कराड कोट

प्रकार : नगरकोट

जिल्हा : सातारा

उंची : 0

श्रेणी : सोपी

पुणे-बंगळुर महामार्गावरील कराड हे आज एक महत्वाचे शहर आहे. महाभारत काळात करहाटक किंवा करहाकट या नावाने ओळखले जाणारे हे नगर आजही कराड शहर म्हणुन नांदते आहे. चिपळूणहून कुंभार्ली घाटाने देशावर येताना घाट संपल्यावर लागणारे मोठे नगर म्हणून या शहराचे महत्व प्राचीन काळापासुन आहे. व्यापारी मार्गावर महत्त्वाचे केंद्र असल्याने तेथे सुबत्ता येणे ओघानेच आले. अशा या महत्वाच्या शहराच्या रक्षणासाठी कोट असणे साहजीकच आहे. बहुतांशी नगर सामावलेला हा कोट आज पुर्णपणे नष्ट झाला असुन पंतांचा कोट अशी ओळख सांगत शहराचा नाममात्र भाग म्हणुन उरला आहे. कराड कोटास भेट देण्यासाठी आपल्याला कराडच्या सोमवार पेठेत असलेल्या पंतांचा कोट या ठिकाणी यावे लागते. पंताचा कोट म्हणुन ओळखला जाणारा हा किल्ला म्हणजे छत्रपतीं शाहूच्या औंधच्या पंतप्रतिनिधींचा भुईकोट किल्ला असुन काही काळ त्यांचे या किल्ल्यात वास्तव्य होते. कराड शहराच्या वायव्येस कृष्णा-कोयनेच्या संगमाजवळ एका टेकडीवर असलेला हा भुईकोट बहामनी काळात बांधला गेला असावा. ... कधीकाळी १६ एकरवर पसरलेल्या या कोटाच्या तटबंदीत एकुण १८ बुरुज व नगारखाना असलेले प्रवेशद्वार होते. यातील चार बुरुज अगदी अलीकडील काळापर्यंत शिल्लक होते पण शहराच्या वाढत्या वस्तीने त्यांचा घास घेतला असुन आज केवळ एक बुरुज व नदीपात्राच्या दिशेने असलेली काहीशी तटबंदी वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. नदीपात्राच्या दिशेने मोठया प्रमाणात पडझड झालेला अजुन एक बुरुज आहे पण तो केव्हाही नष्ट होऊन जाईल. याशिवाय कोटाच्या आतील भागात पाण्याची सोय करण्यासाठी 'नकटय़ा रावळाची विहीर' म्हणून प्रसिद्ध असलेली पायऱ्यांची प्रचंड मोठी विहीर आहे. काळ्या दगडात अतिशय कलात्मक रीतीने उत्तम बांधकाम केलेली ही विहीर नेमकी कोणत्या काळात बांधली हे कळत नाही. नकट्या रावळ्या हा राक्षस होता. विहिरीत पाणी भरण्यासाठी आलेल्या लोकांना तो कैद करत असल्याची आख्यायिका या विहिरीबाबत सांगितली जाते. ग्याझेटमधील या किल्ल्याच्या वर्णनानुसार पूर्वेकडील प्रवेशद्वार ओलांडल्यावर दुसऱ्या एका प्रवेशद्वारातून मुख्य किल्ल्यात जाणाऱ्या प्रवेशद्वारावर नगारखाना होता. मुख्य प्रवेशद्वाराशेजारी पडके बुरूज आहेत. किल्ल्याला एकूण १८ बुरूज होते. किल्ल्याचा आकार समभुज चौकोनाकृती असून तो ईशान्येकडे काहीसा पुढे वाढलेला आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाने १९४९ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात या किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे ढासळल्याचे म्हटले आहे. किल्ल्याच्या सभोवताली असलेला दोन मीटर खोलीचा खंदक आता पूर्णपणे गाळाने भरलेला आहे. तटभिंतीत शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या होत्या. किल्ला कोयनेच्या पात्रापासून सुमारे १४ ते ३० मीटर उंचीवर आहे. कोयनेच्या पात्रालगत असलेल्या तटबंदीचा बहुतांश भाग सन १८७५ च्या महापुरात वाहून गेला आहे. किल्ल्याच्या परिसरातील काही वास्तूंचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. त्यातील प्रतिनिधींचा वाडा ही वास्तू एका मोकळ्या जागेमध्ये बांधण्यात आली असून ती मराठाकालीन वास्तुशैलीचे एक उत्तम उदाहरण होय. या उद्ध्वस्त वाड्याचे बरेच अवशेष शिल्लक आहेत. वाड्यात दक्षिणेस २५ x २४ मी लांबरुंद व ४.१ मी. उंच असे आयताकृती सभागृह आहे. सभागृहातील ४.२ मी.उंच असलेल्या दालनाच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या होत्या. या सभागृहाच्या पूर्वेकडील बाजूस टोकाला भवानीदेवीची छत्री आहे. सभागृहाच्या छतावर जाळीदार नक्षीकाम केलेले आहे. बांधकामात लोखंडाचाही वापर केलेला दिसतो. ही वास्तू १८००च्या सुमारास परशुराम श्रीनिवास प्रतिनिधीची आई काशीबाई हिने बांधण्यास घेतली. सभागृहाचे बांधकाम मात्र प्रतिनिर्धीच्या वडिलांनी पूर्ण केले. आज हा परिसर पुर्णपणे बदललेला असून येथे काहीच अवशेष शिल्लक नाहीत. भवानीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान मात्र कायम ठेवण्यात आले आहे. किल्ल्यात एक पायऱ्यांची विहीर असुन स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्ल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४.४ मी.उंचीवर आहे. ही विहीर सुमारे ४१.५ मीटर लांब असून, त्यात ३०.५ मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली ११ x ११ मी. चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी ८४ पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे. प्रत्येक २० पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी आहे. ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार असुन तेथुन पाणी उपसा करण्याची सोय आहे. जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभांवर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केलेले आहे. नदीच्या बाजुने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. या विहिरीची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठविण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खोबण्या जाणीवपूर्वक ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळ्या बसवून या विहिरीचे तीनपेक्षा जास्त मजल्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेशमार्गावर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठविण्यासाठी हिचा उपयोग करण्यात येत नसावा तर अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्त्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोगात येत असावी. ही वास्तू भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे.१९४९ साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने कराडमध्ये पंतांचा कोट परिसरात हे उत्खनन केले होते. त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला असुन उत्खननातून मिळालेल्या पुराव्यातून या ठिकाणी प्रागैतिहासिक काळापासून मानवाने वस्ती केलेली होती असे दिसते. पुराश्मयुगातील हत्यारे तसेच ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे अवशेषही पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इथे मिळाले आहेत. सातवाहनपूर्व आणि सातवाहनकालीन मानवी वसाहतीचे अवशेषही तिथे मोठय़ा प्रमाणावर मिळाले आहेत. सातवाहनकालीन नाणी तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तू, मातीची भांडी, घराच्या छताची कौले, दागिने बनवण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे मणी, स्फटिक, शंख, हस्तिदंत, हाडे यांच्यापासून बनवलेल्या वस्तूसुद्धा मिळाल्या आहेत. इथे मिळालेल्या रोमन बनावटीच्या पदकावरून या शहराचा रोमशी व्यापारी संबंध होता हे लक्षात येते. सागरीमार्गाने युरोपमधून येणारा माल कोकणातून देशावर आणण्यासाठी जे विविध घाटमार्ग होते त्यातील कुंभार्ली हा घाटमार्ग प्राचीनकाळापासून अस्तित्वात होता हे स्पष्ट होते. खरे तर पंतांचा कोट याठिकाणी केलेले हे उत्खनन अतिशय मर्यादित स्वरूपाचे होते, परंतु या ठिकाणी खूप महत्त्वाचे अवशेष मिळाल्यामुळे कराड शहरातील मानवी वस्तीचा कालक्रम उजेडात आला. कराड शहराचा इतिहास सुरु होतो तो महाभारत काळापासून. या गावाच्या अस्तित्वाचे पुरावे महाभारतातील सभापर्वात मिळतात. युधिष्ठराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी केलेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये सहदेवाने हे नगर जिंकले होते आणि तिथून कर वसूल केला होता. महाभारतामध्ये या गावाला एक नगर असे संबोधले आहे. बदामी चालुक्य यांच्या काळात कऱहाटक विषय असा या नगराचा उल्लेख येतो. चालुक्यांच्या काळात कराड येथे सेंद्रक घराण्याच्या एका शाखेचे केंद्र होते असे दिसते. चालुक्य राजा विजयादित्य याची पत्नी महादेवी कराडची राजकन्या होती. ती बहुदा सेंद्रक राजा विष्णुराज याची कन्या असावी. इ.स.आठव्या शतकात म्हणजे राष्ट्रकूट राजा इंद्र याच्या काळात 'करहाटक विषय' अशी नोंद मिळते. आठव्या शतकातील दंतिदुर्ग याच्या ताम्रपटा मध्ये 'कऱहाडकर निवासी ब्राह्मण नारायणभट' याला दान दिल्याचा उल्लेख आहे. त्यावरून त्या काळामध्ये इथे विद्वान ब्राह्मण राहत होते असे समजते. शिलाहारांच्या काळात कराडमध्ये विद्वान ऋग्वेदी ब्राह्मण राहत असल्याची नोंद मिळते. ही परंपरा पुढे कराडमधल्या वैदिक पाठशाळांमधून सुरू राहिली. कश्मिरी कवी पंडित बिल्हण याच्या 'विक्रमांकदेवचरित्र' या ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार करहाटपतीची पुत्री चंद्रलेखाचे स्वयंवर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्याबरोबर करहाटक येथे झाले. ती विक्रमादित्याची पट्टराणी होती, पण या राजाने करहाटकचा राज्यकारभार पाहणाऱ्या मांडलिक राजा जोगम कलचुरी याची कन्या सापलदेवी हिच्याबरोबर ही विवाह केल्याची नोंद या ग्रंथात दिसते. यादव काळात करहाटक हे देश विभागाचे मुख्यालय होते यावरून कराडचे क्षेत्र पूर्वीपेक्षा कमी झालेले दिसते. पुढे इस्लामी काळात इथे मशिदींचे बांधकाम झाले. या मशिदीत काही शिलालेखही आहेत. महाराष्ट्रातील अजूनही उभ्या असलेल्या जुन्या मशिदींमध्ये यांची नोंद करावी लागते. विजापूरचा अलीअदीलशहा गादीवर असताना इब्राहिमखान नांवाच्या इसमाने १५५७ मध्ये ही मशीद बांधिली असें तिच्यावरील लेखांवरून दिसून येतें. मशीदींतील खांबावर पर्शियन भाषेंत एकंदर नऊ लेख आहेत. मशिदीच्या डाव्या बाजूस मुसाफीरखाना व हमामखाना (स्नानगृह) आहे. मशिदीचे मनोरे १०६ फूट उंच असुन मनोऱ्यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जीने बांधण्यात आले आहेत. कराड संगमावर तळ असताना औरंगजेब या मशीदमध्ये नमाजसाठी येत असल्याचे सांगीतले जाते. औरंगजेबच्या महाराष्ट्रात आलेल्या आक्रमणानंतर जिंजीकडे जाताना छत्रपती राजाराम महाराजांनी महाराष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी पंतप्रतिनिधी हे पद निर्माण केले. औंध येथे जाण्याआधी पंतप्रतिनिधींचा सुरवातीचा मुक्काम कराड येथील या कोटात होता. इ.स.१८०६ मध्ये पेशव्यानी प्रतिनिधीकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. प्राचीन काळापासून वैभवशाली असलेल्या या नगरीचा इतिहास खुद्द कराडवासियांना नाही हेच या शहराचे खरे दुर्दैव आहे!!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!