करजगाव

प्रकार : गढी

जिल्हा : अमरावती

उंची : 0

श्रेणी : सोपी

अमरावती जिल्ह्यात गढीकोटांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. यात गाविलगड सारखा बलाढ्य किल्ला,अचलपुरचा नगरदुर्ग व आमनेरचा लहानसा किल्ला यांचा सामावेश होतो. या भागात प्रशासकीय कामासाठी गढ्यांची निर्मीती करण्यात आली पण त्याही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. यात करजगाव,सुलतानपुरा व हिंगलाज या गढ्या येतात पण यातील किती गढ्या प्रशासकीय कामासाठी वापरात होत्या यात शंकाच आहे. संपुर्ण अमरावती जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील केवळ या तीन गढ्या दिसुन येतात. यातील पहिली गढी म्हणजे चांदुरबाजार तालुक्यात करजगाव येथे असणारी गढी. करजगावच्या मध्यभागी नदीकाठी असलेली हि गढी चांदुरबाजार या तालुक्याच्या ठिकाणापासुन २५ कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन १५ कि.मी.अंतरावर आहे. गढी असलेले ठिकाण गावात गढी मोहल्ला म्हणुन परीचीत असल्याने आपण सहजपणे गढीजवळ पोहोचतो. गढीचे बाहेरील तटबुरुजांचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत असुन आतील वास्तु मात्र पुर्णपणे भुईसपाट झालेल्या आहेत. ... आयताकृती आकाराची हि गढी साधारण १६ गुंठे परिसरावर बांधलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज आहेत. गढीचे तळातील बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन उर्वरीत बांधकाम हे विटांनी केलेले आहे. हे संपुर्ण बांधकाम नऊ थरांमध्ये अतिशय कलात्मकतेने केलेले आहे. तटाची उंची साधारण ४० फुट असुन फांजीवरील भागात विटांनी बांधलेल्या सुंदर चर्या आहेत. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन यात असलेले लाकडी दार आजही शिल्लक आहे. मुख्य दरवाजा बंद असताना आत ये-जा करण्यासाठी या लाकडी दाराला लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या डावीकडे काही अंतरावर तटामध्ये देवीचे लहान मंदिर आहे. गढीचा वापर स्थानिक हगणदारीसाठी करत असल्याने नाकाला रुमाल लावुनच गढीची भटकंती करावी लागते. गढीच्या आत आपल्याला बुजत आलेली एक विहीर तसेच तटबंदीत काही कोठारे पहायला मिळतात. तटबंदीच्या आतून तटावर जाण्यासाठी जिना असुन त्याची पडझड झाल्याने त्याचा वापर करणे धोकादायक आहे. याशिवाय तटाच्या खालील भागात एक शौचकुप आहे. गढीच्या उर्वरीत भागात झाडी वाढलेली असुन मोकळ्या जागेचा वापर गावकरी शेन टाकण्यासाठी करतात. स्थानिकांच्या या प्रतापामुळे गढीची भटकंती करणे हे एक दिव्य आहे. साधारण अडीचशे ते तीनशे वर्ष जुनी असणारी ही पेशवेकालीन वास्तू आज केवळ दुर्लक्षपणामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. गढीचे मालक कुणी देशमुख असुन ते नागपुरला रहातात या शिवाय स्थानिकांना या गढीची कोणतीही ऐतिहासिक माहिती नाही हे या गढीचे व आपले दुर्दैव म्हणावे लागेल. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!