कराडे कोट
प्रकार : गढी
जिल्हा : रायगड
उंची : 0
श्रेणी : सोपी
पनवेल जवळील रसायनी शहर येथे झपाटयाने होत असलेल्या औद्योगीकरणामुळे प्रसिद्ध आहे पण आपल्यासारख्या दुर्गभटक्यांना खुणावतो येथील पाताळगंगा नदीकाठी असलेला एक लहानसा गढीवजा कोट. औद्योगीकरणामुळे गजबजलेल्या या शहरात असे काही असेल याची आपल्याला कल्पनाच नसते आणि याचमुळे या वास्तु अधीकाधीक दुर्दशेच्या फेऱ्यात लोटल्या जातात. इतिहासाची नोंद नसल्याने विस्मृतीत गेलेला असाच एक कोट म्हणजे कराडे येथील पाताळगंगा नदीकाठी असलेला चौबुर्जी कोट. या कोटाला भेट देण्यासाठी आपल्याला रसायनीजवळ असलेले कराडे खुर्द गाव गाठावे लागते. मुंबईपासुन हे गाव ५० कि.मी.अंतरावर असुन पनवेलपासुन फक्त २० कि.मी.अंतरावर आहे. मध्ययुगीन काळात पाताळगंगा नदीपात्रातून लहान आकाराची गलबते ये-जा करत असल्याने या नदीकाठी असलेली गावे भरभराटीस आली होती. पेशवाईच्या उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पाताळगंगा नदीकाठी हा गढीवजा कोट बांधला गेला
...
पण हा फारसा वापरात आलाच नाही. येथे असलेल्या कुलकर्णींच्या ताब्यातील हा कोट स्वातंत्र्यानंतर वैद्य परिवाराने लिलावात विकत घेतला असुन त्यांची खाजगी मालमत्ता आहे पण गढी फिरण्यासाठी ते कुणाला अटकाव करत नाही. आयताकृती आकाराची हि गढी साधारण १२ गुंठे परीसरात असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. हे चारही बुरुज संपुर्णपणे घडीव दगडात सुबकतेने बांधलेले आहेत. बुरुजावर नक्षीदार झरोके तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. तटबंदीचा १०-१२ फुट उंचीचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन वरील भाग मात्र विटांनी बांधलेला आहे. दुर्लक्षीत राहील्यामुळे गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन पश्चिमेला असलेला मुख्य दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. गढीच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन यातुन फिरताना चौसोपी वाड्याचा चौथरा पहायला मिळतो. या चौथऱ्यावर मोठया प्रमाणात घडीव नक्षीदार तळखडे पडलेले आहेत. आतील बाजुने बुरुजावर गेले असता तेथे मोठ्या प्रमाणात नक्षीकाम पहायला मिळते. याशिवाय तटबंदीत एक कोठार पहायला मिळते. गढीत पाण्याची कोणतीही सोय नसली तरी पुर्वेकडील तटाला लागुन एक चौकोनी आकाराची पायऱ्यांची बांधीव विहीर आहे. याशिवाय गढीच्या दक्षिणपूर्व बुरुजाला लागुन बाहेरच्या बाजुस गोलाकार आकाराची विहीर आहे. बुरुजावरून या विहिरीचे पाणी काढण्याची सोय असुन त्यासाठी हा बुरुज अर्धवर्तुळाकार बांधलेला आहे. या उंच बुरुजावरून व तटावरून खापरी नळाने पाणी आतील वाडयात नेले आहे. महाराष्ट्रातील जवळपास ६५० गढी-कोट फिरताना अशा प्रकारची रचना आजवर कोठेही माझ्या पाहण्यात आलेली नाही. रत्नागीरी जिल्ह्यातील यशवंत गडावर बुरुजावरून खंदकातील विहिरीचे पाणी काढण्याची सोय आहे पण हा बुरुज गोलाकार व विहीर खंदकात आहे,तटाला लागुन नाही. कोटाबाहेर असलेल्या दोन्ही विहीरीचे पाणी आजही वापरात आहे. संपूर्ण गढी फिरण्यास व बाहेरून प्रदक्षिणा मारण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गढीपासुन काही अंतरावर तलावाकाठी रम्य वातावरणात ग्रामदेवता गारमातेचे मंदीर आहे. कोकणचा वारसा सांगणारे सव्वाशे वर्षापुर्वी बांधलेले हे कौलारू मंदीर आवर्जुन पाहण्यासारखे आहे. गावात पाताळगंगा नदीकाठी दगडी घाट बांधलेला असुन घाटावर पेशवेकाळातील शिवमंदीर आहे. या मंदिराच्या भिंतीतील दगडावर काही अक्षरे कोरलेली आहेत.
© Suresh Nimbalkar