कर्ली

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन आज त्यांचे अस्तीत्व केवळ इतिहासाच्या पानातच उरले आहे. मालवण तालुक्यात असलेला कर्लीचा किल्ला याचेच एक उदाहरण आहे. कर्ली हे ठिकाण कुडाळ पासुन १९ कि.मी.अंतरावर तर मालवण पासुन २२ कि.मी. अंतरावर आहे. कर्ली जरी अस्तित्वात असले तरी येथील कोट किंवा त्याचे अवशेष मात्र आज कोठेही दिसुन येत नाही. इतकेच नव्हे तर परीसरातील वयोवृध्द लोकांनाही येथे किल्ला होता हे माहित नाही. इतिहासाच्या पानात हा किल्ला आज केवळ नावापुरता उरला असला तरी कर्ली खाडीच्या काठावर असलेल्या या निसर्गरम्य भागाला एकदा तरी भेट द्यायला हवी. कर्ली किल्ल्याचा उल्लेख मला आढळला तो सतीश अक्कलकोट यांच्या गडकिल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पुस्तकात. त्यांनी या पुस्तकात केलेल्या इतिहासातील नोंदीनुसार तुळाजी आंग्रे व वाडीकर सावंत यांच्यात भांडणे चालू असताना इ.स. १७४८ च्या दरम्यान तुळाजी आंग्रे यांनी सावंताच्या ताब्यातील भागात कर्ली खाडीच्या काठावर किल्ला बांधावयास घेतला. ... या बाबत सावंतांचे कारभारी विठ्ठल मेश्राम पेशव्यांना कळवतात. कारलीची खाडी मालवण नजीक तेथेही किल्ला बांधावयास लागला. चौबुर्जी तयार केली. खासा जाऊन भरतगडास राहुन किल्ला हैराण केला. तोफांच्या माराखाली किल्ला जेर केला. दुसरे दिवशी हणमंतघाट उतरवायचं विचार केला तो आंगऱ्यास बातमी पोहोचली. त्यावरून कुडाळचे ठाणे सोडीले,कार्लीची चौबुर्जी टाकिली. त्यानंतर याचा दुसरा उल्लेख पोर्तुगीज व सावंत यांच्या लढाईत येतो व तिसरा उल्लेख १७५४ च्या आसपास भाऊसाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात येतो. या तिन्ही उल्लेखावरून कर्ली येथे किल्ला असल्याचे कळते पण त्याची नेमकी स्थान निश्चिती होत नाही. कर्ली ते मालवण हे अंतर साधारण ३५ कि.मी.असुन येथे किल्ला वा त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने येथे असलेले निसर्गसौंदर्य पाहुन त्यावरच समाधान मानावे लागते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!