करवीर कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : कोल्हापुर

उंची : 0 फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक व प्राचीन शहर म्हणुन कोल्हापुर शहराची ओळख आहे. आपली सर्वाची कोल्हापुर शहराशी ओळख होते ती येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरामुळेच. पण कधीकाळी जुने कोल्हापुर/ करवीर शहर हे तटबंदीच्या आत म्हणजे नगरकोटात वसले होते याची फारच कमी लोकांना कल्पना असते. काळाच्या ओघात वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे व इतर विविध कारणामुळे हा कोट त्याची तटबंदी,बुरुज व इतर दरवाजे पाडले गेले. आजमितीला बिंदु चौक ते बालगोपाल तालीम या भागात आपल्याला या कोटाची तटबंदी, चार बुरुज व एक दरवाजा पहायला मिळतो. इथे दिसणारी दरवाजाची कमान, दोन बुरुज व तटबंदी दक्षिणेला तशीच पुढे आहे. त्यापुढे दोन बुरुज आणि तट आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन त्यावर झुडपे वाढलेली आहेत. सध्या येथे महालक्ष्मी मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या शिवाय थोडे फार कोटाचे बांधकाम विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस पहायला मिळते. बिंदु चौकात असणारे भक्कम बुरुज आणि नगरकोट दरवाजा आपल्याला करवीर नगरीच्या इतिहासाची साक्ष देतो. ... कोल्हापुर शहरात गेल्यावर दुर्गप्रेमिनी या भागाला भेट द्यायलाच हवी. बिंदु चौकातील कोटाचे हे अवशेष पाहण्यासाठी एक तास पुरेसा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत १६५९ च्या सुमारास कोल्हापूर मराठ्यांच्या ताब्यात आले त्यावेळच्या पत्रात जुन्या कोल्हापुर शहराचा उल्लेख कसबा कोल्हापुर असा येतो. या कसबा कोल्हापुर भोवती त्यावेळी मातीची तटबंदी होती. पण कोल्हापुर शहराला खरे महत्व प्राप्त झाले ते कोल्हापुरची स्वतंत्र गादी अस्तित्वात आल्यानंतर. इ.स. १७३० नंतर महाराणी ताराबाई व छत्रपती संभाजी पहिले (कोल्हापुर) यांच्या काळात हा मातीचा कोट पाडुन त्याजागी भक्कम अशी तटबंदी उभारण्यात आली. किल्ल्याची हि तटबंदी आजच्या बिंदू चौक-छत्रपती शिवाजी पुतळा-पापाची तिकटी-गंगावेस-रंकाळा वेस-वरुणतीर्थ- मिरजकर तिकटी बालगोपाल तालीम या भागात पसरलेली होती. या तटबंदीची उंची साधारण २५ फुट तर तटाची रुंदी साधारण १० ते २२ फुटापर्यंत होती. या तटबंदीबाहेर खोल खंदक असुन कोटात ये-जा करण्यासाठी त्यावर पुल बांधण्यात आले होते. ग्राहमच्या म्हणण्यानुसार या तटबंदीत एकुण ४३ बुरुज होते व ये-जा करण्यासाठी गंगावेस, रंकाळावेस, वरुणतीर्थवेस, आदितवार (रविवार) वेस, मंगळवारवेस, शनिवारवेस असे लहानमोठे दरवाजे होते. पण आता या कोटाचा मूळ नकाशाच सापडल्याने या कोटाला एकुण ३४ बुरुज, त्यांची नावे व त्यावर असणाऱ्या तोफा यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. इ.स. १७३१ मध्ये कोल्हापूर गादी स्वतंत्र झाल्यानंतर १७७८ मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला हलविण्यात आली. पण त्यापूर्वी करवीर कोट व आतील राजधानीच्या वास्तुंचे बांधकाम पुर्ण करण्यात आले होते. पण नंतरच्या काळात शहराची झपाट्याने वाढ झाल्याने कोटाच्या आत अस्वच्छता, अरुंद रस्ते, दुर्गंधी, कचरा आणि प्लेगची साथ यामुळे शहरात अवकळा पसरली तेव्हा इ.स १८८९ मध्ये नगरपालिकेने ही तटबंदी पाडून टाकण्याचा निर्णय घेतला. तट पाडून त्याचा वापर खंदक बुजवण्यासाठी केला गेला, वेशी पाडल्या आणि त्याजागी प्रशस्त रस्ता केला. आज जसे हे तट आणि बुरुज होते त्याप्रमाणे त्यावर रस्ता तयार झाला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!