईसपाट झालेल्या वाड्याचा चौथरा पहायला मिळतो. गढीच्या नैऋत्य टोकावर छत्रीवजा इमारत असुन त्या शेजारी तटबंदीत एक कोठार अथवा दालन आहे. गढीतील एक विहीर वगळता इतर अवशेष पुर्णपणे नामशेष झालेले आहेत. गढीमालक पवार हे पुणे मुक्कामी असल्याने व गढीत कोणीही वास्तव्यास नसल्याने गढी बंद असते. दरवाजातुन गढीचा आतील परीसर पुर्णपणे दिसत असल्याने आपले गढीदर्शन दरवाजातुनच आटोपते घ्यावे लागते. गढीच्या मागील भागात मध्ययुगीन काळातील एक शिवमंदिर असुन या मंदीराच्या आवारात एक पायविहीर पहायला मिळते. मध्यभारतातील माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली. प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले. शंभूसिंग परमार ऊर्फ साबूसिंग पवार यांना या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग पवार महाराजांसोबत होते. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलुखाचा बंदोबस्त करताना लढाया करून अनेक बंडे मोडून काढली. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेना सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे हि गावे त्यांना सरंजामी वतने होती. छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासराईच्या सरंजामाच्या वाटणीच्या यादीत यशवंतराव पवार मलठणकर यांचा उल्लेख येतो. त्यानंतर यशवंतरावांचे नातू व संभाजी यांचे दुसरे पुत्र आनंदराव पवार यांना कवठेची जहागिरी होती. त्यांनीच कवठे येथील गढी बांधली. आनंदराव पवार यशवंतराव पवार मलठणकर यांचे नातु व संभाजी यांचे पुत्र उदाजी, दुसरे पुत्र आनंदराव व तिसरे पुत्र जगदेवराव यांनी धार संस्थानाचा पाया रचला.
© Suresh Nimbalkar