कल्याणगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३४६० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राला दुर्गवैभवाची मोठी परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्र भटकताना आपल्याला या सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक किल्ले दिसुन येतात. विविध राजसत्तांचा काळात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गडकिल्यांचे साज चढले व सारा सह्याद्री गडकोटांनी सजला. शिलाहार राजा दुसरा भोज याच्या कालखंडात बांधला गेलेला असाच एक दुर्ग म्हणजे नांदगिरी उर्फ कल्याणगड. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सातारा शहरापासून २० कि.मी. अंतरावर हा किल्ला उभा आहे. मुंबई-बंगळुर महामार्गाने पुण्याहुन सातारा शहरात शिरताना वनवासवाडी येथुन गडाच्या पायथ्याशी असलेल्या धुमाळवाडी गावात जाण्यासाठी फाटा असुन मुंबई-बंगळुर महामार्गापासुन हे अंतर १५ कि.मी. आहे. सातारा रोड बसस्थानका पासुन धुमाळवाडी हे अंतर २ कि.मी. असुन कल्याणगड किल्ला उभा असलेल्या डोंगरावर व त्याच्या आसपास पवनचक्क्या उभारल्याने या डोंगरावर कच्च्या रस्त्यांचे जाळे उभारले आहे. ... खाजगी वाहन असल्यास धुमाळवाडी ते गडपायथा हे ४ कि.मी. अंतर डोंगर न चढता वाहनाने पार करत आपण थेट गडमाथा असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी जातो. पायथ्याच्या धुमाळवाडी गावातुन गडावर चालत जाण्यासाठी पायवाट असुन स्थानिकांची गडावरील मंदिरात ये-जा असल्याने वाट चांगलीच रुळलेली आहे. वाटेच्या सुरवातीला काही नव्याने पायऱ्या बांधलेल्या असुन नंतर मुरमाड वाटेने अर्धा डोंगर चढुन आल्यावर वाटेत एका ठिकाणी खडकात कोरलेले खांबटाके आहे. गडावर विजेची सोय असुन त्यासाठी गडावर नेलेल्या विजेच्या खांबाखालुन हि वाट आपल्याला गडावर जाणाऱ्या कच्या रस्त्याच्या अंतिम टप्प्यात आणुन सोडते. पायथ्यापासुन गडाच्या या सोंडेखाली येण्यास एक तास लागतो. गडावर जाण्यासाठी हि एकच वाट असुन गडाखालील पठारावर आल्यावर वरील बाजुस किल्ल्याचा उत्तर टोकावरील बुरुज व त्यावर नव्याने छप्पर घातलेली पडीक इमारत दिसते. कल्याणगडाचा निमुळता माथा दक्षिणोत्तर आठ एकरवर पसरलेला असुन समुद्र सपाटीपासून ३४५० फुट उंचीवर आहे. गडाची सोंड आपल्या उजव्या बाजुला ठेवत ५ मिनिटे चालत आपण कड्यावर बांधलेल्या गडाच्या उत्तराभिमुख दरवाजासमोर पोहोचतो. गावातील गुरे चरण्यासाठी गडावर जाऊ नये यासाठी भाविकांनी प्रवेशद्वाराला लोखंडी जाळीचा दरवाजा बसवलेला आहे. दरवाजासमोर बांधलेल्या १५-२० दगडी पायऱ्या चढुन आपला गडावर प्रवेश होतो. दरवाजासमोर नव्याने बांधलेली लहानशी खोली असुन उजवीकडील वाट गडाच्या वरील भागात जाते तर डावीकडील वाट तटबंदीला लागुन असलेल्या पायऱ्यांनी खाली उतरत जाते. या खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्यांच्या टोकाला कल्याणगडावरील मुख्य आकर्षण आहे. पायऱ्यांच्या शेवटी एक लहान तोंड असलेली गुहा आहे. हि गुहा म्हणजे एक प्रकारचे भुयारच असुन या भुयाराची लांबी साधारण १०० फुट, रुंदी १५ फुट तर उंची ६ ते ७ फुट आहे. या गुहेच्या आतील टोकाला तीन दालने असुन एका दालनात ९ व्या शतकातील जैन तिर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेली मुर्ती आहे. उर्वरित दोन दालनात नव्याने स्थापन केलेली दत्तात्रय व देवीची मुर्ती आहे. या भुयाराचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे या भुयारात असलेला अंधार व वर्षभर साठणारे थंडगार पाणी. पुर्वी या भुयारात कधी गळाभर कधी कंबरभर तर कधी गुडघाभर पाण्यातुन वाट काढत जावे लागत असे. पण आता येथे येणाऱ्या भाविकांनी भुयारातील वाटेच्या दोन्ही बाजूस कठडे बांधुन वाटेवर दगडांची भर घालुन ती उंचावली आहे. त्यामुळे वर्षभर या वाटेवर केवळ गुडघाभर पाणी असते पण उर्वरीत ठिकाणी मात्र पाण्याची खोली जास्त असते. गुहेत गडद अंधार असल्याने विजेरी घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. गुहा पाहुन परत फिरल्यावर दरवाजाच्या उजवीकडील वाटेने गडमाथ्याकडे निघावे. या वाटेने काही पायऱ्या चढुन वर आल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा दोन बुरुजांनी संरक्षित केलेला असुन दरवाजाला लोखंडी जाळीचे दार बसविलेले आहे.दरवाजातुन आत शिरल्यावर उजव्या बाजूस एका घडीव दगडी चौथऱ्यावर दगडी बांधकामातील लहान हनुमान मंदिर असुन मंदिराच्या शिखराला दिलेल्या चुन्याच्या गिलाव्यात गणपती कोरलेला आहे. मंदिराच्या भिंतीवर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख कोरला आहे. मंदिराच्या उजव्या बाजुने पुढे गेल्यावर आपण गडाच्या उत्तर टोकावरील बुरूजावर पोहोचतो. या बुरुजावर असलेल्या खोलीत ८-१० जण राहु शकतात. येथुन मारुती मंदिराकडे परत न फिरता सरळ गडमाथ्याच्या दिशेने निघाल्यास जुन्या व नवीन बांधकामाचा संगम करून बांधलेली कमान पहायला मिळते. हि कमान म्हणजे एखादया वास्तुचा दरवाजा असावा. या दरवाजातुन पुढे आल्यावर वाटेवर नव्याने पत्र्याचे छप्पर घातलेली बामनघर नावाची जुनी वास्तु आहे. या बामणघराच्या आत एक यज्ञकुंड असुन नक्षीकाम केलेल्या चौथऱ्यावर गणेशमुर्ती पहायला मिळते. बामणघराला लागुनच एका जुन्या वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. बामणघराच्या आवारात एक चुन्याच्या घाण्याचे चाक असुन या चाकाचा घाणा मात्र गडावर कुठेही दिसत नाही. बामनघरासमोर वाटेच्या दुसऱ्या बाजुला एक समाधी चौथरा असुन हि समर्थशिष्य कल्याणस्वामी यांची समाधी असल्याचे सांगण्यात येते पण याला पुरावा नाही. समाधीच्या पुढील भागात पाण्याचा उपसा नसल्यामुळे एक शेवाळलेले तळे दिसुन येते. तलावाच्या काठावर जुन्या वास्तुच्या पायावर नव्याने बांधलेली घरे असुन एका वास्तुवर गडावर राहणाऱ्या महाराजांसाठी आश्रम बांधण्यात आला आहे तर आश्रमाच्या पुढील भागात जुन्या चौथऱ्यावर नव्याने भक्त निवासासाठी ३ खोल्या बांधल्या आहेत. येथे पाण्याची टाकी बांधलेली असुन भुयारातील पाणी पंपाने येथे आणले आहे. पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते. भक्तनिवासाच्या मागील बाजुस गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी भलेमोठे सभागृह बांधलेले असुन या सभागृहाबाहेर पत्र्याचा सभामंडप बांधण्यात आला आहे. या ठिकाणी ५०-६० जण सहज राहु शकतात. सभामंडपाबाहेर कडयाच्या दिशेला असलेल्या तटबंदीवर एक तलवारीचे शिल्प कोरलेला दगड पडलेला आहे. येथुन पुढील वाटेने किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाताना वडाच्या झाडाखाली चार पडीक भिंतीच्या आत कुणा अब्दुल करीम नावाच्या पिराचे थडगे आहे. थडगे पाहुन पुढे आल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस एक समाधी चौथरा असुन त्यावर नक्षीकाम करून शिवलिंग कोरलेली चौकोनी शिळा ठेवलेली आहे. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे एक सुकलेले तळे असुन त्यापुढील भागात उजवीकडेच खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. गडाच्या दक्षिण टोकाला बुरुज बांधलेला असुन बुरुजाच्या पुर्व बाजुला बऱ्यापैकी तटबंदी दिसुन येते. गडाच्या उर्वरित बाजूस कडे असल्याने आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी घातलेली आहे. दक्षिणेकडील बुरुजावरून बामणघराकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास दिड तास पुरेसा होतो. नांदगिरीवरून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदन-वंदन, वैराटगड, वर्धनगड, किन्हईचा यमाई डोंगर असा दूरवरचा प्रदेश दिसुन येतो. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. महाराष्ट्रावर इ.स.९४० ते इ.स.१२१२ या काळात कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचे राज्य होते. यात इ.स. ११७५ ते इ.स.१२१२ या काळात शेवटचा राजा भोज दुसरा याचे राज्य होते. त्याच्या काळात महाराष्ट्रात एकूण १५ किल्ले बांधले गेले. सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स ११७८ ते इ.स.१२०९ दरम्यान हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला. इ.स.१६७३ मध्ये शिवरायांनी परळी, सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेताना नांदगीरीही स्वराज्यात सामील झाला. गडाचे कल्याणगड हे नामकरण बहुधा शिवकाळातच झाले असावे. शिवकाळानंतर गडाचा कारभार पंतप्रतिनिधीकडे असताना प्रतिनिधींच्या ताब्यांत असलेला हा किल्ला नंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी जिंकुन घेतला. नांदगिरी हे येथील परगण्याचे मुख्य ठाणे होते. मराठेशाहीत हा किल्ला एका तालुक्याचें ठिकाण होतें व येथें खजीना आणि मामलेदार, फडणवीस, सबनीस, हवालदार, दफ्तरदार, २ कारकून, ३ नाईक आणि १६० शिपाई रहात असत. सन १७९१ मध्ये इंग्रज अधिकारी मेजर प्रिन्स याने नांदगिरीला भेट दिली होती. या किल्ल्याचे वर्णन करताना तो आपल्या मेमरिज ऑफ फिल्ड ऑफिसर' या ग्रंथात म्हणतो, 'It look like hull of a ship of war! त्यानंतर इ.स.१८१८ मध्ये एप्रिल महिन्यात जनरल प्रिझलरने हा किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्यावर असलेल्या दोन तोफा १८५७ सालच्या बंडांत येथुन हलविण्यांत आल्या पण त्या कोठे नेल्या याचा मागोवा मिळत नाही. सन १८६२ मधील एका नोंदीत या किल्ल्याचे वर्णन पडीक व निर्जन असे करण्यात आले आहे. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींच्या वास्तव्यामुळे या गडाला कल्याणगड नाव पडल्याचे सांगितले जाते पण याला कागदोपत्री पुरावा नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!