कऱ्हा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २८९० फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण याचा उल्लेख बागलाण असाच करतात. सटाणा शहराजवळ २१ कि.मी.च्या परिघात कऱ्हागड, बिष्टा, दुन्धा व अजमेरा हे चार टेहळणीचे किल्ले आहेत. दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. खाजगी वहानाने दोन दिवसात कऱ्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. सटाणा ते कऱ्हागड हे अंतर १२ कि.मी.आहे.सटाण्याहुन दोधेश्वरमार्गे नामपुरला जाताना वाटेवर कऱ्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कऱ्हेगड वसला आहे. गडाचे नाव जरी कऱ्हागड असले तरी यावर जाणारी वाट मात्र कऱ्हे गावातुन न जाता गावाच्या विरूद्ध बाजूने वर जाते. कऱ्हागडाच्या उत्तरेहुन उतरलेल्या डोंगरसोंडेवरून किल्ल्यावर जाता येते. दोधेश्वर मंदिरानंतर एक छोटेसे मातीचे धरण दिसते. ... हे धरण ओलांडले कि एक घर दिसते व तेथुन मातीचा एक कच्चा रस्ता आत जंगलात जाताना दिसतो. येथून समोर दिसणारा डोंगर म्हणजेच कऱ्हागड. गडावर भवानी देवीचे घुमटीवजा छोटेसे मंदिर असुन गडाच्या पायथ्याला गावकऱ्यांनी नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे छोटेसे मंदिर आहे. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित असुन स्थानिक लोक याला भवानी डोंगर म्हणून ओळखतात. गडावर वर्षातुन एकदा भवानी देवीची यात्रा भरते अन्यथा गडावर कोणाचीही वर्दळ नसते. गडावर जाण्यास ठळक अशी वाट नसल्याने या डोंगराची खाली उतरणारी सोंड नजरेसमोर ठेउन त्या वाटेने गड चढण्यास सुरुवात करावी. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कऱ्हा किल्ला दिसतो. गडावर जाणाऱ्या बऱ्याच ढोरवाटा असुन सर्व वाटा गडाच्या माथ्यापाशी एकत्र येतात. या पायवाटेने ४० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथे गडाची तुटलेली व विखुरलेली तटबंदी नजरेस पडते. कधीकाळी या भागात किल्ल्याचा दरवाजा असावा पण आज मात्र त्याचे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. थोडे पुढे आल्यावर कोरीवकाम केलेले काही दगड पहायला मिळतात. यात एक वक्राकार कमानीचा कोरीव दगड तसेच एक कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. उघड्यावर असल्याने या स्तंभाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. चारही बाजूंनी कोरलेल्या या स्तंभावर एका बाजूला गणपती कोरलेला असून त्याखाली ३ बसलेले वादक कोरले आहेत. तर दुसऱ्या बाजुला एक घोडेस्वार कोरला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे ओळखता येत नाहीत. येथुन थोडा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्याजवळ येतो. या ठिकाणी दोन कातळ कोरीव गुहा असुन एक गुहा मोठी तर एक लहान आहे. किल्ल्यावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गुहा असाव्यात. या दोन्ही गुहा झाडीने व्यापलेल्या असुन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पायऱ्यांच्या वरील बाजुस गडाचा उध्वस्त बुरुज आहे. पायऱ्यानी वर न जाता सरळ पुढे गेले असता एका रांगेत कातळात कोरलेली ३ टाकी दिसून येतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. येथुन मागे येऊन कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून आपण माथ्यावर दाखल होतो. गडावर समोरच भवानी मातेचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे कातळात कोरलेली २ पाण्याची टाकी असुन या टाक्यांत शेवाळ वाढलेले आहे. मार्च महिन्यानंतर हि टाकी कोरडी पडतात. या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली एक पाण्याच मोठे कोरडे गुहा टाक आहे. टाक पाहून परत वर येऊन उलट बाजुस खाली अजुन एक पाण्याच टाक पहायला मिळते. या टाक्यात खुप मोठया प्रमाणात पाणवनस्पती वाढली आहे. माथ्यावर घरांच्या जोत्याचे अवशेष आढळतात. माथ्याच्या पश्चिम बाजुला कातळात कोरलेल्या काही गुहा आहेत. गड माथ्यावरील मंदिरापाशी आपली गड फ़ेरी पूर्ण होते. कऱ्हेगडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी -तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, अजमेर तसेच दुंधागड दिसतात. १९८७ साली नाशिकमधील ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. गिरीश टकले यांनी घेतलेल्या एका शोध मोहिमेमध्ये कऱ्हेगडाचे स्थान निश्चित करण्यात यश मिळाले. शक्य झाल्यास कऱ्हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. कऱ्हेगडाच्या पायथ्यापासून सात-आठ कि.मी. अंतरावरील देवळाणे गावात प्राचीन असे शिवमंदिर असुन हे मंदिर व या शिवमंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!