कळंब
प्रकार : भुईकोट
जिल्हा : यवतमाळ
उंची : ५० फुट
श्रेणी : सोपी
इतिहासाचा अभ्यास करताना यवतमाळ जिल्ह्यावर काहीसा अन्याय झालाय असे असे वाटते कारण या जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना रावेरी,कायर,दुर्ग,कळंब यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. स्थानिकांना हे गडकिल्ले माहित असले तरी इतरांना मात्र हे किल्ले अपरिचित आहे. हे किल्ले अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे किल्ले जवळ पास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला असाच एक किल्ला आपल्याला कळंब या तालुक्याच्या शहरात पहायला मिळतो. यवतमाळ-नागपुर महामार्गावर असलेले कळंब शहर यवतमाळ शहरापासुन २३ कि.मी.अंतरावर आहे. कळंब शहराच्या मध्यभागी एका लहान टेकडावर हा किल्ला वसलेला असुन गावात कोणासही विचारल्यास आपण सहजपणे या किल्ल्यापर्यंत पोहोचतो. किल्ल्यावर जाणारी वाट मात्र घरांच्या गल्लीबोळातून जाते. या वाटेने किल्ल्याच्या पायऱ्या चढताना बांधकामातील घडीव दगड पहायला मिळतात. माथ्यावर आल्यानंतर डाव्या बाजुस एक थडगे पहायला मिळते.
...
किल्ल्याच्या माथ्यावर खेळाचे मैदान बनवले असल्याने त्यावरील वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. माथ्याच्या उर्वरीत भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे.या झाडीमुळे तात-बुरुज दिसतह नसले तरी आकाराने त्यांचे अस्तित्व जाणवते. किल्ल्याच्या या भग्न अवशेषात दोन ठिकाणी गोलाकार आकाराचे दोन बुरुज ते कधीकाळी तेथे असल्याची साक्ष देतात. किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. या शिवाय कळंब येथे असलेले गणेश मंदिर पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कळंब येथे गोंडराजाचा किल्ला होता. कळंबवर मोगल सुलतानांनी आक्रमण केले. त्यात कत्तली, अत्याचार, लुटालूट करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. या वाचनाशिवाय किल्ल्याची इतर कोणतीही माहीती मिळत नाही. याशिवाय मोरेश्व्र कुंठे लिखित दस्तऐवजात कळंबजवळ दुरुग आहे. येथे भवानीचे हेमांडपंती मंदिर असल्याच्या नोंदी सापडतात.
© Suresh Nimbalkar