कलानिधीगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : कोल्हापुर

उंची : ३३०० फुट

श्रेणी : सोपी

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यात कोल्हापूर पासून १४० कि. मी. व बेळगांव पासून ३५ कि. मी. अंतरावर कलानिधीगड, कलानंदीगड किंवा काळानंदीगड अशा विविध नावाने ओळखला जाणारा डोंगरी किल्ला आहे. लहान आकाराचा व सोपी चढण असल्याने सहज पाहता येण्यासारखा हा किल्ला पर्यटकांपासुन तसा दुर्लक्षितच आहे. सभासद बखरीनुसार गोव्यातील पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला शिवरायांनी बांधला. शिवाय गोव्याच्या पोर्तुगिज दप्तरात कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो. हा महाराष्ट्रात असला तरी इथे जाण्यासाठी बेळगाव मार्गे शिनोले-पाटने फाटयावरून कलिवडे गावात यावे. कलिवडे हे गडाचे पायथ्याचे गाव आहे. कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावापासून शेतातून जाणाऱ्या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वाडीवर पोहचतो. ... गडावर पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी इथुनच सोबत घ्यावे. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो. या वाटेने जाताना विजेच्या ट्रान्सफोर्मरची खूण लक्षात ठेऊन उजवीकडील पायवाटेवर वळावे अन्यथा हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने आपला गडावर जाण्याचा एक तास वाढतो. पण पावसाळयात या रस्त्याने गेल्यास निसर्गाचे अतिशय सुंदर दर्शन होते. कारवीच्या छोटया छोट्या हिरव्या झाडांनी पुर्ण डोंगर व हि वाट हिरवीगार झालेली असते. पायवाटेने जाताना विजेच्या तारा व खांब आपली सोबत करतात. गडावर जाणार्या् वाटेची हि ठळक खुण. डोंगराच्या पहिल्या टप्प्यात एक खिंड लागते हि बहुधा टेहळणीची जागा अथवा गडाचे मेट असावे कारण या ठिकाणी एका उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. येथुन साधारण १५ मिनिटे चालल्यावर काही पायऱ्या चढुन आपण दोन बुरुजाच्या आडोशाने बांधलेल्या गडाच्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहचतो. या दरवाजाने आत शिरल्यावर दूरसंचार खात्याने अलीकडील काळात भिंत घालुन गड दोन भागात विभागल्याचे दिसतो. उजव्या भागात दूरसंचार खात्याचा मनोरा असुन डावीकडील भागात मोठया प्रमाणात गडातील अवशेष आहेत. दरवाजासमोर दोन भग्न तोफा असुन गडाखाली असलेला तोफेचा माळ या ठिकाणी असलेल्या या भग्न तोफा हल्लीच गडावर आणण्यात आल्या आहेत. समोर दगडी प्राकारात बांधलेली दोन लहान मंदिरे असुन एका मंदिरात शिवलिंग व त्यामागे भैरवाची मुर्ती आहे तर दुसऱ्या मंदिरात भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या आवारात होयसाळ शैलीतील गणेशाची मुर्ती आहे. मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन (समाधी) व एक दगडात बांधलेली ओवरी आहे. अशीच दोन वृंदावन दूरसंचार खात्याचा मनोरा असलेल्या भागात आहेत. मंदिरे पाहून पुढे गेल्यावर आयताकृती आकाराचे खोल विवर असुन त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. हे विवर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी या खाणीतुन दगड काढुन नंतर या खाणींचा उपयोग विहिरी म्हणून केला जायचा. या विवरात पाण्यासाठी दोन विहिरी खोदलेल्या असुन यातील एक विहिर झुडूपानी भरली आहे तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे पण पाणी काढण्याची सोय मात्र आपल्यालाच करावी लागते. या विवरात काही कोनाडे व चौथरे पहायला मिळतात. हे विवर पाहुन आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील समोरचे व उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणावरून पुढे आल्यावर किल्ल्याचे शेवटचे टोक लागते. येथे वनखात्याने जंगलावर नजर ठेवण्यासाठी लोखंडी मनोरा उभा केला आहे. या तटाजवळ समोरच्या डोंगराची सोंड असल्याने तटाखाली मैदान झाले आहे. या बाजूने शत्रूचा किल्ल्यात प्रवेश होणे सहज शक्य असल्याने या ठिकाणी दोन मोठे बुरुज बांधून त्यावर तशाच मोठया तोफांची सोय करण्यात आलेली आहे. या बुरुजावरून तिलारीनगर व पारगडपर्यंतचा खूप मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. यातील टोकाकडील बुरुजाच्या बाहेरील अंगास ढासळलेळले काही बांधकाम नजरेस पडते. येथील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी कच्चा रस्ता बनविला आहे. हा भाग वगळता संपुर्ण गड उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. या रस्त्याने खाली उतरुन गडाकडे पाहिले असता गडाची सुस्थितीत असलेली तटबंदी न्याहाळता येते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपल्याला एकुण चार शौचकूप तसेच दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी जुन्या वास्तुचे अवशेष दिसतात. येथे एका ठिकाणी तटाला लागुनच असलेले जमीनीतील बांधकाम व पोकळी जाणवते. या ठिकाणी बहुदा गडाबाहेर विरूद्ध दिशेला बाहेर पडणारा चोर दरवाजा असावा. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदी, वायव्येला गंधर्वगड तर नैऋत्येला महिपालगड यांचे दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहून परत गावात येण्यास चार तास लागतात. गडाच्या तटबंदीच्या मजबुती संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. याशिवाय हेरेकर सावंत भोसले व तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी असलेला संबंध कागदपत्रातुन वाचनात येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!